पुण्यनगरीत फेरफटका Punyanagarita pheraphataka
आमचं ‘पुणं, तिथं काय उणं’ असं म्हणतात. पाच मिनिटांत पुण्यनगरीत फेरफटका मारणं म्हणजे केवळ अशक्यच. पुणं म्हणजे विद्येचं माहेरघर. ऐतिहासिक परंपरा लाभलेलं, आता उद्योगधंद्यातही अग्रेसर स्वच्छ शहर, सुंदर शहर. आमच्या पुण्यनगरीत फेरफटका मारायचा ना?
बघा, बघा आमचं हे सुंदर पुणं. त्याचं देखणं रूप अगदी तुमच्या नजरेत भरेल. रिक्षावाल्यांची गर्दी, बसची झुंबड, स्कूटर, सायकलींचे ताफे काय घाबरताय? केवढी ही गर्दी. त्यातून वाट काढणं म्हणजे दिव्यच. या गर्दीतून सहीसलामत बाहेर पडणं म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासारखं आहे. म्हणजे ही कलाच नाही का?
काय म्हणताय? चौकाचौकांत पुतळे कशाला उभारलेत? अहो, आमच्यासमोर सतत आदर्श राहावा म्हणून. शिवाय आम्ही पुणेकर मंडळी तसे कृतज्ञच. अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा बघा कसा ऐटीत उभा आहे, झाशीची राणी, ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबूराव सणस, लोकमान्य टिळक या साऱ्यांचे पुतळे सतत कार्याची प्रेरणा देतात.
ही आमची फुले मंडई. तिची रचना बघा किती सुंदर आहे. ही मंडई म्हणजे पुण्याची शान बरं का! आमच्या मंडईत रोज फार मोठी उलाढाल होते. बघा तर, किती रसरशीत भाजीपाला आहे तो.
पुण्यनगरीत आल्यावर उद्यानं, बागा बघायची नाहीत म्हणजे काय? संभाजी उद्यान, एरंडवणा पार्क, शाहू उद्यान, कात्रज बाग, एम्प्रेस गार्डन आणि ही सारसबाग. तिच्याच सहवासात असलेली पेशवे बाग. या सर्व बागा आमच्या शहराच्या सौंदर्यात भरच घालतात.
•ऐतिहासिक वास्तू बघा कशा दिमाखात उभ्या आहेत. गतकाळाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तूत अग्रगण्य आहे शनवारवाडा. हा शनवारवाडा पुण्याच्या लौकिकात, वैशिष्ट्यात भर घालणारा. पेशव्यांच्या शानदार वैभवाच्या खुणा मागे ठेवून हा मोठ्या ऐटीत तुम्हांला साद घालेल. आता चला पर्वतीवर. पर्वतीवर गेल्यावर पेशव्यांची आठवण ताजी होते. महादजी शिंद्यांची छत्री थोडी फटकून दूर उभी राहिल्यासारखी वाटते. आगाखान पॅलेस कस्तुरबांची आठवण करून देतो.
पुणेकर मंडळी इतिहासप्रेमी आहेत तशी धार्मिकही, चला देवळांना भेट द्यायचीय? जिलब्या, पत्र्या, डुल्या, पावन, सोन्या मारुती. एवढे मारुती बलोपासनेची आठवण करून देतात. पूर्वज कसे बलोपासक असतील याची कल्पना येते ना ?
इंग्रजांच्या काळात उभारलेली पुणे विद्यापीठाची वास्तू बघा. उच्च शिक्षणाचं प्रमुख केंद्र. त्याच्याच कुशीत असलेली चतुःशृंगी. नवरात्रात तिचं रूप बघण्यासारखं. भक्तगणांनी फुलून गेलेला तिचा परिसर. पाषाण तलाव, अभयारण्य, अरण्येश्वर, पद्मावती, राजा केळकर म्युझियम, मस्तानी महाल, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय अशा कैक प्रेक्षणीय वास्तू माझ्या पुण्यनगरीच्या लौकिकात भर घालतात. देहू,
आळंदी तीर्थक्षेत्रं म्हणजे पुण्यभूमी. स्त्रियांसाठी पर्वणी असलेली तुळशीबाग, अन् लक्ष्मीरोड पाहिल्याशिवाय फेरफटका पूर्ण होणारच नाही.
आता जाऊ या सिंहगडावर. तानाजी मालुसरेचा पराक्रम जिवंत करणारा. टिळकांचा केसरीवाडा पाहायला विसरून कसं चालेल? पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे पुण्याची शान. टिळक म्हटल्यावर गणेशोत्सव आठवणारच. भांडारकर रोडवर गेलात म्हणजे तेथील प्राच्य विद्या संशोधन संस्थेला भेट दिलीच पाहिजे. फर्ग्युसन रोडवर आलात म्हणजे ब्रिटिश लायब्ररी पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. डेक्कन जिमखाना तुम्हांला नक्कीच आनंद देईल. पुण्यात खवय्यांची चैन असते. भेळपुरी, पाणीपुरी यांची लज्जत औरच. मोठमोठी हॉटेल्सही, पुण्यातील महाविद्यालये, शाळा, विद्यापीठ, विविध शिक्षणसंस्था, बालभारती सारं सारं तुम्हांला नक्कीच प्रेरणा देईल. सकाळ, केसरी, लोकसत्ता, तरुण भारत ही वृत्तपत्रे तुमच्या ज्ञानात भर घालतील.
पुण्यात खरंच काही उणं नाही. इथे कला, विद्वत्ता, इतिहास, संस्कृती, सभा, संमेलनं, नाटकं, प्रवचनं, प्रदर्शनं साऱ्या साऱ्याचा आनंद मिळेल. शिक्षणाची सारी दालनं तुमच्यासाठी सदैव उघडी असतील. या नक्की! आमच्या पुण्यनगरीला भेट द्या. म्हणजे तुम्हीही म्हणाल,
‘पुणं तिथं काय उणं!’