जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध | jivanat Khelache mahatva in marathi

जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध | jivanat Khelache mahatva in marathi

खेळ असावा निखळ

jivanat Khelache mahatva in marathi: खेळ म्हणजे क्रीडा. करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो, आनंद मिळतो ती क्रीडा. आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात, दु:ख, चिंता, विवंचना या सगळ्यांतून काही क्षण तरी सुख, आनंद मिळवता यावे यासाठी आपण खेळतो. रोजचे काम प्रत्येकाला करावेच लागते. तेच तेच काम करून कंटाळा येतो. त्यातून थोडासा बदल घडवून करमणूक व्हावी यासाठी आपण एखादा नाटकाचा प्रयोग देखील बघतो. एखादा चित्रपटही बघतो. या करमणुकीच्या प्रयोगांना देखील खेळच म्हणतात. म्हणजेच बघा, आपण आपल्या मनावरील दडपड कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपलं जीवन हा देखील एक खेळच आहे. हो अगदी दोन घडीचा डाव.

दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव.

हासत हासत झेलू आपण पराजयाचे घाव.

खेळ म्हटला की, जय, पराजय, यश, अपयश हे आलंच. जीवनाचा खेळ म्हणजे यश-अपयश यांचा लपंडावच. मग यशानं हुरळून जाऊ नका आणि पराजयाने खचून जाऊ नका. असा मोलाचा संदेश या खेळामागून येतोच. मग हे जर सत्य आहे तर खेळ निखळ म्हणजे शुद्ध का असू नये? खेळ निर्भेळ आनंदासाठी खेळला जातो. मग त्यातून दुःख, पश्चात्ताप का निर्माण होतो, याचाही कुठेतरी विचार केला जातो.

खेळ अगदी प्राचीन काळापासून खेळला जाऊ लागला. त्यावेळी तो खेळकरपणे खेळला जाऊ लागला. गंमत वाटावी, विरंगुळा मिळावा म्हणून. ग्रीस देशात प्रथम ऑलिंपिक खेळाची संकल्पना रुजली. १८९६ मध्ये स्पर्धेसाठी निधी उभारला. पोस्टाचे तिकिट प्रसिद्ध करून त्यातून जगभर ऑलिंपिकचा संदेश पोहोचवला. एकेमकांत गुंफलेली पाच वर्तुळे म्हणजे एकात्मतेचे प्रतीक हेच या स्पर्धेसाठी बोधचिन्ह मानले गेले. हेच चिन्ह ध्वजावर कोरले गेले. ‘सायटस, अल्टीअस आणि फॉर्टिअस’ हे तीन शब्द त्याचे बोधवाक्य होते. याचाच अर्थ अधिक गतिमान, अधिक उंच आणि अधिक सामर्थ्यवान. या सर्व गोष्टींवरून खेळामागील उद्देश निखळ होता हेच सिद्ध होते.

जीवनात यशस्वी होणे यापेक्षाही त्यासाठी झगडणे ही जशी महत्त्वाची बाब आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्यावर विजय मिळविणे यापेक्षा स्पर्धेत भाग घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

आपणच जिंकलं पाहिजे या ईर्षेपायी खेळामागील मूळ कल्पनेला धक्का लागेल अशी काही कृत्ये नेहमीच घडत असतात. ध्वजच पळवून नेणे, मैदानातून खेळाडूंना पळवून नेणे, स्वतःच जिंकण्यासाठी उत्तेजक पेय घेणे, पंचांनी चुकीचा निर्णय देणे, मैदानातील गैरवर्तन, प्रसिद्धीची हाव, पैसा मिळवणं या सर्व गोष्टी पाहिल्या की, वाटतं खेळ निखळ आहे का?

महाभारतातील उदाहरण बघा, कौरव-पांडव द्युत खेळले. त्यातही कारस्थान होतंच. निखळता नव्हती. प्रसंगी द्रौपदीला पणाला लावलं गेलं. हा खेळाचा हेतू असू शकतो का? खेळातील निखळता कृष्णाच्या सवंगड्यांच्या खेळाप्रमाणे असायला हवी. बाल शिवाजी जशी आपल्या सवंगड्यांसमवेत लुटुपुटूची लढाई खेळत होता तशी हवी. खेळातला रडीचा, चिडीचा डाव तिथल्या तिथं संपतो. त्यातही एक मोठी मौज असते. पण आजकाल खेळाला महत्त्व प्राप्त झालं. पैसा, प्रसिद्धी मिळू लागली. त्याबरोबर त्यात राजकारण शिरलं. स्पर्धा शिरली. जीवघेणी चढाओढ सुरू झाली. चढाओढ म्हणजे काय चढणाऱ्याला ओढणं.

