रविवार सुट्टी निबंध | Essay On Sunday Holiday In Marathi
लपंडाव विजेचा
रविवारचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस. सकाळी लवकर उठायची घाई नाही. मुख्य म्हणजे शाळा, क्लास या सगळ्यांना सुटी. शिवाय ती इडियट बॉक्स आम्हां मुलांना तिच्यासमोर कशी अगदी खिळवून टाकते. एरवी कसं अभ्यासाचं भूत मानगुटी बसलेलं असतंच. आज मात्र आम्ही त्या भुताला पार पळवून लावतो. तुम्हांला सांगतो आजकाल भुतांची संख्या फार वाढायला लागलीय. अहो, ती वीज अलीकडे फारच ताप द्यायला लागलीय. खरं तर तिच्यावर आज आमचं सगळं जीवन अवलंबून आहे ना. या सगळ्या आमच्या इच्छा, आकांक्षा, नियोजनं पार कोलमडून टाकण्यात या विद्युत मंडळाचा अगदी सिंहाचा वाटा आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की, माझा रविवार हक्काचा तो सुद्धा मला पाहिजे तसा आनंदात घालवता येत नाही. चांगली मालिका बघायचीय असं घोकत आवरून सावरून बसावं की, वीज गायब! मालिकेतील उत्सुकता जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा झटक्यात वीज गायब. अस्सा राग येतो. ४४० वॅट शक्ती असलेल्या विजेवर रागवायचं म्हणजे भलतंच. त्यामुळे मूग गिळून बसावं लागतं.
आता वीजकपातीचं नवं नाटक सुरू झालंय. उन्हाळा मी म्हणत असतो तेव्हा वीज संपावर. त्यामुळे पंखे, फ्रीज, मिक्सर ही मंडळी ठप्प. गार पाणी नाही, आइस्क्रीम नाही, मिल्कशेक नाही, काही नाही. नुसता वैताग. गार वारा घ्यायचा म्हणजे पुढ्ठ्याचा पंखा हलवायचा. हात दुखायला लागला की, पंखा बंद. टी.व्ही. बंद, सिनेमा बंद, अशी वीज आम्हांला तिच्या तालावर नाचवतीय. आमच्याशी सदान्कदा तिचा खेळ म्हणजे लपंडाव चालूच आहे.
एम. एस. ई. बी. म्हणजे खरंच मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. हा टू विनोदाने केला जाणारा लाँगफॉर्म अगदी सार्थ ठरत आहे. विजेचा लपंडाव का? अधून-मधून तिला दडी मारावीशी वाटते का? आपण समजून घेतलं पाहिजे.
माणसाने शोध लावलेत त्याच्या सुखासाठी. बदलत्या काळाबरोबर वाढताहेत गरजा. गरजा वाढल्या की, शोध लागतात. नवी-नवी उपकरणं तुमच्या सेवेसाठी जन्माला येताहेत. उपकरणवाद सुरू झालाय. प्रत्येक कामासाठी उपकरण. आता बघा ही उपकरणं विजेशिवाय चालणार कशी? पूर्वी फक्त प्रकाशासाठीच वीज वापरली जायची. पण आज प्रत्येक गोष्टीसाठी वीज. उद्योगधंद्यांची वाढ झाली, वीज खेड्यापाड्यात पोहोचली. आज शेतकरी पंप चालवितात ते विजेवरच. आता तुम्हीच सांगा वीज तयार करणार तरी किती?
नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर निर्माण होणारी वीज कमी पडायला लागली. पावसाचा लहरीपणा वाढला. प्रदूषणाची समस्या राक्षसीरूप धारण करू लागली. निसर्गच रुसला त्याला वीज तरी काय करणार? पवनचक्क्या वीज निर्माण करणार तरी किती? त्यातून आम्हांला काटकसर ती माहीतच नाही. भरमसाट विजेचा वापर सुरू झाला. पाणी शुद्धिकरणासाठी किती वीज खर्च होते, याचा विचार करतोय कोण? शुद्धिकरणानंतर नळावाटे तुमच्यापर्यंत येणाऱ्या पाण्याची तुम्हांला किंमत नाही. वाट्टेल तसे नळ वाहत असतात. सूर्य वर येतो, आपल्या सहस्रकरांनी प्रकाशाचं साम्राज्य प्रस्थापित करतो, तरी दिवे आपले चालूच. पंख्यांची आवश्यकता असो वा नसो, उनाड पोरांप्रमाणे फिरतच ठेवायचे. मग वीज तरी काय करणार? तिलाही तुम्ही वेठीला धरलंत. मग ती कंटाळून अधून-मधून गायब होते. अधून-मधून विश्रांती घेते. तुम्हांला मात्र करमणूक हवी. सुख हवं. सगळी यंत्र तुमच्या पुढं दास म्हणून उभी राहावीत असं वाटतं. पण ही यंत्र नुसती असून चालत नाही तर ती फिरण्यासाठी हवी वीजच. तिचा वापर बेतानं नको का करायला?
सर्वशक्तिमान अशी ही वीज. तिच्याशी खेळणाऱ्या मानवाला ती घडा शिकवणारच. घंटों का काम मिनिटों में अशी किमया करणारी ही वीज आज मानवी जीवनात अविभाज्य घटक बनलीय. करमणूक, रेल्वे, वैद्यकीय क्षेत्रांतील सर्व प्रकारची मशिन्स, घरगुती वापरासाठी, औद्योगिक क्षेत्रात वापरासाठी सर्वत्र तिची गरज. मग या विजेचा वापर विवेकपूर्णच व्हायला हवा. तर तिचा हा लपंडाव नक्कीच थांबेल.