उष:काल होता-होता काळरात्र झाली | marathi essay Ratra jhali

उष:काल होता-होता काळरात्र झाली !

रात्रीचा दुसरा प्रहर. एका अनोख्या अभूतपूर्व युगाची सुरुवात त्यादिवशी झाली. रात्रीचे दोन प्रहर बाकी असतानादेखील दाही दिशा उजळून निघाल्या होत्या. एका तेजस्वी पहाट पर्वाला प्रारंभ झाला होता. शतकानुशतकाचे गुलामीचे जोखड आम्ही भिरकावून दिले होते. आम्ही स्वतंत्र भारतीय झालो होतो. त्या दिवशाचा सूर्यही काही वेगळाच, अधिकच तेजस्वी भासत होता. आम्ही सारे स्वतंत्र भारताचे रहिवासी त्याला आळवत होतो.

दीप्तीचे ध्वज केशर कांचन
विश्वावर रोवित ये
कोटी-कोटी या मुकुल दलांवर
जीवन अमृत शिंपित ये
ज्वालामय रथचक्राखाली
दुर्ग तमाचे फोडीत ये
लक्ष युगांचे सुवर्ण बंधने
कमलकराने जोडीत ये

आणि खरंच! तो तेजाचा स्त्रोत असलेला भास्काराचा सुवर्णरथ लक्षावधी किरणशलाका फेकीत भारत भूमीवर अवतरला होता आणि त्याचा सुवर्ण कणांनी न्हाऊन निघालेला आमचा तिरंगा कोट्यवधी मुजरे घेत आकाशात फडकत होता. सगळं कसं मंगल मंगल, जिकडे तिकडे जय मंगल्याचा असं वातावरण होत. अचानक, अचानक एक काळा राक्षसी ढंग त्या तेजोनिधीला ग्रासू लागला. बघता बघता त्याने सहस्त्ररश्मीला गोळंकृत केले. जणू एखादा भयानक शापच आणि आणि काय सांगू मित्रांनो. साच्या भारतवासीयांनी एकच टाहो फोडला एकच आकांत केला

उष:काल होता होता
काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या
पेटवा मशाली

होय! या अंधारयुगाला नाहीसे करण्यासाठीच आयुष्याच्याच मशाली पेटविल्या पाहिजेत. ही काळरात्र आली. जातीय दंग्याचे रूप घेऊन तिने फाळणीचा कली सोडला आणि सारा भारत जातीय आणि धार्मिक दंग्यात होरपळून निघाला. १९४८ ला झालेल्या फाळणीच्या वेळचा दंगा, अजूनही आपली अजख भूक भागवू शकला नाही. हजारो हिंदू, मुस्लिमांचे प्राण घेऊनही तो शांत झाला नाही. आजही धुमसत्या ज्वालामुखीप्रमाणे तो धुमसत आहे. आजही कधी-कधी तो जागृत होतो आहे आणि रामजन्मभूमी, बाबर-मस्जिद, खलिस्तान L.T.T.E. इ. रूपात तो संघर्षाने रसरसलेला लाव्हा बाहेर फेकतो आहे. पुन्हा आमच्या एकत्वाची, एकात्मतेची क्सोटी लागते आणि मनात खदखदणारी ही संघर्षाची भावना घेऊनच आम्ही गातो आहोत..

हिंद देश के निवासी सभी जन एक है,
रंग-रूप-वेष भाषा चाहे अनेक है।

जन्माला आली महाभयंकर गुन्हेगारी, त्या काळरात्रीचे हे तिसरे रूप होते. एखाद्या विषवल्लीसारखी ही गुन्हेगारी झपाट्याने फोफावली, काळा बाजार, स्मगलिंग, ड्रग्ज, चरस, टोळीयुद्ध ही त्या विषवल्लीची काही अपत्ये या जल्द पैसा देणाऱ्या धंद्याकडे तरुण आकर्षिले गेले, शिक्षणाची होती तीही प्रतिष्ठा कमी झाली आणि दोनदा शाळेतून हद्दपार केलेला हर्षद मेहता, यावर कळस चढवून देश विकायला निघाला. गरिबांचे रक्त शिंपून धनिकांनी महाल बांधले आणि माझा देश, माझा देश असा अभिमान बाळगणारे आम्ही सच्चे भारतीय त्या काळरात्रीत बुडून गेलो.

तिजोऱ्यात केले त्यांनी
बंद स्वर्ग साती
उडे धुळमाती आम्ही तो समशाने ज्यांना
आम्हावरी संसाराची
प्रेत ही नवाली

अशा किंकाळ्या मारत राहिलो. त्या काळरात्रीचे सर्वांत धोकादायक रूप ठरले. राजकारणाचे सत्ता, खुर्ची, अगणित पैसा या तीन प्रलोभनांना बळी पडले. आमचे देशभक्त आणि मग राजकारणान भारतात असतील नसतील तेवढ्या साच्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. राजकारणाने भ्रष्टाचाराला प्रतिनिधी म्हणून नेमले आणि साच्या क्षेत्राला गटारगंगेचे स्वरूप आले. मग कुणी नोकरी लावण्यासाठी ६० हजार रुपये मागू लागला तर कुणी डॉक्टरकीच्या प्रवेशासाठी १३,००,००० रुपये, संस्था निर्माण करणारा संस्थाचालक संस्थानिक बनू लागला आणि ‘विनासहकार नाही उद्धार’ असे म्हणत एकमेकांच्या सहकार्यातून समृद्धी साधली जाऊ लागली.

मित्रांनो, या काळरात्रीचा महिमा किती म्हणून गावा? अर्थात कोळशापेक्षाही काळी असणारी ही रात कितीही गायिली तरी तिला उष:कालाचे रूप प्राप्त होणार नाही. पण म्हणून उष:कालाची वाट पाहायचीच नाही का? आयुष्याचा का होईना पण मशाली पेटवून ही काळरात्र नाहीशी करता येणार आहे ना? कारण

धुमसतात अजूनी भिजल्या
चिंताचे निखारे
अजून रक्त मागत उठती
वधस्तंभ स्वारे

मग ते अर्ध्या रक्ताचेच ना? आपण देऊया. आसवेच स्वतंत्र्याची आम्हाला मिळाली. हे जरी खरे असले तरी ती आसवे स्वतंत्र्याची होती. त्यालाही मोल होते. हे मोल जर आमच्या प्राणत्यागाने चुकवे जाणार असेल तर त्यासाठी आम्ही भारतीय केव्हाही तयार आहेत.

Download File

Leave a Comment