पाण्याची बचत यावर निबंध | Essay On Save Water In Marathi

पाण्याविषयीचे जनमानस

पाण्याची बचत यावर निबंध | Essay On Save Water In Marathi

पाणी हे जीवन आहे, परंतु आज पाण्यासाठी कलह होत आहे. पाण्याची समस्या निर्माण होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये लोकसंख्यावाढीमुळे पाण्याची गरज वाढणे हेही एक प्रमुख कारण आहे. झाडे ज्याप्रमाणे प्राणवायु व कर्बवायु यांचे प्रमाण निसर्गतः कायम ठेवण्याचे कार्य करतात. त्याचप्रमाणे सूर्य, वायू व समुद्र हे निसर्गचक्रातून मानवाला आवश्यक तेवढे पाणी पुरवण्याचे काम करतात. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होऊ डग निर्माण होणे, सूर्याच्याच उष्णतेने जमीन तापल्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे समुद्राकडून कमी दाबाच्या जमिनीवरील क्षेत्राकडे वारे वाहत जात जाऊन सोबत पर्जन्ययुक्त ढंग येऊन जाणे व झाडे, पर्वतराई आदींमुळे थंड झालेल्या ढगातून पर्जन्यवृष्टी होणे, हा मानवाला नेहमीकरीता पाणी मिळण्याचा शाश्वत मार्ग आहे.

निसर्गातून मिळाले पाणी प्रथम पृथ्वी शोधून येते, जादाचे पाणी खोलगट भाग, तलाव, बंधारे, धरणे यामधे साठविले जाते. तरीही नाले व नद्या यांचे माध्यमातून बरेच पाणी समुद्रांत जाते. वास्तविकतः समुद्राला या पाण्याची गरज नाही. पृथ्वीच्या ३/५ ते २/३ भागावर समुद्राचे पाणी आहे. या समुद्राला त्यानेच दिलेल्या पाण्याची परतफेड करा, असे म्हणण्याची नैसर्गिक गरज नाही. योग्य ठिकाणी पाणी अडवून, ते जमवून अथवा पृथ्वीच्या पोटात जिरवून ठेवण्यास मानवांचा वाढलेल्या समूह असमर्थ ठरला आहे. पाण्याची पहिली समस्या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झाली तर पाणी साठविण्याचे नियोजन नसल्यामुळे दुसरी समस्या निर्माण झाली आहे.

पाण्याचे प्रमुख उपयोग पुढील प्रमाणे आहेत. १. मानव व पशुपक्षी पिण्याकरीता तथा स्वयंपाकाकरिता २. स्नानाकरिता ३. शेतीमधून वरपावसाने उत्पादन करण्याकरीता ४. ओलीत करून शेतमालाचे उत्पादन वाढविण्याकरिता ५. औद्योगिक उत्पादनात वापरण्याकरिता ६. उन्हाने तप्त झालेले वातावरण थंड करण्याकरिता ७. फुलझाडे, गवताचे लॉन, अंगणात सडा टाकणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे आदि कामांकरिता ८. शहरांमध्ये संडास व ड्रेनेजमधे टाकण्याकरिता.

पाणी खालील प्रकारे उपलब्ध होते. (१) नदी तलावातून पाणी आणून (२) विहिरीचे पाणी काढून (३) तलाव, नदीवरील बांध, विहिरी यांतून नळाद्वारे व ट्यूबवेलमधून. नळाची उपलब्धता झाल्यापासून वरील पहिल्या दोन पाणी मिळविण्याच्या प्रथा बंद पडत आहेत. जनमानसामधे पाण्याविषयी हा सर्वात मोठा बदल आहे.कारण पहिल्या दोन प्रकारामधे शारीरिक श्रम जास्त आहेत व श्रम न करण्याच्या वृत्तीने जमिनीखाली उपलब्ध असलेले पाण्याचे स्त्रोत आज वापरले जात नाही. फक्त थोड्या प्रमाणांत विहिरीचे पाणी शेतीकरिता वापरले जाते. काही प्रमाणात धरणाचे पाणी पाटाद्वारे शेतीला व औद्योगिक उत्पादनाकरिताही दिले जाते.

