सुधीर फडके यांची जीवनकहाणी | life story of Sudhir Phadke

सुधीर फडके यांची जीवनकहाणी | life story of Sudhir Phadke

सामाजिक जाणीव असलेला स्वरयात्री – सुधीर फडके

Sudhir Phadke मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. समाजातच व्यक्तीचा विकास संभवतो. मनुष्य समाजावर प्रेम करतो. समाजासाठी धडपडू लागतो. समाज त्याच्यावर प्रेम करू लागतो. थोडक्यात सांगायचे झालं तर माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आजूबाजूचा समाज आणि सामाजिक दृष्टिकोन या समाजाला समृद्ध, सुबुद्ध आणि सुसंस्कृत बनवण्याचं काम हे समाजातल्या प्रत्येक घटकाचं असतं. महान माणसे आपापल्या क्षेत्राद्वारे हा प्रयत्न करतच असतात.

अशाच प्रकारचा प्रयत्न करणारे महामानव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके संगीतकार, गायक, चित्रपट निर्माते सुधीर फडके. फडके यांचे ‘राम’ हे खरे नाव. रामाप्रमाणेच त्यांचे आयुष्य देखील खडतर. रामाप्रमाणेच आदर्श. म्हणूनच त्यांचे ‘गीत रामायण’ घराघरांत लोकांच्या मनामनांत पोहोचले. संकटातही धीराने पुढे जाणारा हा राम ‘सुधीर’ बनला. सुधीर नंतर बाबूजी. पाच दशकांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबूजींची जीवनकथा संगीतमय, तेवढीच संघर्षमय. हालअपेष्टा, उपेक्षा आणि भ्रमंती तसेच देदीप्यमान यश, मान-सन्मान यांनी भरलेली. त्यांचे वडील नामांकित वकील होते. देशभक्त व समाजसेवक, त्यांना लोक ‘कोल्हापूरचे टिळक’ म्हणनू गौरवीत. घरातील वातावरण व सुयोग्य संस्कार यांच्यामुळेच सुधीर फडके महान बनू शकले…

वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी गायन शिकण्यास प्रारंभ केला. राग, ख्याल, तराणे, जलद चिजा, भरपूर ऐकायला मिळाल्या. रागविस्तार, आलाप, ताना, मींडकाम, हरकती, गमका सारे प्रकार घटवून घेणारे त्यांचे गुरू पाध्येबुवा. बाबूजी ग्वाल्हेर घराण्याचे उत्तम गायक बनले. सुरेल गळा समाजाला रिझवण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी उपयोगात आणला. त्यांचा सूर केवळ त्यांच्यापुरता संकुचित राहिला नाही. त्यांनी समाजाचे अवलोकन केले. आपल्या संस्कृतीची, आपली माणसे पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होत असताना आपला ठसा संगीतक्षेत्रात उमटवून त्यांना पुनश्च एकदा आपल्या संस्कृतीकडे वळवून घेण्याचा बाबूजींचा प्रयत्न यशस्वी बनू लागला.


कवी कुसुमाग्रजांची प्रेमविषयक कविता

प्रेम कोणावर करावे,

प्रेम कोणावरही करावे

बलरामाच्या खांद्यावरल्या नांगरावर करावे

कृष्णाच्या मुकुटातल्या मोर पिसावर करावे

कंसाच्या मनातल्या द्वेषावर करावे

गोपींच्या लालस वाणींवर करावे

प्रेम कोणावर करावे, प्रेम कोणावरही करावे.

असंच मला बाबूजीच्या बाबतीत वाटतं. बाबूजींच्या कुठल्या गोष्टींवर प्रेम करावं? त्यांच्या अफाट संगीतावर करावं, सुमधुर गळ्यावर करावं की त्यांच्या उदास सामाजिक जाणिवेवर करावं?

