जीवनाचा महत्त्व मराठी निबंध | Jivnacha mahatva in marathi
हेच खरे जीवनाचे उपासक
Jivnacha mahatva in marathi उपासना करतो तो उपासक. उपासना म्हणजे काय? तर उप आस बसणे. प्रवेशणे. या धातूपासून हा शब्द बनला आहे. परिचर्या, शुश्रूषा असे उपासनेचे पर्याय शब्द अमरकोशात दिलेले आहेत. आपल्या इष्ट किंवा आराध्य देवतेच्या जवळ पोहोचणे, असा त्या शब्दाचा भावार्थ आहे. उपासनेच्या द्वारे आपण इष्टदेवतेच्या जवळ पोहोचतो व त्याच्या कृपेने कृतार्थ होतो. प्राणाविना जसे शरीर राहू शकत नाही. याचसाठी ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो तो जीवनाची उपासना करतो. ज्याचे समाजावर प्रेम आहे तो समाजाच्या कल्याणासाठी तन, मन, धन अर्पण करतो, नि त्यातच आपल्या जीवनाची सार्थकता मानतो.
अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फूल सनातन
त्या कमलाच्या एक दलावर
पडले आहे थोडे गहिवर
थरथरणाऱ्या या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो ‘जीवन’
अशी जीवनाची सुंदर व्याख्या काव्यरूपात केली आहे. हे जीवनशिल्प घडविणारे खरे उपासक असतात.
चुकलेल्या, भरकटलेल्या मानवाला सन्मार्गावर आणण्याचे काम हे उपासक करत असतात. समाज ही त्यांची इष्टदेवता असते. म्हणूनच त्यांच्याजवळ ते सहज पोहोचतात. आपल्या परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने करतात. असे हे जीवनाचे खरे उपासक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, कलाक्षेत्रातही दिसून येतात. प्राचीन काळातही समाज अंधश्रद्धाळू, सनातनी होता. अशा विस्कळीत समाजाला एकतेच्या सूत्रात बांधणारे, सन्मार्गावर आणणारे आमचे संत जीवनाचे खरे उपासकच नव्हेत का?
ज्या समाजाने ज्ञानेश्वरांचा छळ केला, त्यांना वाळीत टाकले त्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागताना म्हटले,
“जो खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो!
भूतां परस्परे घडो मैत्र जीवांचे। “
भगवंतांची अमृतवाणी सामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून भगवद्गीतेचे प्राकृतात निरूपण केले. तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ, आजही समाजाला मार्गदर्शन करणारा। त्यांचा उपदेश आजही उपयुक्त आहे. तसेच तुकारामांनी सामाजिक रूडी, दांभिकपणा यांवर कडाडून प्रहार केला. त्यांची वाणी अत्यंत परखड. समाजाची कानउघाडणी करणारी. समाज प्रबोधनाचे कार्य करताना सर्व संतांनी स्वार्थहेतूला संक्षेप दिला आहे.
उपासनेला दृढ चालवावे,
भूदेव संतांशी सदा नमावे
सत्कर्म योगे वय घालवावे
सर्वा मुखी मंगल बोलवावे ।।
हा श्लोक पाहा किती सार्थ आहे. हे झालं संतांच्या बाबतीत. समाजाला योग्य मार्गावर आणणारे समाजसुधारक दूरदृष्टी असलेले, त्यागी, निःस्वार्थी, प्रसिद्धी पराङ्गमुख, या गुणांनी युक्त असतात. म्हणूनच ते जनमानसावर अधिराज्य करू शकतात. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उत्थानासाठी अनंत कष्ट सोसले. कुष्ठरोग्यांचा प्रश्न केवळ शारीरिक व्याधीपुरता मर्यादित मानला नाही, हा त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा विशेष आहे. समाजाच्या मरतुकड्या दयेवर या व्याधितांनी जगावे हे त्यांना रुचले नाही. भग्नमंदिरातही जागृत दैवत असू शकते हे त्यांनी अंतःस्फूर्तीने जाणले. जगाच्या दृष्टीने या मोडक्या-तोडक्या झालेल्या माणसांच्या पुरुषार्थाला साद घालून त्यांनी माळरानावर नंदनवन निर्माण केले. दीन-दलित मानवाचे दुःख पाहून बुद्ध, ख्रिस्त, गांधी, टॉलस्टॉय यांच्यासारखी माणसं अतंर्यामी गलबलून जातात. ते दुःख नाहीसे व्हावे, म्हणून अंत:प्रेरणा जो दर्शविल त्याचा आश्रय करतात. त्या मार्गाने जातानाही माणसे आपले जीवन पणाला लावतात. बाहेर सहारा पसरलेला असूनही त्यांच्या अंतरंगात अमृताचे पाझर फुटत असतात, त्यांच्यावर ती संतुष्ट असतात.