“अल निनो” व ” ला निनो” या उष्ण समुद्र प्रवाहामुळे तथा औद्योगिकरण व वाहनांचे धुरामुळे निर्माण होणारी उष्णता, यांतून पृथ्वीवरील तापमान दोन ते तीन सेल्सियसने वाढत आहे. उत्तर / दक्षिण धृवाकडील भागाला लागून असलेल्या समुद्रप्रदेशात बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढत आहे या उष्णतेमुळे जरी जमिनीवरील उपलब्ध पाण्याची वाफ होत असेल, तरीही ती वाफ वाया जात नाही. सर्वच प्रकारच्या वापरले जाणान्या पाण्याला सरते शेवटी दोनच मार्ग उपलब्ध आहेत. (अ) जमिनीमध्ये मुरणे अथवा बाष्पीभवन होणे. बाष्पीभवन झालेले पाणी अकाली पडणाऱ्या पावसाचे रूपात पुन्हा जमिनीवर येते. एकंदरीत उपयोगात आणलेले कोणतेही पाणी वाया जात नाही. एकंदरीत समुद्रातून ढगाद्वारे आलेले पाणी उणे नद्यांद्वारे समुद्रात परत गेलेले पाणी हा जो घटक भूतलावर अथवा भूगर्भामधे पुन्हा पाऊस येईतो राहतो, त्या घटकामध्ये घट होत नाही. कारण हे पाणी द्रव रूपात अथवा वाष्परूपात पृथ्वीतलावरच असते. पाणी अदृश्य होणारी वस्तू नाही, हा सिद्धांत मान्य व्हायला हवा. त्यामुळे उपलब्ध पाणी कमी जास्त वापरल्यास ते काहींना मिळेल, काहींना मिळणार नाही, काही प्रदेशांत पाणी असेल तर कुठे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल. राजस्थान, गुजराथमधे पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना त्याचवेळी उत्तरपूर्व व दक्षिणेत पाऊस पडतच असतो. जागतिक पातळीवर भूपृष्ठावरील व भूपृष्ठांतर्गत पाण्याची उपलब्धता दरवर्षीसारखीच असणार.

उपलब्ध पाण्याचे सर्व जीवजंतूंमध्ये सामाजिक न्यायाचे तत्वाने वाटप व्हावे ही जनमानसाची अपेक्षा असते. घरोघरी नळाची व्यवस्था असणे अथवा सार्वजनिक नळाची व्यवस्था असणे या दोनही व्यवस्थेत पाण्याचा अपव्यय हा होतो. त्यामुळे काहींना पाणी आवश्यकतेपेक्षा कमी मिळते. मुबलक व स्वकष्टाने मिळणारे पाणी जनतेला मिळू शकेल. अशी व्यवस्था असावयास पाहिजे. त्याकरिता स्वयंपाकाकरिता व पिण्याकरिता शुद्ध व स्वच्छ पाणी बाटल्या अथवा ५ लिटरच्या डब्यांमधून पुरविण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अथवा खाजगी विहिरीमधून जनतेने स्वतःकरिता पाण्याची व्यवस्था करून घ्यावयास पाहिजे. विहिरींना पाणी असावे लागेल. पूर्वीच्या काळात विहिरींच्या पाण्यावरच लोक आपल्या गरजा भागवित असत. जनसंख्या वाढल्यामुळे, शेतीला विहिरींचे जास्त पाणी घेणे चालू केल्यामुळे व त्या प्रमाणात पाणी जिरविले जात नसल्यामुळे, विहिरींच्या ट्यूबवेलच्या पाण्याची पातळी खाली जात आहे.