बाबूजी स्वातंत्र्यसैनिक होते. तेव्हा त्यांनी अगदी जवळून समाजाचे दर्शन घेतले. जत्रेच्या मेळ्यांमधून, आर.एस.एस.मधून त्यांनी आपले समाजाशी असलेले नाते घट्ट केले. आर.एस.एस.मधील अनेक गीतांना सोप्या चाली लावून समाजाला स्फूर्ती दिली. देशभक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या चाली थेट हृदयाला भिडणाऱ्या होत्या. प्रचंड जनसमुदाय त्यांच्या सुरात सूर मिसळत असे.

‘वेद मंत्राहून आम्हां, वंद्य वंदे मातरम्’ या बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या गीताने तत्कालीन आबालवृद्धांमध्ये सळसळते चैतन्य निर्माण केले होते. मालकंस रागातील सोपी चाल असल्याने सामुदायिक गीत बनले. बाबूजींच्या स्वरातील ‘ने मजसि ने, परत मातृभूमीला’ हे गीत ऐकणे म्हणजे गानरसिकांना लाभलेला दुर्मिळ योगच. बाबूजींनी स्वरबद्ध केलेले हे सावरकर गीत म्हणजे सावरकर खरोखरच एकाकी बसून सागराशी संवाद साधत आहेत असेच वाटते.

बाबूजींच्या गीतात, स्वरात समाजाला एका दिशेने घेऊन जायची ताकद होती. मग ती देशभक्ती असो. भक्तिरसाकडे नेणारी असो वा मधुर भावगीतांकडे जाणारी असो. रसिक आपोआपच त्या दिशेला ओढले जात असत. त्यांच्या संगीताचे एक वैशिष्ट्य म्हणजे चालीचा सोपा, सुंदर भावाविष्कार. शब्द, अर्थ गीतातील प्रमुख गोष्टी यांना ते योग्य न्याय देत.

‘बलसागर भारत होवो’ हे सानेगुरुजींचे गीत सहज सोपे होते म्हणूनच अजरामर झाले. बाबूजींच्या अफाट कारकीर्दीचा आढावा घेतला तर कोणती गोष्ट लक्षात येते, तर त्यांच्या गीतांतून सामाजिक भान प्रकट झालेले दिसते. श्रमिक, कष्टकरी अशा लोकांचे चित्रण असणारी गीते उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखवत नि अशा उपेक्षित समाजबांधवांना जगण्याची हिंमत, स्फूर्ती, प्रेरणा देत.

‘नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी ।’

‘मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती,

श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती.’ ज्ञान दिव्याने ज्ञान वाढते.

त्या ज्ञानाचे मंदिर हो, सत्यशिवाचे मंदिर हो ।

या नि अशा कितीतरी गाण्यांचा उल्लेख करता येईल. म्हणूनच बाबूजींच्या सांगीतिक कारकीर्दीचे मूल्यमापन करायचे झाले तर म्हणता येईल. बाबूजी म्हणजे ‘स्वरगंगेच्या पावनतीर्थाचा योगीच.’

माणसाला महिमा, बुद्धिमा, सिद्धिमा, काहिमा या आणि अजून काही मिळून आठ सिद्धी प्राप्त असतात. पण देवकृपेने मराठी माणसाला नववी सिद्धी प्राप्त झाली होती. ती म्हणजे ‘गदिमा’. गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मीकी त्यांनी रामायण रचले नि ते घरोघरी पोहोचवले बाबूजींनी अतिशय सुरेल आवाज, उत्कृष्ट चाली, अचूक शब्दफेक त्यातून प्रकट होणारा भाव नि अर्थ रसिकमनात घर करून राहिल यात नवल ते काय? पुढे आकाशवाणीच्या माध्यमातून गीतरामायण घराघरांत पोहोचलंय पण अवघा समाज भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रत्येक आठवड्यातून एक दिवस रसाळ निवेदनानंतर एक गीत रामाच्या दैवी अवताराप्रमाणेच प्रत्येकाच्या घरात, मनात अवतीर्ण होत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाबूजींचे आराध्य दैवत. दोघेही कडवे हिंदुत्ववादी. सावरकरांचे संघर्ष, त्याग, राष्ट्रभक्ती यांनी भरलेले चरित्र लोकांपुढे यावे. त्यांच्या देशभक्तीचा आदर्श विशेषतः तरुण पिढीपुढे यावा या तळमळीने सावरकरांवर उत्तम चित्रपट तयार करायचाच हा निश्चय कृतीत आणण्यासाठी बाबूजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांची सामाजिक जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सात-आठ वर्षे ते चित्रपटासाठी निधी जमा करत होते. जनतेच्या पैशाबाबत ते अतिशय संवेदनशील होते. अनेक वेळा लोक चित्रपट पूर्ण होत नाही म्हणून टीका करत. ती त्यांच्या जिव्हारी लागत असे. कमीत कमी खर्चात चित्रपट तयार करायचा नि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचाच अशी त्यांची विशिष्ट निष्ठा होती. त्याचमुळे त्यांनी चंगच बांधला की, ‘उत्कृष्ट चित्रपट केल्याशिवाय राहणार नि तोपर्यंत मरणारही नाही.’ ज्यादिवशी चित्रपट पूर्ण झाला तो दिवस त्यांच्या कृतार्थतेचा होता. सामाजिक बांधीलकी सिद्ध केल्याचा आनंद त्यांच्या नसानसांतून ओसंडत होता.

