शब्दांचे सामर्थ्य लेख | Important Of Words In Marathi

Impoartant Of Words

शब्दांचे सामर्थ्य

शब्द मनातील भावभावनांच्या अभिव्यक्तीचे साधन. सर्वांच्याच जीवनात शब्दांचे फार महत्त्व आहे. कवीच्या जीवनात आनंद निर्माण करतात ते शब्द, जीवनातील प्रत्येक ठिकाणी, आनंदाच्या क्षणी शब्द सोबत करतात. शब्दच माणसाला घडवतात. माउलीच्या कुशीत जी ऊब मिळते तीच ऊब शब्दांमुळे मिळते. जीवनातील अडचणीच्या वेळी शब्द आपले सहप्रवासी बनतात. जीवनातील वेदना शमवण्याचं सामर्थ्य शब्दांत आहे. अपमानित जीवन जर वाट्याला आलं तर मनुष्य खचून जातो. तेव्हा शब्द आपले मित्र बनतात. एकाकी जीवनात शब्द सहप्रवासी बनतात. म्हणूनच शब्दांचे आपल्यावर खरं तर उपकारच आहेत.

शब्दांचे सामर्थ्य पटवून देण्यासाठी संत तुकाराम म्हणतात, ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दचि अमुच्या जीवनाचे जीवन। शब्द वाटे धन जनलोक। तुका म्हणे माझा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करू.

शब्दांना शस्त्राचीही उपमा देतात. म्हणून ते जपून वापरले पाहिजेत. शब्दाला शस्त्राची धार आहे. कटू शब्दांनी माणसाची मनं दुखावतात. माणसे एकमेकांपासून दुरावतात. या उलट मधुर शब्द मैत्री घडवतात. म्हणूनच मानवाचे बंद हृदयद्वार खोलण्याची शब्द ही किल्ली आहे.

तुलसीदास आपल्या दोह्यात म्हणतात – कोयल काको देत है कागा कासो लेत ।

तुलसी मीठे वचन से जग अपनो करि लेत।

यावरून शब्दांचे सामर्थ्य समजत नाही का? मित्रांनो, एक उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंदांना शिकागो धर्मपरिषदेसाठी जाण्याची संधी मिळाली. हिंदुधर्माबद्दल बोलायचे होते. पण वेळ फक्त दोन मिनिटे देण्यात आला. विवेकानंद व्यासपीठावर उभे राहिले अन् माझ्या बंधू-भगिनींनो या दोन शब्दांत त्यांनी सभा जिंकली. या दोन शब्दांत विश्वबंधुत्वाचं नातं जोडण्याचं सामर्थ्य होतं. मधुर शब्द मानवी मनात विश्वास निर्माण करू शकतो. भयाला दूर पळवू शकतो, तर कटू शब्दांत बोलणाऱ्यापासून लोक दूर पळतात. म्हणूनच समर्थ शब्दांनी माणसाला जिंकता येतं. म्हणून शब्दांतून दुसऱ्याला मान दिला पाहिजे.

‘मानोहि महतां धनम्’ मानपान सांभाळणं हे देखील शब्दांच्या सामर्थ्यावरच अवलंबून असतं. रहिमच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘अमी पियौ मान विनु सो नर मोहिं न सुहाय’

शिक्षण आणि निरंतर अभ्यास यांतून शब्दांचे सामर्थ्य वाढवू शकतो. सुसंस्कारित शब्दांचे प्राबल्य आत्मसात करू शकतो. साधं उदाहरण बघा, काम झाल्यावर ‘धन्यवाद’ म्हटलं तरी दुसऱ्याला बरं वाटतं. हा एक कृतज्ञतेचाच भाग नाही का?

आपली शैशव अवस्था आठवून बघा. त्या वयात आपल्या आईनी आपल्याला ‘चाल, चाल मोत्या, बाळ उभा राहिला, आम्ही नाही पाहिला.’ या शब्दांनी प्रोत्साहन दिले नसते तर आपण चालायला नीट शिकलो असतो का? म्हणजेच बघा या शब्दांत केवढे सामर्थ्य दडलेले आहे. आईचे, शिक्षकांचे शब्द बालमनाला उभारी देतात. शाबासकी, कौतुक या गोष्टी प्रगतीसाठी आवश्यक असतात ना?

संतांच्या शब्दांत प्रचंड सामर्थ्य असते. त्यांच्या शब्दांनी मानवाला या भवसागरातून तरून जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. खेळ म्हणजेच सुंदर क्रीडा. मैदान गाजवणारे खेळाडूच बघा ना. त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रेक्षक शब्दांचाच वापर करतात ना?

अक्षरवाङ्मय म्हणजे शब्दच नाहीत का? याचमुळे समाजप्रबोधन होतं. म्हणजेच त्यातील सामर्थ्य जबरदस्त असणारच. लेखणीतून मोठमोठ्या क्रांत्या झाल्या. समाज खडबडून जागा झाला. लोकमान्य टिळकांनी याचसाठी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या अग्रलेखातील शब्दच इतके प्रभावी होते की, सामान्य जनता खडबडून जागी झाली. देशासाठी त्याग करण्यासाठी सज्ज झाली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? या शब्दांतून खळबळ माजली. तसेच त्यांची “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.’ या शब्दांचे सामर्थ्य म्हणजे सिंहगर्जनेची प्रचंड शक्तीच नाही का?

मित्रांनो, या उदाहरणांवरून शब्दांचे सामर्थ्य नक्कीच तुम्हांला जाणवले असेल. उमगले असेल, तेव्हा सावधान. शब्द जपून वापरा. त्याच्या सामर्थ्याचा उपयोग विकासासाठी, हो स्वतःच्या अन् इतरांच्याही करा.

Download File

Leave a Comment