jivanat Khelache mahatva in marathi (600 words)

खेळ म्हटलं की स्पर्धा आली. पण त्याआधी प्रत्येकाचा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा. त्यातून संघ तयार होतो. मग वैयक्तिक गुण, दोष तेच संघाच्या रूपाने जगापुढे येतात. मग त्यातून खेळातील आनंद निघून जातो. चांगल्या खेळाडूंवर अन्याय होतो.

याची काही उदाहरणे बघितली म्हणजे लक्षात येईल की, मी हे जे काही म्हणतोय ते किती खरं आहे, सार्थ आहे. आता बघा, बऱ्याच खेळांसाठीचे संघ निवडताना कोटा पद्धत वापरली जाते. त्यामध्ये असोसिएशनमधील राज्यांचे प्रतिनिधी असतात त्या राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू संघामध्ये असतात. इतर राज्यातले चांगले खेळाडू मात्र बाहेर बसवले जाऊन त्यांच्यावर अन्याय घडतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाणे म्हणजे संघर्षाची नांदीच असते. संघर्ष हा काही आनंददायी नसतो.

आता धनराज पिल्लेचंच उदाहरण घ्या ना. त्याला आपला न्याय्य हक्क मिळविण्यासाठी झगडावंच लागलं. नुकतंच आपण ऐकलं की, ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूवर खेळ चालू असताना टीका करतात, वाकुल्या दाखवतात. चक्क रन काढताना आडवे येऊन त्रास देतात. जावेद मियांदाद व डेनिस लीलीची मैदानात लाथेनं झालेली मारामारी जगानं पाहिली, तर पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून सामना सोडून कप्तान संतप्त होऊन निघून जायला लागलेलं आपण पाहिलं आहे. जॉन मॅकेनरोला मैदानात गैरवर्तन केलं म्हणून हजारो रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्वांवरून लक्षात येईल की, खेळातला सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे खेळाडू. म्हणजेच त्याची गुणवत्ता, त्याचे चारित्र्य निखळ असेल तरच खेळ निखळ होईल. पण आज दुर्देवानं त्याची वाण आहे, त्यामुळेच आज खेळ निखळ राहिलेला नाही..

खेळाडू असे का वागतात हा प्रश्न मला नेहमी पडतो. मी त्या प्रश्नावर विचार करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की, खेळाचा हेतू, त्यामागील भूमिकाच त्यांनी समजून घेतलेली नसते. “माणसाचे वर्तन हेच त्याच्यावरील संस्कारांचं प्रतिबिंब असतं.” म्हणूनच खेळाडू म्हणजेच माणूस प्रथम सुसंस्कारित हवा. म्हणजे खेळही सुसंस्कृतपणे खेळला जाईल. आडात असेल तरच पोहऱ्यात येणार ना?

मनुष्य आचार, विचार, उच्चार या तिन्ही बाबतींत सुसंस्कृत हवा. त्यात प्रदूषण डोकावलं की सगळा खेळच खलास. मला वाटतं हा सुसंस्कृतपणा माणसापाशी असलाच पाहिजे. नाहीतर पशूत नि आपल्यात फरक काय? निखळ खेळ असावा यावर आपण उपाय शोधलाच पाहिजे. वैयक्तिक पातळीवर खेळता येणारे खेळ खेळावेत. दोरीवरच्या उड्या, लांब उडी, उंच उडी, जॉगिंग, सूर्यनमस्कार, जोर, बैठका, योगासने, जलद चालणे, चेंडूचे टप्पे, मल्लखांब इ. यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत होईलच आणि शरीराचा सुदृढ वापर कशासाठी करायचा हेही समजलं तर खेळातील निखळता टिकेल.