‘मेरा घर, भारत देश’ या प्रकल्पांतर्गत पूर्वाचलातले काही विद्यार्थी मुंबईत आणून त्यांना मुंबईतल्या सहविचारी कुटुंबामध्ये शिक्षणासाठी ठेवण्याची कल्पना विद्यार्थी परिषदेने मांडली. ती कल्पना बाबूजीनी कृतीत आणली. लेकी फुन्शो ऊर्फ दीपक दीर्घकाळ त्यांच्या घरी राहिला अन् फडके बनून गेला. या उदाहरणातून त्यांची सामाजिक जाणीव दिसून येते.

त्यांचा एकुलता एक मुलगा श्रीधर याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाण्यास आनंदाने संमती देणारा हा पिता विरळाच. आपला संगीत वारसाच पुढे चालव असा आग्रह त्यांनी कधीही धरला नाही. यातून एक राष्ट्रभक्त पिताच बाबूजींच्या रूपाने समाजापुढे आदर्शरूपात साकारतो.

चीनने भारतावर आक्रमण केले नि भारताशी शत्रूत्व पत्करले. याची बाबूजींना अतिशय चीड होती. एकदा ते हॉटेलात बसले होते. वेटरने चायनीज डिशेशचा उच्चार करताच ते अतिशय खवळले, नि चिडून उद्गारले, “चीन हमारा दुश्मन है।” चायनीज पदार्थांचे सेवन तर राहिलेच, पण त्याचा उल्लेखही त्यांना सहन झाला नाही. त्यांनी हॉटेल मालकाला चांगलेच ठणकावले.

बाबूजी माणूस म्हणून फार महान होते. त्यांचे सर्वांशी प्रेमाचे वागणे असायचे. मग ते कलाकार असोत, सहकारी असो अथवा नोकर असो. सर्वाशीच ते अदबीनं वागत. अडीअडचणीच्या वेळी नोकरांना चटकन मदत करत. त्यांच्याशी चांगले वागणाऱ्या लोकांबद्दल ते लगेचच कृतज्ञता व्यक्त करत. कृतज्ञता हा त्यांचा स्थायीभाव होता.

सुधीर फडके Sudhir Phadke

२९ जुलै, २००३ रोजी एक समर्पित स्वरतीर्थ नादब्रह्मात विलीन झाले. हिंदुत्व, संघ आणि सावरकर या त्रिवेणी संगमावर या साधकाने ८३ वर्षे तपस्वी जीवनाची साधना केली. दादरा नगरहवेली, सशस्त्र मुक्तिसंग्रामातील नेतृत्व, ग्राहक पंचायतीच्या चळवळीत झोकून स्वीकारलेले अध्यक्षपद. सावरकर चित्रपटाचा ध्यास अशा देदीप्यमान घटना घडविणाऱ्या या कर्मयोग्याला शतशः प्रणाम!

the life story of Sudhir Phadke Download

 

Download File

Leave a Comment