शकुनी महाभारतातील व्यक्तिरेखा
“हे फासे म्हणजे माझं अजिंक्य सैन्य आहे आणि कोणत्याही पराक्रमी सम्राटाला अंकित करण्याचे सामर्थ्य या फाशात आहे..” गांधारपुत्र शकुनीचे हे वाक्य म्हणजे त्याच्या दृष्ट प्रवृत्तीचे, द्युतातील अजिंक्यत्वाचे द्योतक आहे. गांधारपुत्र शकुनी हा आमच्या महाभारताचा खलपुरुष केवळ महाभारतातीलच नव्हे तर सान्या भारत वर्षांतील तो आखलपुरुष मानला पाहिजे. महाभारतात शकुनीचे आगमन तसे उशिराच होते. सत्यवतीचा अंध पुत्र धृतराष्ट्र यांचा विवाह गांधारकन्या गांधारीशी निश्चित होतो आणि आपल्या सौंदर्यवती बहिणीच्या नशिबी अंध पती आलेला पाहून शकुनी व्याकुळ होतो. त्यातच त्या अंध पतीला कुरूंचे सम्राटपद तात्पुरते मिळालेले उसने असे आहे. आणि त्यावर त्याचा कोणताही निश्चित अधिकार नाही, हे कळाल्यावर आपल्या बहिणीचे भविष्य अधांतरी आहे. त्याची शकुनीला खात्रीच पटली. बहिणीच्या भविष्याला निश्चित दिशा देणे हेच आपले जीवित कार्य शकुनीने निश्चित केले आणि इथून पंडू आणि त्यांच्या पुत्रांबद्दल शकुनीच्या मनात प्रथम वैर जन्मले. पंडूचा व त्याच्या पुत्रांचा समूळ नाश केल्याशिवाय आपल्या बहिणीला या कुरुकुलात निश्चित स्थान मिळणार नाही, अशी जणू त्याची खात्रीच पटली आणि बहिणीचे अकल्याण होणार याच भावनेतून त्याच्या खलप्रवृत्तीचा जन्म झाला.
शकुनी गांधारपुत्र असला, युवराज असला तरी शरीर सामर्थ्याने तसा कमकुवत होता. त्यातच मनाचा कल खल प्रवृत्तीकडे अशातच पंडूचे पाचही पुत्र महापराक्रमी निघाले. अशा वेळी आपल्या द्युतातील नैपुण्याचा उपयोग करून घेण्याचे शकुनीने ठरवले. त्यात नवल ते काय? त्यातच धृतराष्ट्र राज्य लालसेने वेडापिसा झालेला आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र महा महत्वाकांक्ष यामुळे शकुनीच्या खलप्रवृतीला खतपाणी मिळाले. येन केन प्रकारेने आपला हेतू साध्य करून घेण्यास शकुनी मोकळा झाला.
शकुनीने पांडवांचा सर्वनाश एवढा एकच हेतू मनाशी बाळगला आणि शेवटपर्यंत तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला. कृष्णाच्या चतुराईने पांडवांची सरशी होतच होती आणि शकुनी अधिकच पिसाळत होता. दुर्योधनाच्या मनात पांडवांबद्दलचे द्वेष वाढविण्याचे, वैरत्व जोपासण्याचे काम शकुनी इमाने इतबारे करीत होता. पांडवांच्या प्रत्येक विजयाबद्दल शकुनीच्या मनात सुडाची भावना अधिकच प्रज्वलित होत होती. अशातच युधीष्ठिर सम्राट बनला. त्याने राजसूय यज्ञ केला. हर प्रकारे पांडवांना खळून, अपमानित करून, हाकलून देऊन देखील पांडवांच्या लोकप्रियतेला कुठेही धक्का पोचत नव्हता. राजसूय यज्ञाने तर त्यावर कळसच चढविला होता आणि शकुनीच्या डोक्यात एक दृष्ट कल्पना जन्मली कुटील कारस्थान आकार घेऊ लागले. वैरत्वाने विवेकावर मात केली. राक्षसी महत्त्वकांक्षेने विचारांना मूठमाती दिली. युधीष्ठिराला द्युताचे व्यसन आहे हे शकुनी जाणून होता. बस्स! ठरले, युधीष्ठिरला द्युताचे आमंत्रण द्यायचे झुताला नकार द्यायचा नाही हा सम्राटांचा रितीरिवाज शकुनीच्या मदतीला धावून आला आणि युधीष्ठिर शकुनीबरोबर द्युत खेळायला बसला. द्युतातील फासे शकुनीचे गुलाम होते. ९ डावातच होत्याचे नव्हते झाले. सम्राट युधीष्ठिर आपले पाच पराक्रमी भाऊ व पत्नी द्रौपदीसमवेत कौरवांचा दास बनला. शकुनीचे केव्हाचे स्वप्न पुरे झाले. त्यांच्या पराक्रमी अजिंक्य सैनिकांनी त्याला मात मिळवून दिली होती आणि तिथच शकुनीच्या जन्माचे सार्थक झाले. महाभारतात पुढे धर्मयुद्ध झाले, भगवदगीता जन्मली, शकुनी सहदेवाच्या हातून मारला गेला. यायापेक्षा शकुनीच्या जीवनाचे सार्थक पांडवांना दास गुलाम बनविण्यात होते आणि ते सुद्धा फाशाच्या साहाय्याने, त्यात तो यशस्वी झाला आणि इथंच शकुनीतला खलपुरुष तृप्त झाला, धन्य झाला.