Majha avadata kavi माझा आवडता कवी
तुझ्याच शब्दे मिरवी हिरवळ ही हिरवी
तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी
तुच एकला फुलराणीला गोड-गोड लाजवी
निसर्ग तुझा तू निसर्गा बालकवी तू निसर्ग कवी
बालकवीने निसर्गाला बोलायला, चालायला शिकवलं, डौल मिरवायला लावलं, लाजायला शिकवलं आणि मनात असणाऱ्या साऱ्या सुंदर भाव-भावनांना निसर्ग व्यक्त करू लागला. तो बालकविण्या शब्दात बालकवींनी निसर्गाला इतके खुलवले, इतके फुलवले की, निसर्गानेही स्तिमित व्हावे आणि नवलाईने स्वतःशी म्हणावे.
“खरचं इतका का मी सुंदर आहे
आनंदी-आनंद गडे जिकडे-तिकडे चोहीकडे”
अशी लकरे बालकवीनी मारली आणि निसर्गही भारून गेला.
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे
अशी कल्पना असणाऱ्या बालकवींचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींचा जन्म खानदेशातील धरण गावी झाला. घरचे जुने धार्मिक वळण, आई-आजीकडून भूपाळ्या स्तोत्रे, अभंग यांचे स्वर कानी पडत. थोरली बहीण, जीजी जिने बालकवींना जपले, जोजावले कवितेची गोडी जीजीनेच बालकवींना लावली. १९१० साली जळगावात झालेल्या कवि संमेलनात बालकवींना रसिकमान्यता प्राप्त झाली. तो क्षण बालकवीच्या आयुष्यातील सर्वांत रत्नकांचनी ठरला. याच वेळी ठिळक पती-पत्नीची माया बालकवींना लाभली. संसारातील उदासिनतेवर टिळक पती-पत्नीची माया व कविता हाच उतारा ठरला.
पहाट फुटली की सूर्य किरणांनी पृथ्वीकडे झेप घ्यावी, अशा सहज मधूर कविता बालकवीच्या कणतून उमलत असे. आणि तिच्या शब्दाशब्दातून डोकावे. निसर्ग बालकवीची, निसर्गाशी असलेली तन्मयता, निसर्गाशी नाजूक असे जुळलेले भावबंध याने रसिकच काय निसर्गही भारला गेला. त्यालाही
सत्याची स्वप्ने व्हावी, सत्याला स्वप्ने यावी
स्वप्नीही स्वप्ने बघत, स्वप्नातच व्हावा अंत
असे वाटू लागले फुलराणी, रविकिरणांना भेटली आणि बालकवि फुलराणीला लाडिकपणे विचारू लागले. तो रविकर का गोजिरवाणा आवडला आमुच्या राणींना, लाज लाजली या कवणांनी साधी भोळी ती फुलराणी तर संध्या रजनीमध्ये
विश्व शिरावर टोप चढवला हिऱ्यामणकांचा
मंगल-मंगल जिकडे तिकडे जय मांगल्याचा
असा मांगल्याचा जय-जयकार झाला. मेघांचे पडदे धुऊन स्वच्छ झाले.
पूर्व समुद्री छाय पसरली रम्य सुवर्णाची
कुणी उधळली मूह नभी ही लाल गुलालाची
अशी रंगांची उधळण करीत श्रावणमास आला
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिखे क्षणात फिरून उन पडे
हे अचूक वर्णन लेवून धन्य झाला. निळ्या सावळ्या जलात पाय टाकून औदुंबरानं समाधी लावली. मानवी मनांच्या साया साच्या भावनांना लेवून निसर्ग तृप्त झाला, कृतार्थ झाला. निसर्गाचा बालकवींना ध्यास लागला. आपल्या प्रत्येक हालचालीतून तो बालकवींना साकार करू लागला. विश्वाची एकात्मता हे त्याचे गाणे झाले आणि विश्वाच्या या पसाऱ्यातून मिटून जाण्याची तादात्म्य पावण्याची ओढ बालकवींना लागली.
शिणली काया शिणली माया
शिणले लोकाचार
सौख्यही शिणले दुःखही शिणले
शिणले तत्त्वविचार
अशा मनाच्या अवस्थेत त्यांना
यमदूतांना बोलावले ते सुद्धा
गिरी शिखरावर आपसरीनी
काळ्या अंधारात दडोनी
किंवा पडक्या बुरुजावरूनी शब्द येतात
चल नको बसू जगतात
असे, नियतीनेही चटकन ऐकले. कारण नियती म्हणजे निसर्गाची एक वेदना आणि निसर्ग तर बालकवींचा गुलाम.
१९९८ साली एक मालगाडी धडधडत आली आणि विचारांच्या आवर्तात असणाऱ्या बालकवींच्या आयुष्याला पूर्णविराम देऊन गेली. अवघ्या २८ व्या वर्षी.
त्या वेळी एखादी फुलराणी फुलता-फुलता थांबली असेल. एखादा निर्झर वाहता-वाहता थबकला असेल.. एखाद्या औदुंबरानं एखाद्या चांदणीनं मोत्यासारखी आसवं ढाळली असतील आपल्याला न दिसणारी
मूळ सदन करितो निसर्ग सारी चैतन्य निजली
हिरवी हिरवळ फुलराणी चांदणी आस्वात भिजली
तव शब्दांची गधित सुमने रसिक मनात रुजली
वाहते निसर्गसूता तूजला माझी शब्दांजली.