स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपण
आम्ही शाळेत दररोज अभिमानाने प्रतिज्ञा करतो की, ‘भारत माझा देश आहे’ भारतमाता पारतंत्र्यात जखडली होती, तेव्हा तिच्या पायातील या परदास्याच्या शृंखला तोडण्यासाठी अनेक वीरांनी प्राणांची शर्थ केली. वासुदेव बळवंत फडके म्हणजे एक धगधगती चिता होती. ही चिता शांत झाली पण जाता जाता अजून एक चिता चेतवली. वासुदेव बळवंत फडक्यांच्या मृत्युनंतर अवघ्या तीनच महिन्यांनी म्हणजेच २८ मे, १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी आणखी एका क्रांतिकारकाने जन्म घेतला. मित्रांनो, या क्रांतिकारकाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर.
भगूर गावी विनायकाचा जन्म झाला अन् त्या गावाचं भाग्य उजळलं. सावरकर घराण्यातील अनेक पिढ्या वेदशास्त्रसंपन्न होत्या. त्यांचे वडील दामोदरपंत व वडीलबंधू बाबाराव.
Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi 400 words
बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात ते छोट्या विनायकाच्या बाबतीत अगदी खरे होते. विनायक घरात सगळ्यांचा लाडका होता. त्यामुळे त्याच्या बाललीलांचे खूप कौतुक होत असे. गावातील लोक विनायकाला छोटे जहागीरदार म्हणत. सावरकरांच्या देवघरात नवचंडिकेची मूर्ती होती. आठही हातांत शस्त्र धारण केलेली ती असुरमर्दिनी अगदी तेजस्वी होती. आईचा देवघरात जप चालू असे. त्यावेळी उदबत्त्यांचा सुगंध दरवळत असे. उदबत्यांची धूम्रवलये पकडण्याचा विनायकाला नाद होता. त्या नादात विनायक भूक-तहान विसरत असे. खरं तर पोटात कावळे काव-काव करत असत, पण आईची समाधी कशी भंग करायची हे प्रश्नचिन्ह पडायचं. मग विनायक आपल्या धूम्रवलयात हरवून जायचा. आईचा जप झाल्यावर आई स्वतःच्या हाताने विनायकाला भरवायची, पण हे मातृसुख मात्र विनायकाच्या नशीबात फार काळ नव्हते.. महामारीच्या साथीने विनायकाला पोरके बनवले. मातृछत्र हरवले. आयुष्यातील आईची उणीव भरून काढण्यासाठी आली त्यांची वहिनी येसूवहिनी. तिच्याशी मात्र विनायकाची गट्टी जमली. दोघेही अल्लडवयाचे. येसूवहिनी थट्टेखोर पण मायाळू. तिने आपल्या या दिराचे खूप लाड केले. वहिनी आणि दीर दोघेही कविता करायचे. झोपाळ्यावर झोके घेत घेत येसूवहिनी आणि विनायक यांच्यात ओव्या रचण्याची चढाओढ लागे. मग पहिली माझी ओवी अशी सुरुवात अगदी दोनशेवी माझी ओवीपर्यंत होऊन थांबायची.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. आता ही गोष्ट विनायकाच्या बाबतीतही लागू पडली. इंग्रजांची राजवट सुरू झाली आणि सावरकर घराण्याला पेशव्यांकडून मिळणारे वर्षासन बंद झाले. त्यामुळे सावरकरांच्या मनात लहानपणापासूनच इंग्रजांबद्दल चीड निर्माण झाली. विनायक शाळेतून येता जाता रस्त्याच्या कडेला असलेली पिवळी फुलं पाहायचा. या फुलांना विलायती फुले म्हणतात. असे समजल्यावर विनायक ती फुले काठीने झोडपून काढू लागला. एवढी त्याला विलायती शब्दाची चीड होती.
लहानपणी शौर्याची बीजे त्यांच्यात रुजली होती. तलवार, बंदूक घेऊन मित्रांबरोबर लढाई व्हायची. निंबोळीच्या गोळ्यांच्या साहाय्याने तोफगोळ्याचे शिक्षण घ्यायचे. आखाड्यात जाऊन जोर, बैठका, नमस्कार, कुस्ती असे प्रकार चालायचे. त्यामुळे उत्तम शरीरसंपदा, अन् त्याला मिळाली अलौकिक बुद्धिमत्तेची जोड. वाचन अफाट. जे-जे वाचायचे त्याचे टिपण काढायचे ही सवय. त्यासाठी ‘सर्व सारसंग्रह’ ही जाडजूड वही निर्माण झाली.
लेखन, वाचनाबरोबरच त्यांना वक्तृत्वाचीही आवड होती. एकदा वक्तृत्व स्पर्धेत उशिरा नाव दिल्यामुळे त्यांचे नाव शेवटी लावण्यात आले. पण स्पर्धेतील वक्तृत्वशैलीमुळे नंबर मात्र पहिला द्यावाच लागला. परीक्षकांच्यात मात्र कुजबुज सुरू झाली. न राहवून परीक्षक म्हणाले, “मोठ्यांचे हे विचार मात्र पाठ करून छान म्हणून दाखवलेस हं!” त्यावर विनायक म्हणाला, “हे विचार मोठ्यांचे नसून, माझे स्वतःचे आहेत. गुणवत्ता वयावर अवलंबून असती तर ज्ञानेश्वरांनी लहानवयात एवढा अलौकिक ग्रंथ लिहिला असता का? शिवाजीने बालवयात तोरणा जिंकला नसता.”
अशा या विनायकाने असुरमर्दिनीच्या चरणाला स्पर्श करून शपथ घेतली. “माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन.”
अशाप्रकारे आयुष्याचा भक्कम पाया त्यांनी बालपणीच रचला होता. जीवनाचे ध्येय ठरवले होते.
अशा विनायकाचा आम्हांला अभिमान इतिहासावीण कुणी करावा याचा सन्मान !