Lokmanya Tilak Bhashan, Essay in Marathi
आज लोकमान्य टिळक असते तर…
Lokmanya Tilak: श्रावणसरी कोसळू लागल्या. सण उत्सव यांना उधाण आलं. गोकुळअष्टमी आली. दहीहंड्या लटकू लागल्या. गोविंदांची धांदल उडाली. ते उंच-उंच मानवी मनोरे पाहून पोटात धस्स् होत होतं. खरंच एवढं साहस कशासाठी? अनेक प्रश्न सामोरे ठाकले. या साऱ्या उत्सवांची गरज आहे का? यातल्या कितीजणांना उत्सवांची उपयुक्तता कळलीय? आपण सारेच केवळ निर्भेळ आनंदासाठी उत्सव साजरे करतो का? अनेक प्रश्न पिंगा घालत होते. उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो. तोच श्रावण सरला, भाद्रपद आला. अरुंद रस्त्यात सुद्धा भले मोठे मांडव. कार्यकर्त्यांची धावपळ. वर्गणीसाठी दारोदार भटकंती. वेळप्रसंगी दमदाट्या. ऐच्छिक वर्गणीची जागा सक्तीने घेतली. आधीच विकोपाला गेलेल्या प्रदूषणात भर पडली.
गणेशोत्सव म्हटलं की, सगळ्यांनाच आठवण येते ती लोकमान्य टिळकांची. गजानन हा विघ्नहर्ता. चौदा विद्या, चौसष्ट कला अवगत असलेली ही देवता. तिच्या आशीर्वादाने देशावरील परचक्र जाऊ दे, अन् स्वातंत्र्यसूर्याचा उदय होऊ दे, अशी मनीषा बाळगून सर्वांना एकत्रित आणण्यासाठी टिळकांनी या उत्सवाची कल्पना साकारली. पण आज… या उदात्त हेतूला मूठमाती दिली जातीय. गणपतीच्या नावावर पैशांची उधळपट्टी. विजेचा अपव्यय. ध्वनिवर्धकावरील अश्लील गाणी, अंगविक्षेप करून नाचणारी तरुण पिढी हे सगळं पाहून खरंच टिळक गरजले असते, “बंद करा तो गणेशोत्सव”
गणेशोत्सव काय नि शिवजयंती काय, साऱ्यांचीच विटंबना. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिवाचे रान करणारा हा जाणता राजा. त्याच्या नावावर काय काय चाललंय? आपण सारे सुज्ञ आहात. जाणताच. याबाबत अधिक न बोलणे बरे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज टिळकच हवे होते हे मात्र नक्की.
Lokmanya Tilak Information In Marathi
टिळकांनी सांगितलेल्या चतु:सूत्रीपैकी एक सूत्र म्हणजे स्वदेशी. आज आम्हां भारतीयांची स्वदेशीवर निष्ठा आहे का? आपल्या देशबांधवांना प्रोत्साहन द्यावं नि आपल्या देशातील पैसा आपल्याच देशात राहावा हा साधा विचार नसावा? परदेशी वस्तूंनी भारताची व्यापारपेठ व्यापलीय. अन्न खायचं आपल्या देशातील अन् कौतुक करायचं इंपोर्टेड वस्तूंचं, आजही आपला देश यंत्र व औषधे याबाबत मागासलेला आहे, त्यात सुधारणा करण्याऐवजी आम्ही सावण, कात्र्या, छत्र्या यांच्या खरेदीत आनंद मानतो आहोत. टिळक असते तर त्यांनी नक्कीच या सर्व गोष्टींवर अंकुश ठेवला असता.