वसंत बंधारे, कोल्हापुरी बंधारे, भूमिगत बंधारे या मार्फत नानांचे पाणी अडविले जात आहे. मोठी धरणे काही झालीत व काही होत आहेत. तर काही राज्यांच्या व पर्यावरणवाद्यांच्या भांडणात अपूर्णावस्थेत आहेत. प्रत्येक नदीवर अथवा नाल्यावर बांधबांधता येणार नाही. ज्या नदीनाल्याचे पाणी समुद्रापर्यंत न अडविता जाते, त्यांचे पावसाळी पुराचे पाणी प्रवाहाचे दिशेने परंतु थोडे दोन्ही किनाऱ्याचे बाजूला वळवून विभिन्न गावांजवळ तलाव निर्माण करून ते पाणी साठविता येते. या साठविलेल्या पाण्याने त्या गावाजवळील विहिरींची पाण्याची पातळी वाढेल. अश्या तलावांना पाझर तलाव म्हणतात. हे तलाव सध्या सखल भागात पाणी अडवून तयार होतात. त्याऐवजी पुराचे पाणी प्रवाहीत करून असे तलाव करावेत.

नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या अभियंत्याचे विश्लेषणानुसार प्रती व्यक्ती दररोज ४० लिटर पाणी पाहिजे. पिण्याकरिता ३. स्वयंपाकाकरिता ५, धुणीभांडी ७, अंघोळ १५ व संडास सफाईकरीता १० लि. जेये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तेथे असे पाणी वापरणे म्हणजे चैन ठरेल. राजस्थानमधे घराचे छपरावर पडणारे पाणी जमिनीवरील टाक्यांत साठवून ठेवण्याची प्रथा मी पाहिली. तेथे पावसाळ्यात पडणारा एकूण एक पाण्याचा थेंब गाव तलावाकडे वळविलेला बघितला. पावसाळ्यात पडणाऱ्या ५ ते १० इंच पावसाचे भरवश्यावर तेथे मका पिकवला जातो. महाराष्ट्रातील मराठवाडा भागांत काही जिल्ह्यांत पाऊस कमी पडतो. तेथे पावसाळी पाण्याचे शेतातच मुरविण्याचे काम केले जाते व रिंगणी ज्वारी पेरली जाते. विदर्भातील वर्धा, उत्तर चंद्रपूर व दक्षिण नागपूर जिल्ह्यांत पूर्वीच्या काळी शेतात पडलेले पावसाचे पाणी दर नक्षत्राला वखरणी करून शेतातच जिरविले जात असे व पाऊस पडणे बंद झाल्यावर, दसरा- दीपावलीचे सुमारास गव्हाची पेरणी करीत असत. आता पाटाचे अथवा विहिरीचे पाणी उपलब्ध करून गहू घेतला जातो. राजस्थान, मराठवाडा व वर्धा ही उदाहरणे दिली आहेत. शेतकरी व जनता पाण्याची उपलब्धता पाहून त्याचा यथायोग्य विनियोग कसा करायचा हे ठरवित असतात. सध्या विनियोग ठरविला जातो व उपलब्धतेच्या मागे लागतात. त्यामुळे पाण्याकरिता दाही दिशा फिरण्याची पाळी येते. राजस्थानी मारवाड्याच्या डोक्याला ८० फूट लांबीची बारीक कापडाची पगडी असायची व कॅनव्हासची डोलची सोबत राहत असे. पगडीचा दोर व डोलचीची बादली करून खोल विहिरीचे पाणी तो कुठेही काढू शकत असे. आता पगडी-डोलची अदृश्य झाली आहे, कारण तो नळाचे पाणी पितो. दोन बैलांनी ओढलेल्या मोटेच्या पाण्याने दिवसभर शेतात ओलीत करणारा शेतकरी आता दिसत नाही. त्याच्या विहिरीचे पाणी आता विजेच्या पंपाने दोन तासांत संपते.

Also read:-