ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग | Events in the life of Dnyaneshwar In Marathi

ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग

“जो जे वांच्छिल तो ते लाहो”

आशीर्वाद देणाऱ्या ज्ञानेश्वरांना स्वतःच्या आयुष्यात मात्र संघर्ष आणि मानहानीखेरीज काहीच मिळाले नाही. ‘संन्याशाची पोर’ या शापानं जणू त्यांच्या तेजाला खग्रास ग्रहण लावले आणि त्या एकाच शब्दानं या ज्ञानियांच्या राजाचा आयुष्यभर पाठपुरवा केला मुघल सत्तेचा अधीष्ठित अमल आणि संस्कृतला मिळालेला राजाश्रय विद्वानाश्रय यांची यत् किंचीतही पर्वा न करता

माझिया मराठीचिये बोल कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके

असे मायबोलीविषयी दृष्टेपणाने सांगून ज्ञानेश्वरांनी क्रांतीचा पाया रोवला. जनसामान्यांना आपले वेगळेपण दाखवून दिले. ज्ञानाचा आणि देवभक्तीचा अधिकार फक्त उच्च वर्गाला आहे, असे तत्कालीन धर्ममार्तंड छाती ठोकपणे सांगत असताना पांडुरंगाला साक्षी ठेवून, जनसामान्यांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची भक्ती मार्गाची स्थापना केली आणि इथेही क्रांतीचा झेंडा फडकवला,

“ज्ञानदेव रचिला पाया”

क्रांतिकारक विचारांचाच होय. याच विचाराने प्रेरित होऊन संस्कृतमधील भगवद्गीतेवर मराठीमध्ये भाष्य केले आणि ज्ञानेश्वरीचा महान ठेवा आम्हाला गवसला वयाच्या १८ व्या वर्षी या बालयोगीचे ज्ञान पाहून आजही अनेक विद्वानांची मती कुंठित होते आहे. अशा ज्ञानदेवांना मात्र आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही बाबतीत विलक्षण संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातून त्यांचे तेज मुशीतून काढलेल्या सोन्याप्रमाणे आणखीनच उजळून निघाले.अशाच एका संघर्षातून एक महान चमत्कार निपजला आणि त्या चमत्काराने धर्ममार्तंडाच्या बुद्धीवर आणि मनावर चढलेला गंज तर धुऊन निघालाच पण त्या जगनियत्या परमेश्वराचे अस्तित्व सृष्टीच्या कणांकणांत आहे. हे शाश्वत सत्यही उजळून निघाले.

धर्मामार्तंडांनी आणि समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून व्याकुळलेल्या मुद्रेने ही चारही भावंडे उभी होती. आपली भूमिका तत्कालीन समाजप्रमुखांना समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न ज्ञानेश्वर करीत होते. त्या चौघांची ती व्याकुळलेली अवस्था ते निष्पाप चेहरे पाहून दगडालाही पाझर फुटला असता. पण तेव्हाचे समाजमन दगडाहूनही कठोर होते. ज्ञानेश्वरांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांची टर उडविण्याचे ‘पुण्यकर्म’ अनेक जण करीत होते. शेवटी न राहवून ज्ञानेश्वरांनी विचारले, “तो परमेश्वर जर सर्वांच्या ठायी वसलेला आहे तर मग असा भेदभाव का?” कारण तो भेदभाव परमेश्वरानेच केलेला आहे. ज्ञानदेव ‘पण महाराज परमेश्वराचे अस्तित्व….’ धर्ममार्तंड- ‘थांब तू म्हणतोस ना, असा भेदभाव का? आणि तो नसला पाहिजे असे तुझे म्हणणे आहे. ना? ठीक आहे.’ धर्मप्रमुखांनी हात उंचावला तिकडून एक पाणत्या आपल्या रेड्याला घेऊन चालला होता.. धर्मप्रमुख :- इकडे ये रे ! तुझ्या या रेड्याचे नाव काय ? पाणत्या ज्ञानाजी
धर्मप्रमुख ज्ञानदेवा, बघा तुझे अन् रेड्याचे नाव सारखेच आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यात जो परमेश्वर वसला आहे. तोच त्याच्यात आहे. मग तुला वेद येतात ना? या रेड्याला का येऊ नयेत?

एक रोखठोक जीवघेणा सवाल धर्मप्रमुखांनी पुसला, ज्ञानेश्वरांचे डोळे चमकले, त्या ज्ञानियांच्या राजाने ओळखले की हीच वेळ आहे त्या परमेश्वराचे आणि आपले अस्तित्व सिद्ध करण्याची. ज्ञानेश्वर :- ‘जरूर येतील महाराज, या महिषाला वेद जरूर येतील.’ सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरली. जो तो कुत्सित नजरेने ज्ञानदेवांकडे पाहू लागला. आता चांगली फजिती होणारच खासच! ज्ञानेश्वर शांतपणे पुढे झाले. अत्यंत आत्मविश्वासाने आणि निष्ठेने त्यांनी रेड्याच्या मस्तकी हात ठेवला आणि वेद म्हणायला सुरुवात केली. काय आश्चर्य तो रेडाही ज्ञानेदवांबरोबर वेदघोष करू लागला. ते ऐकण्यासाठी जणू पंचमहाभूते क्षणभर स्तब्ध झाली. पृथ्वीची गती थांबली, वारा थांबला झऱ्याचे खळाळणे थांबले.

ऐकूनी महिषाची वेदोमय वाणी
थरथरली घरा, स्तब्ध झाली इंद्रायणी
ईश्वराच्या अस्तित्वाने भरूनी आहे सृष्टी
ज्ञानियांच्या राजा तुजला प्रणाम कोटी-कोटी.

Download File

Leave a Comment