माझा आवडता सण | Maza Avadta San Essay In Marathi

माझा आवडता सण | Maza Avadta San Essay In Marathi

सण- संस्कारांचे उत्तम साधन

Maza Avadta San:- भारतीय प्राचीन परंपरा जोपासल्या जातात त्या सणांच्या निमित्ताने आमच्या पूर्वजांनी फार विचार करून या परंपरांची जपणूक व्हावी, यासाठी सणांची कल्पना लोकांपुढे मांडली. जेव्हा ही कल्पना कोणा एकाच्या मनात आली व ती त्याने लोकांपुढे मांडली तेव्हा नक्कीच शुभमुहूर्त असला पाहिजे. म्हणूनच आजही सण उत्साहाने साजरे केले जातात. भारतातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे सणांचा राजा. राजा कसा दिमाखात येतो नि सर्वांवर प्रभाव पाडून निघून जातो. तो निघून गेला तरी त्याच्या आठवणी मनात घर करून राहतात.

बुद्धदेवाच्या काळात उत्तर भारतात हा सण साजरा होऊ लागला. पुरावा सांगतो की, हा सण गुप्तकाळातही साजरा केला जात होता. थोडक्यात काय तर हा सण अडीच ते तीन हजार वर्षांची परंपरा सांगतो. या सणाबरोबर उत्साह, चैतन्याचा झरा मनामनातून वाहू लागतो. इतकी शतके मानवाला आनंद देणारा हा सण काही सामान्य नाही. अनेक राज्य, राजवंश यांची भरभराट झाली, ते नेस्तनाबूत झाले. मोठे-मोठे संप्रदाय आले-गेले, चंचल लक्ष्मीचा प्रसाद काहींच्याच नशिबी आला. पुष्कळजण त्यापासून वंचित झाले, पण दीपोत्सव थांबला नाही. कितीही गरीब माणूस आपल्या दारापुढे एक तरी पणती लावतोच. आता सण आपल्याला दान देतात ते संस्कारांचे संस्कार हे एका दिवसात शिकवून येणारी प्रक्रिया नाही. कळत-नकळत संस्कार मानवी मनावर अधिराज्य करत असतात. आणि म्हणूनच या सणांची योजना.

सणांच्या निमित्ताने सामाजिक मंगलेच्छा केली जाते. समाजातील घटक सारे भेद विसरून एकत्र येतात. आनंदाची पर्वणी सुरू होते. हा एकतेचा संस्कार सणांच्या माध्यमातूनच साधला जातो. सणांच्या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी हा हेतू असतो. वर्षानुवर्षे आपण दारिद्र्याच्या पाठीवर बसून लक्ष्मीची पूजा करत आहोत. महाकालीची पूजा करत आहोत, दहशत, भीती यांनी युक्त कंपित हृदयापासून. आमची ही पूजा सफल होईल की नाही माहीत नाही, आमच्या उणिवा भरून निघतील की नाही माहीत नाही पण मंगलेच्छा मात्र अबाधित राहिल्या आहेत. नि हाच खरा संस्कार, सर्वत्र दुःखाचा हुंकार ऐकू येत असताना दिवाळी मात्र मंगल संदेशच घेऊन येते. कित्येक हजारो वर्षांपासून मानव सामूहिक स्वरूपात समृद्ध होण्याचा संकल्प करीत आला आहे. तोच संकल्प आजही केला जात आहे.

माझा आवडता सण मराठी निबंध

भारतीय संस्कृती आम्हाला कृतज्ञता शिकवते. केलेले उपकार स्मरण्यासाठी सणांचे माध्यम वापरले जाते. आमचा देश कृषिप्रधान, काळ्या आईच्या उदरातील मोत्याचे दाणे खाण्यापूर्वी परमेश्वराला त्याचा नैवेद्य दाखवावा हो कृतज्ञता. खरीपाचा हंगाम संपताच दारातील धान्याच्या राशी पाहून आनंदित मानव दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे नानाविध प्रकार करून त्याचा नैवेद्य दाखवतात. ते याच भावनेतून. ‘अतिथी देवो भव’ ही आमची संकल्पना. सर्वांनी मिळून केलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा हा संस्कार. यामुळे संकुचित स्वार्थी वृत्तीला आळा बसतो. सहभोजनाचा आनंद लुटता येतो. यातूनच एकतेचा संस्कार दृढ होतो.