आज सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक सर्वच क्षेत्रांत नैतिक अध:पतन होत आहे. संस्कृती लोप पावत चाललीय. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण केलं जात आहे. त्यामुळे आमची कुटुंबव्यवस्था धोक्यात येत आहे. घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. संस्कारशून्य आजची पिढी उद्याचा समर्थ भारत कसा घडवणार? देशाचा विकास कसा घडणार? शाळा, कॉलेज यातून सकस ज्ञान मिळतं का? सगळ्यांचंच व्यापारीकरण. शालेय जीवनातच मनुष्य घडला पाहिजे. तरच तो सुदृढ समाज निर्माण करू शकेल. समाज चंगळवादाच्या भोवऱ्यात फिरत आहे. त्यातून सामाजिक लोकशाही संपुष्टात येत आहे.. भ्रष्टाचार शिष्टाचार होत आहे. स्वराज्य मिळालं पण सुराज्याचं काय? टिळकांसारखा नेता आज नाही याची खंत वाटते. त्यांची सिंहगर्जना लोकांच्या कानात घुमली पाहिजे. स्वराज्य मिळविण्याच्या महान कार्यात टिळकांनी समाजातील तळागाळातील लोकांना जागं केलं. सगळा समाज ढवळून काढला. लोकजागृती करण्याची प्रचंड शक्ती असलेला टिळकांसारखा झुंझार नेता आज असला तर तो पुन्हा एकदा गरजला असता,
“स्वराज्याचे सुराज्य करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी बजावणारच. “
राजकीय क्षेत्रातील नैतिक अध:पातन चिंतनीय बनत आहे. गठ्ठा मतं मिळविण्यासाठी फसवणूक, कुटिलता. देशाला स्वातंत्र्य ५६ वर्षे झाली तरी नेत्यांच्या फक्त फुसक्या घोषणाच. संसदेतील सावळा गोंधळा. खुर्चीसाठी धडपड. देशविकासापेक्षा स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच प्रयत्न. अनेक घोटाळे त्यावर नेमलेले आयोग. नुसताच काही दिवस गदारोळ मग हळूच त्यावर पडदा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या नाहीत तर इतर सुधारणा दूरच. वर्षानुवर्षे चिघळतच चाललेला काश्मीर प्रश्न. दीर्घकाळ चाललेला हिंसाचार, दहशतवाद हे सारं पाहिलं की वाटतं. टिळकच हवे होते. ते आज असते तर अक्षरधाम, संसद, देशातील राजधान्या यावर बॉम्बहल्ले झालेच नसते.
विज्ञानाने प्रगती केली खरी. वर्षानुवर्षांची संस्कृती, परंपरा नष्ट करण्यासाठी? बंदुकांचा वापर एखाद्या खेळण्याप्रमाणे होत आहे. सर्वत्रच अशाश्वती, अशांती. रामराज्याची कल्पना वास्तवात येणारच नाही का? या सगळ्याचे परिणाम काय? आमच्या देशातील बुद्धीला परदेशात उत्तम दाम मिळतंय. अशावेळी आपल्या अनिश्चित, लहरी देशाला बाय बाय म्हणत सुखेनैव परदेशात विराजमान होतील तरच नवल.
खरंच टिळकांसारखं नेतृत्वच आज देशाला हवं आहे. टिळक जर आज असते तर अशी देशाची अधोगती झालीच नसती.
ही सर्व विदारक दृश्यं अस्वस्थ करतात. वास्तव नजरेआड करता येत नाही. पण वास्तवाचा स्वीकार करायलाही मन धजावत नाही. हंबरडा फोडून साद घालावीशी वाटते, “खरंच, टिळक आज तुम्ही असता तर…!” बेबंदशाहीवर अंकुश घालण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्यामध्येच आहे. जनजागृतीचा जागर करण्याची ताकद तुमच्याशिवाय अन्य कोणातही नाही. तुम्ही घालून दिलेल्या आदर्शाचा या पिढीला विसर पडत चाललाय. विस्कटलेली समाजाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवा.
टिळकांच्या आठवणीने नकळत डोळ्यांतून अश्रू ओघळतात. वाणी थिजून जाते. उमाळे दाटून येतात. हृदयात कालवाकालव होते नि हंबरडा फोडून हाक मारावीशी वाटते. टिळक पुन्हा अवतार घ्या नि या देशाला वाचवा.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे।