पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

रुसू नको पावसा

Marathi Essay on Rainy Season

आपण आपलं आयुष्य मोजतो ते पावसाळ्यावरून. परवाच आई रागावली तेव्हा म्हणाली, “अरे, तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त काढलेत, नि तू मला शिकव.” पाऊस आपल्या सर्व क्षणांचा साक्षीदार असतो. जीवन म्हणजे पाणी. हे पाणी देणारा पाऊस आपला उपकारकर्ता. पाऊस नाही आला तर! डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या स्त्रिया खेड्यापाड्यांतून पाहायला मिळतात. हे दृश्य पाहून खरोखरच त्या वरुणराजाला विनवणी करावीशी वाटते, ‘नको रे नको रुसू नको. तू आमचा जीवनदाता आहेस. सतत आमच्यावर कृपादृष्टी ठेव.’

लहानपणाची सुरुवात होते पावसाच्या तालावर. म्हणूनच ‘ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा’, हे गाणं प्रत्येकाचं जिव्हाळ्याचं, रिमझिम पाऊस, श्रावणसरी, आषाढाचा पाऊस, मुसळधार पाऊस, मल्हार आळवताच त्याच्या सुरात नाचणारा पाऊस, कवीच्या शब्दांना धार देणारा, ताल देणारा, थेंबाथेंबातून उसळणारा, शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा, हिरव्या रानावनातून सुगंधाचे गीत बहराला आणणारा पाऊस, पक्ष्यांच्या सुरातून, सहस्रकरांनी, सहस्रधारांनी बरसणारा, धरणीची तृष्णा मिटवणारा, सृष्टीला नटवणारा, पाना-पानांतून, फुला-फुलांतून सुवासाची बरसात करणारा, मृगाच्या तृषार्त धारांनी भिजवून टाकणारा. हे पावसा, तुझ्या आगमनाने मृदगंध दरवळतो. चित्तवृत्ती खुलतात. कडेकपारी चिंब भिजून जातात. कातर आभाळमाया चिंब भिजून जाते. मेघदूताची वेडी आठवण काढत यक्ष जागा होतो, घुंगरांचा छुमछुमता चाळ बांधून पाऊस नाचू लागतो. कधी-कधी पाऊस वेडेपणा करतो, तर कधी-कधी शहाण्यासारखाही वागतो. अशा या पावसाचं नातं असतं माणसाच्या थेट हृदयाशी, माणसाच्या सुख-दुःखाशी!

पावसाबरोबर सारी सृष्टी ओलीचिंब होते. पाना-पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे थेंब. जलधारात सचैल न्हाणारे रस्ते. सप्तरंगांचा पिसारा फुलवून थुई थुई नाचणारा मोर, तृप्त होणारा चातक पक्षी, तृणांकुरांचा हुंकार, कडाडणाऱ्या विजा, सारं कसं धुंद करणारं जिवंत! पावसा, तुझ्याविना जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. तुझ्या सरीमागून येणाऱ्या सरी मनीची खंत दूर करतात. नदी, नाले, ओहोळ, निर्झर सर्वचजण कडेकपारीतून धुंद होऊन उड्या घेतात. गवताची पातीसुद्धा उल्हासाने डुलतात, हिरव्या डहाळीत बसून मैना-राघू समवेत आनंदगाणी गाते, कोकिळेचाही सूर त्यात कधी मिसळतो. भ्रमर अमृताचा स्वाद घेण्यासाठी भ्रमंती सुरू करतात. अरे पावसा, तुझ्या धारांत न्हाणे म्हणजे असते आमच्या ओठांवरले गाणे. तुझे येणे जाणे जणू सुरांची असते सरगम. पावसातील आठवणी, साठवणींचा असतो अल्बम.

तहानलेल्या धरेवर कृष्णमेघ ओळंबले, तिच्या व्याकुळल्या डोळी, स्वप्न हिरवे रंगले, फांदीवरती हिंदोळे, गहिऱ्या भावनांचे साक्षी उल्हासात चिंब ओले ऊन पावसाचे पक्षी अंगणात पखरण बहरला पारिजात वेचू किती कळेना ती मोती-पोवळ्यांची दौलत अवघा देह होई वेणू, पाच प्राणांची फुंकर मोरपंखी सप्तस्वर, आळविती ग मल्हार

तेव्हा, अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्माचा उन्मत्तपणा घालविण्यासाठी तुझ्या तडितेचा आसूड घेऊन तू येच. तप्त घरांच्या छपरांना थंडावा देण्यासाठी तरी तू येच. दोन घोट पाणी पिण्यासाठी हवास तूच!

पावसा तू सर्वांना हवास. तू नकोस कुणाला? तू हवास साऱ्यांनाच. हवास मखमली गाद्या-गिरद्यांना. हवास फुफाट्यात पोळलेल्या पावलांना. हवास उन्हात तडकलेल्या बुबुळांना. हवास वाट नसलेल्या विहिरींना सुद्धा!

पावसा, पावसा तुझं किती गुणगान गाऊ. तुझा रुसवा, फुगवा आम्हांला परवडणारा नाही, तू नाही आलास तर परवड होईल माझी, आम्हां सर्वांची. सारी सृष्टी संकटात सापडेल. तेव्हा पावसा, खरंच तू आबालवृद्धांचा, गरिबांचा, श्रीमंतांचा सर्वांचाच मित्र आहेस. आमच्या सुख-दुःखांचा साक्षीदार आहेस. म्हणून म्हणतो तुला, विनवणी करतो तुला, नको रे नको, रुसू नको पावसा.

डोळ्यांत नको आसू

ओठांवर हवे हसू

म्हणूनच म्हणतो तुला,

पावसा नको रे रुसू!

Download File

Leave a Comment