Essay On Pollution In Marathi
प्रदूषण मराठी निबंध
मित्रांनो, सध्या सगळ्यांना भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषण या प्रदूषणाने रौद्ररूप धारण केले आहे. त्याविषयी मी माझे काही विचार आज तुमच्यासमोर मांडणार आहे.
आपण राहतो त्या परिसराला ‘पर्यावरण’ म्हणतात. तो परिसर स्वच्छ, प्रदूषणविरहित असला तरच आपले आरोग्य चांगले राहील. आपले आरोग्य आपल्याच हाती आहे. आपल्या सवयींवर आपला परिसर कसा आहे हे ठरते. आपले वैयक्तिक आरोग्य तर आपल्या सवयींवरच अवलंबून आहे. पण त्याच सवयींचा परिणाम घर, समाज, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, मग संपूर्ण जग या सर्वांवर होत असतो.
रोग टाळायचे असतील, आरोग्य उत्तम राखायचे असेल तर स्वच्छता पाळणे आपले कर्तव्य ठरते. सॅनिटेशन फेडरेशन, यू.एस.ए.च्या मते स्वच्छता ही एक जीवनशैली आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये स्वच्छता ही जीवनशैली असल्याने तेथे रोगांचे प्रमाण नगण्य आहे.
Essay On Pollution In Marathi
व्यक्तिगत स्वच्छतेवर परिसराची स्वच्छता अवलंबून आहे. कारखान्यांतील धूर, वाहनांमुळे होणारा धूर, आवाज, वृक्षतोड इ. गोष्टींमुळे आज पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे व तो प्रदूषित बनत आहे.
मानवाने पृथ्वीवर भौतिक सुखाने सज्ज असा स्वर्ग निर्माण केला पण आज भौतिक प्रगतीच्या भ्रामक नावाखाली पृथ्वीच्या पर्यावरणावरच घाला घातला. आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या निसर्ग नियमानुसार व्यवस्थापन होत नाही. कोट्यवधी वृक्षांची तोड होत आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूची टंचाई निर्माण होत आहे. प्लॅस्टिकचे एक नवे संकट पृथ्वीवर निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कचऱ्यात भर पडत आहे.
हिरोशिमावर विध्वंसक अणुबॉम्ब टाकणारे, भोपाळच्या वायुगळतीस जबाबदार असणारे चेनेबिल व थ्रीमाईल, आयलंड येथील अणुभट्ट्यांमध्ये अपघात घडवून आणणारे, कारखान्यातून धुरांचे लोट हवेत सोडणारे, पवित्र नद्यांचे पाणी प्रदूषित करणारे, अमर्याद खाणी खणून पृथ्वीच्या पोटात शिरणारे सर्वच पृथ्वीचे लुटारूच नाहीत का?
वेदकाळापासून मानवाला निसर्गसंपत्तीचे महत्त्व चांगले माहीत आहे. पृथ्वीला आपण भारतीयांनी देवता मानले आहे.
स्योना पृथिवी भवा नृक्षरा निवेशनी
यच्छं न शर्म सप्रथः ।
ही ऋग्वेदातील प्रार्थना. यातून पृथ्वीला असे म्हटले आहे की, ‘तू प्रसत्र होऊन, आपल्या पृष्ठभागावर सर्वांना सामावून घेतले आहेस. तू आम्हांला सौख्य प्राप्त करून दे.’
श्रीराम वसुंधरेला, “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादऽपि गरियसी।” असं म्हटलं आहे.
पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. वृक्षतोड थांबली तर पाहिजेच, पण प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे. तरच पावसाचे घटलेले प्रमाण वाढेल. जमिनीची धूप थांबेल. दुष्काळाला नियंत्रण होईल. त्यासाठी सामाजिक वनीकरण मोहीम राबवली पाहिजे.
आज उत्सवाच्या निमित्ताने जोरजोरात स्पीकर्सवर गाणी वाजवली जातात. त्यामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध, आजारी या साऱ्यांनाच त्रास होतो. कर्कश ध्वनीमुळे रक्तदाब वाढतो, त्याचा हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य धोक्यात येते.
तेव्हा मित्रांनो, या प्रदूषणाबद्दल केवळ घोषणा देऊन, भाषणे देऊन चालणार नाही. गरज आहे कृतीची. सामुदायिक प्रयत्नांची. प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक या प्रदूषणाच्या भस्मासुराला दूर पळवून लावले तरच आपले जीवन सुखमय, निरामय होईल. अन्यथा विनाश दूर नाही.
पळवून लावा, प्रदुषणाचा भस्मासूर
दुःख, विनाश, अनारोग्य होईल दूर
त्यासाठी करूया सामुदायिक प्रयत्न
गवसेल यातून आरोग्यदायी रत्न ।
अधिक वाचा :