‘शरीर माध्यमं खलु धर्म साधनम्’ असं म्हटलं गेलं आहे. धर्म म्हणजे इथं मानवता धर्म असा अर्थ घेतला तर मानवताधर्म साध्य करण्यासाठी शरीराचा साधन म्हणून वापर करावा. असं मला वाटतं. भारतीय संस्कृतीनं धृ धारयते इति धर्मः। अशी धर्माची व्याख्या केली आहे. पाश्चात्त्य संस्कृती सांगते Health is Wealth म्हणजेच शरीर ही संपत्ती आहे. मला मात्र शरीर धर्मकारणासाठी वापरणाऱ्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो. या संस्कृतीने दिलेल्या मार्गावरून चालणारा भारतीय क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची मला या प्रसंगी आठवण होते. याचे कारण म्हणजे हा खेळाडू खेळ सुसंस्कृतपणे खेळला. खेळातून निवृत्ती घेतल्यावर आयुष्याची दुसरी इनिंग त्यांनी अंधांसाठी काम करून सार्थकी लावली. बघा खेळाडूतील माणूस सुसंस्कृत असेल तर जगण्याबद्दलची धारणा परहिताय बनू शकते.

5G Network (5G नेटवर्क) म्हणजे काय आहे

अशाच एका सुसंस्कृत माणसाने निखळपणे खेळलेल्या खेळाचं उदाहरण मी तुम्हांला सांगतो. भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात गुंडाप्पा विश्वनाथ कॅप्टन होते. सामना रंगात आला असताना पंचांनी एका खेळाडूला बाद दिलं. निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार म्हणून गुंडाप्पा विश्वनाथने पंचांना त्या खेळाडूला खेळू द्यावं अशी विनंती केली. ती विनंती पंचांनी मान्य केली. थोडक्यात पंचांनी पण आपली चूक स्वीकारली आणि त्या खेळाडूला खेळण्याची परवानगी दिली. तो फलंदाज पॅव्हेलियनमध्ये न जाता खेळू लागला. मजा काय झाली पाहा, सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण माझ्या मते हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा कर्णधार विश्वनाथ निखळ खेळाडू म्हणून नोंदवला गेलेला विजय जास्त महत्त्वाचा.

माणूस म्हणून तुम्ही निखळ असाल तरच खेळ निखळ होतो. नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे खेळातील यशापेक्षा मोठं असतं. स्वतःबरोबर इतरही माणसे आहेत याचं भान राखता आले पाहिजे. निखळता म्हणजेच शुद्धता. शुद्धतेचं उत्तम उदाहरण म्हणजे सोन्याचं. सोन्याची शुद्धता तपासून पाहताना त्याला अग्निदिव्यातून जावं लागतं. तेच खेळाच्याही बाबतीत आहे. खेळ खेळणारा खेळाडू माणूसच असतो. मग त्याने आपले व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून घेतले पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर होतो तसा तो दोन व्यक्तींत होतो, दोन संघांत होतो, दोन देशांत होतो. या सर्व पातळीवर होतो तो मानवी व्यवहार, व्यवहार म्हटला की, त्यात सचोटी हवी, नैतिकता हवी. ही मूल्ये चिरंतन टिकणारी आहेत. विजय मिळवायचा असतो निखळ आनंदासाठी. मग त्याचं अध:पतन होता कामा नये. खेळाला नियम आहेत. धर्म आहे. म्हणजेच खेळासाठी ठरवलेले नियम पाळणे हाच खेळाडूचा धर्म. हा धर्म पाळायचा आहे मग नियमातून पळवाटा काढायच्या कशाला? वाद कशाला? फसवून, भांडून मिळवणारा विजय निखळ असेलच कसा? ‘डाव मांडून, भांडून मोडू नको.’ या गीताची आठवण येते.

खेळ आनंदासाठी आहे, त्यासाठी असलेल्या स्पर्धा निमित्त आहेत. मग भारत-पाक सामन्यांच्यावेळी पारंपरिक शत्रू असे विधान ठीक नाही. युद्धातील शत्रू खेळात असू नये. शत्रुत्वाच्या भावनेने खेळ खेळला तर तो खेळच होणार नाही. खेळ असतो आनंदासाठी, पण युद्ध मात्र आनंदासाठी नसते. “खेळ प्राणपणाला लावून खेळला जात नाही, तर कौशल्य पणाला लावून जातो.” म्हणून उत्तमोत्तम कौशल्यात स्पर्धा व्हावी. जीत क्षणिक असते. स्पर्धा खेळला संपल्यावर स्पर्धक परस्परांचे मित्रच राहतात. असं झालं तर खेळ होईल ना निखळ? तेव्हा उत्स्फूर्त आविष्कार हा खेळाचा अविभाज्य भाग बनवा, त्यात इर्षा नको, म्हणूनच म्हणतो, “खेळ असावा निखळ.”

Read More

 

Download File

Leave a Comment