व्यवहारी जग अशा वृत्तीच्या माणसाला वेड्यात काढते. ‘स्वप्नाळू’, ‘ध्येयवादी’ अशी विशेषणे बहाल करते. या शब्दांच्या जगातल्या कोशात ‘वेडा’ हा एकच अर्थ असतो. अशा व्यक्तीची मायेची माणसे तिने या मूर्खपणापासून परावृत्त व्हावे म्हणून प्रयत्न करतात. जग हे असे आहे, तसेच चालायचे आहे, असा उपदेश सभ्य बुद्धिमंत साळसूदपणे अशा व्यक्तीला करतात. कुठल्यातरी मृगजळाप्रमाणे हा वेडा धावत निघाला आहे, आणि धावून उरी फुटणाऱ्या हरणाप्रमाणे याची गत होणार आहे असे भाकीत जगरहाटी जाणणारे वर्तवतात. पण अंतरात्म्याच्या हाकेला ओ देऊन अर्थशून्य वाटणाऱ्या या विशाल, विक्राळ जीवनाचा अन्वयार्थ लावायला निघालेला असा पुरुष वाटेत थांबत नाही, मागे वळून पाहात नाही. पुढे दूर-दूर क्षितिजावर विजेची एक पुसट रेषा चमकत असते, ती धरण्याकरता तो धावत राहतो. तिच्या प्रकाशात मानवी जीवनात दाटलेला काळोख आपण उजळू शकू याबद्दल तो निश्चिंत असतो. म्हणूनच हे खरे जीवनाचे उपासक बनतात.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातल्या अशा असामान्य भारतीय व्यक्तींची इतिहास गणना करील यात संशय नाही. त्यांच्या आत्मशक्तीत गरुडाच्या पंखांचे सामर्थ्य आहे. तुम्हां-आम्हांलाही पंख असतात, पण ते फुलपाखरांचे, चिमण्या-कावळ्यांचे, पोपट-मैनांचे, अशा थिट्या पंखांमुळे आपण जीवनाची क्रूर कठोर आव्हाने स्वीकारू शकत नाही. अमृतकुंभ आणण्यासाठी आपण गरुडाच्या पंखांनी भरारी घेत नाही, किंवा जटायूच्या रक्तबंबाळ पंखांनी रावणाचा मार्ग अडवण्याचा प्रयत्नही करीत नाही. सामान्य आणि असामान्य यांच्या वाटा इथेच फुटतात.
But for the grace of God there go l.
व्यसनाने पोखरलेला समाज विशेषतः तरुण पिढी ‘उद्याचा समर्थ भारत’ हे स्वप्न कसे पूर्ण करतील? यासाठी तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी झटणारे डॉ. गंगवाल जीवनाचे उपासकच नव्हेत काय? साध्या-सुध्या वाटणाऱ्या जीवनात अर्थ वाटणे, कशासाठी जगायचे? त्याचे प्रयोजन काय? हे शोधणे ही उपासना ज्यांना साधली ते उपासक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची हिंमत दाखवणारे.
किरण बेदी या पोलिस अधिकारीने अपराधी जगतात क्रांती घडवली. गुन्हे घडले की, शिक्षा, तुरुंगवास. पण यामुळे प्रश्न सुटत नाही. प्रश्न असतो गुन्हेगारांच्या मनपरिवर्तनाचा, त्यांच्या पुनर्वसनाचा. पश्चात्ताप होऊन भविष्यकाळात सुधारणा घडविण्यासाठी किरण बेदीने अपराध्यांना स्वत:च्या अंतरंगात डोकावण्याची कला शिकवली. तिहार जेलमधील कैद्यांच्यात परिवर्तन घडवले. कारण तीही माणसंच असतात, अगदी हाडामांसाची!
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश हवे असते. सृजनशील उपासकांच्या साहसांना सीमा नसतात, त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची ऊब असते.
मेघा पाटकर यांनी सरदार सरोवरात धरणग्रस्त झालेल्यांसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. या धरणग्रस्त आदिवासींचे उद्ध्वस्त जीवन सावरण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्या लोकांच्यात मिसळून त्यांची भाषा अवगत केली. त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन केले.
Some people come in our life. As a stranger of the way. They
disappear after small journey, for them we always pray.
आधुनिक संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज यांनी कीर्तन या माध्यमातून जनजागृती केली. संगीत ही अभिजात कला. आपल्या सुरांच्या जादूने साऱ्या विश्वाला मोहिनी घालणारे पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर या उपासकांनी देश-विदेशांत, जगाच्या कानाकोपऱ्यात आपले संगीत पोहोचविले हीच गोष्ट कोणत्याही क्षेत्रातील श्रेष्ठ दिग्गज कलाकारांबाबत सांगता येईल.
इंद्रधनुष्याचे रंग मुठीत पकडून शेतकरी ते मातीतून उगवणाऱ्या ऋतूंच्या
समृद्धीला देतो तो केवढा मोठा कलाकार आहे. अत्र हे आजचे उपनिषद आहे,
आणि ते निर्माण करणारा शेतकरी हा देखील जीवनाचा खरा उपासकच आहे.
आपला प्रत्येक आचार, विचार, उच्चार हा राष्ट्राच्या भल्यासाठी, कल्याणासाठी, हितासाठीच असला पाहिजे या धारणेने जगतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक असतो. देशातील प्रत्येक विद्यार्थी उत्तम नागरिक बनला पाहिजे या धारणेने आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम झटत आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्यात जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. म्हणून तेही खरे जीवनाचे उपासकच आहेत.
या साऱ्या उपासकांपाशी अभ्यासू वृत्ती, उद्योगाची कास, संयम, महत्त्वाकांक्षा, लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती आहे. जीवनाची उपासना ही एखाद्या नांगरणीसारखी असते. नांगरणी करा. सकस बी पेरा. सकस बी उगवेल. या श्रद्धेने उपासक काम करत असतात.
या उपासकांनी गरुडाकडून भरारी घेतली. सूर्याकडून तेज, पर्वताकडून निश्चय, फुलांकडून सुवास, काट्यांकडून धार, आभाळाकडून विशालता, वाऱ्याकडून वेग घेतला म्हणूनच त्यांना जीवनाचा अर्थ उमगला.
“जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरि, सहजपणाने गळले हो।”
जीवनाचा महत्त्व मराठी निबंध | Jivnacha mahatva in marathi Download