स्त्री मुक्तीची माझी कल्पना
भारतीय स्त्री वर निबंध | Essay On Indian Woman in Marathi
पुरुषप्रधानतेच्या साच्यात बंदिस्त झालेली स्वतः वरील अधिकार गमावून बसलेली, पुरुषाची वसाहत म्हणून जगणारी, इतिहासाच्या पाना-पानामधून अदृश्यपणे मिरवणारी, पुरुषाच्या संपत्तीला वारस जन्माला घालून स्वतःच्या नावा-गावासकट मिटून जाणारी.
हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे होऊ लागलेली, स्वतः च्या मनाचा तळ धुंडाळणारी, नशिबाचे भोग, व्रतवैकल्याची जळमटे दूर करून आजूबाजूच्या जगाला चाचपडणारी, इतिहासाच्या दारांना धडका देऊन माझा इतिहास कोठे आहे विचारणारी, मला आजच्या जगात समानता नकोय, मला नवे जग पटवायचे आहे, मला माणूस घडवायचा आहे. यातली दुसरी स्त्री आहे सध्याची स्त्री. स्वतःचं स्वत्व जपणारी आस्मिता जपणारी स्त्री. १९७५ या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर भारतात खऱ्या अर्थाने स्त्री-मुक्ती चळवळ रुजण्यास सुरुवात झाली. परंतु खरं म्हणजे स्त्री मुक्तीची चळवळ म्हणजे काय? स्त्रीला कुणापासून मुक्त करायची आहे? या सर्व प्रथांची चुकीची, वास्तवापासून दूर नेणारी उत्तरे शोधली गेली आणि स्त्रीला पुरुषापासून मुक्त करायचं आहे असं समजलं गेलं.
पण माझं खरं मत विचाराल तर, स्त्री ही पुरुषाची गुलाम आहे आणि तिला पुरुषापासून मुक्त करायची आहे. ही संकल्पनाच मुळी मला मान्य नाही. माझ्या मते स्त्री गुलाम आहे पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरांची. ती बळी आहे ज्ञानापासून तिला दूर ठेवणाऱ्या सामाजिक नियमांची, व्रतवैकल्ये जोपासत, अंधश्रद्धांना कवटाळून बसणाऱ्या मानसिक गुलामगिरीची आणि स्त्रीला मुक्त करायचंय या सगळ्या वाईट गोष्टींपासून पुरुषांपासून नव्हे.
आपली भारतीय संस्कृती ही महान संस्कृती आहे. परंतु आपली संस्कृती प्राचीन संस्कृती असल्याने त्या काळात अनिवार्य असणाऱ्या पण सध्याच्या काळात निरुपयोगी असणान्या काही गोष्टी त्यात असणं अपरिहार्य आहे. आपल्या संस्कृतीत जन्मानेच पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडातून बाहेर पडायला हवीय मुलांची आई म्हणजे एक स्त्री
दुसरी गोष्ट शिक्षणाची सध्या अनेक वरिष्ठ पदावर स्त्रिया काम करीत आहेत, परंतु असंख्य सर्वसामान्य स्त्रियांना केवळ ती स्त्री आहे, म्हणून शिक्षणाची संधी नाकारली
जाते व लग्नाला प्राधान्य दिलं जातं परंतु एक स्त्री सुशिक्षित झाली की ती संपूर्ण कुटुंबालासुतिक्षित, सुसंस्कृत बनवते. म्हणून स्त्रियांचं शिक्षण समाजाला सुसंस्कृत करण्याच्या उद्देशानं आवश्यक आहे. आपल्या समाजात अनेक व्रते, सण-समारंभ साजरे केले जातात. पण सगळी व्रत-वैकल्ये आहेत स्त्रियांसाठी चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिका व्रत. चांगला नवरा मिळाल्यानंतर तो जन्मोजन्मी बांधून ठेवण्यासाठी वटसावित्री व्रतः सौभाग्य रक्षणासाठी संक्रांत व्रत. पण पुरुष पहिल्यापासून हुशार, त्यांनी ही नस्ती झेंगटं मागे लावून घेतली नाहीत आणि देवानं सुद्धा पुरुषाला नैसर्गिकरित्या काहीसा मोकळा सोडलाय. तो त्याच्याच जातीचा म्हणून असेल कदाचित.
तिसरी गोष्ट अंधश्रद्धांची. स्त्री बंध असण्याचं मूळ आहे तिच्या निरक्षरतेत, अशिक्षितपणात आणि कुठल्याही घटनेचं खापर स्त्रियांवर फोडल्या जाणान्या सामाजिक मानसिकतेत. या गोष्टींमुळे स्त्रिया आपोआपच बुवाबाजी वगैरे प्रकारांना बळी पडतात आणि आपला वेळ, पैसा, स्वास्थ्य, क्वचित प्रसंगी चारित्र्यहननालाही बळी पडतात. म्हणून स्त्री या अंधश्रद्धेच्या गर्तेतून मुक्त होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
स्त्रीमुक्तीमध्ये अडसर होणाऱ्या गोष्टींमध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनाही वाटा उचलतात. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांसारखे कपडे घालून, वेळी-अवेळी भटकणे, वाट्टेल ते बाष्कळ मतप्रदर्शन करणे असा काही स्त्रियांचा समज असतो. पण त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलून ही चळवळच खिळखिळी व्हायला मदत होते, म्हणून स्त्री मुक्त व्हायला हवीय अशा चुकीच्या कल्पनांपासून स्त्रीने या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर गरज आहे तिनं स्वतः मधली शक्ती ओळखण्याची.
स्त्रीला भोगदासी किंवा देवता न समजता ज्या दिवशी स्त्रीचा माणूस म्हणून विचार होईल तो स्त्रीमुक्ती चळवळीचा खरा सुदिन असेल आणि या सगळ्यांतून स्त्री मुक्त झाली की, निर्माण होईल असा प्रगल्भ विचारसरणीचा, सुशिक्षित, सुसंस्कृत समाज, ज्यात प्रत्येक पुरुष गर्भजल परीक्षणाला विरोध करेल. हुंडा घेण्याला पुरुषच मोडून काढतील. निपतील अनेक व्रतवैकल्यांची जुन्या, घाणेरड्या रूढी-परंपरांची जोखड आणि साकार होईल माझ्या मनातली खरोखरच्या स्त्री-मुक्तीची संकल्पना.
Also read:-