निसर्ग हा मानवाचा खरा मित्र मित्राच्या सान्निध्यात आपण आपल्या कोंडलेल्या भावनांना वाट करून देतो. मन स्वच्छ होते, मोकळे होते. असाच हा मित्र आपल्याला आनंद देतो तो मंगळागौर, हरतालिका पूजन, वसंतोत्सव या सणांच्या माध्यमांतून. काही व्रतवैकल्ये केली जातात. त्यानिमित्ताने उपवास केले जातात. अधून-मधून पंचनेंद्रियांनाही सुटी देऊन लंघन करा. परमेश्वर चिंतनात वेळ घालवा. त्यामुळे सुसंस्कारित मन तयार होईल. ही गोष्ट घर, समाज, राष्ट्र, जग अशा विस्तृत परीघातून धावू लागेल. संस्कार हा मध्यबिंदू मानला तर त्यापासून होणारे फायदे परीघाप्रमाणे विस्तारत जातील.

राखी पौर्णिमा हा विश्वबंधुत्वाची जाणीव करून देणारा. या राखीच्या मुलायम सुंदर धाग्यात केवढे सामर्थ्य दडलेले आहे. किती उदात्त भावना आहे. पाशवीवृत्तीला बांधून ठेवणारा, प्रचंड शक्ती असणारा हा धागा केवढे तरी संस्कार करतो. बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते दृढ करणारा, कर्तव्य भावना जागृत ठेवणारा हा सण संस्कारांचे उत्तम साधनच नाही का?

निबंध Maza Avadta San

‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ या सणाची उज्ज्वल परंपरा आमच्यावर उत्तम संस्कारच करतात. सीमोल्लंघन यातही महान संस्कार दडलेला आहे. ‘रूढीचा गड खाली उतरा, पाकोळ्या घुबडांना उडवा, जिवंत सोने अखंड लुटवा, कृपण मनाचा रस्ता खुटवा, असा साजरा कराच दसरा’ अशा खणखणीत शब्दांतून समाजप्रबोधन करणारे राम गणेश गडकरी, या सणाच्या निमित्ताने संस्कारच रुजवण्यास सांगतात.

निर्जीव वस्तूंबाबतही संवेदनशीलता हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य. झाडू, चूल यासारख्या वस्तू आपल्या जीवनात फार महत्त्वाच्या, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता असली पाहिजे. म्हणून शिळाष्टमीच्या दिवशी चुलीला विश्रांती. बैल वर्षभर राबत असतात. त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त होते ‘बैलपोळा’ या सणाच्या माध्यमातून. नारळी पौर्णिमेला दर्यापुत्र सोन्याचा नारळ सागराला अर्पण करतात. कोळीगीतांतून आपल्या भावना व्यक्त करतात.

मित्रांनो, सण साजरे कराच, पण त्यामागे असलेला हेतू नीट समजून घ्या.. संक्रांतीला फक्त तीळगूळ देतानाच गोड बोला असं बजावू नका. त्याचे काटेकोर पालन करा. त्यामुळे समाजातील कटुता समूळ नष्ट होईल. व ‘जो खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’ हे ज्ञानदेवांचे पसायदान पूर्ण होईल. गणेशोत्सव साजरा करताना मूळ हेतूपासून दूर जाऊ नका. मनोरंजन या माध्यमातून संस्कारांचे आदान-प्रदान करूया..

सण साजरे करताना स्वतः आनंद मिळवू या अन् इतरांनाही त्या आनंदात सहभागी करून घेऊया. स्पर्धेच्या निमित्ताने विषय पुढे आला. माझे विचार त्या निमित्ताने प्रकट केले. आपण सगळे मिळून विचारमंथन करूया आणि हो, त्या विचारांना दृढ करून प्रत्यक्ष कृतीत उतरवू या.

अधिक वाचा :

Download File

Leave a Comment