अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Essay on Andhashraddha in Marathi

अंधश्रद्धा व बुवाबाजी

“माला फेरत हाथ में बात करत है और ऐसा साधु सन्त को तीन लोक ना ठौर || तीन लोक ना ठौर कपट की फेरै माला। साहब के दरबार तेरी मुख हुई है काला ॥ कहिते दास कबीर भजन बीतने में छूटा। इतै हुवे बदनाम उतै जमवन कुटा ॥

‘हाती माळ घेऊन नामस्मरण करायचे आणि मनात मात्र वेगळेच विचार! अशा साधु-संतांना तीन लोकांत स्थान नसते. देवाच्या दरबारात त्यांचे तोंड काळे होते. भगत असतो कसा? माणसाच्या डोक्याची कवटी… अंगावर भस्माचे पट्टे… गळ्यात रुद्राक्षाच्या माळा… भयानक चेहरा… वाढलेली दाढी… केसाच्या जटा… रागीट डोळे… कुंकू, तांदूळ, तीळ… लिबू, गुरा, धूप… हे सारं कशासाठी? माणसांना लुटण्यासाठीच ना! अडाणी, भोळा भाबडा समाज… धाव घेतो बाबाकडे… बाबांना विचारतो प्रश्न! मुलं आजारी पडतात, काय करावं? ‘स्वच्छ राहावं, ताजं खावं’ असं सांगत नाही बाबा त्याला! बाबा म्हणतो, “शेजान्यानं करणी केली.” दहा-पाच बकरं, वीस-पंचवीस हजा लुटून मोकळा होतो. बाबाचा तो व्यवसायच… पोटाला चिमटा घेऊन… घाम गाळून कमावलेली वर्षाची पुंजी… आपल्या लेकराबाळांसाठी बाबाच्या हवाली करतो. नव्हे, चोराच्याच हवाली! गोर-गरीबांच्या घरावर डोळ्यादेखत दरोडा घालणारे हे बाबा म्हणजे दरोडेखोरच! त्याने दिवसाढवळ्या केलेली ती फसवणूकच… शेजान्यानं करणी केली, त्यामुळे शेजान्याशी वैर ! यातूनच सुरू होतात कायमची भांडणं! बाबाला मिळतं चांगलं उत्पन्नाचं साधन ! इकडं करणीच्या गैरसमजुतीनं होतात खून… चकरा मारतात कोर्टकचेऱ्यांत… होतो रक्तपात…. चडतात फासावर…. होते संसाराची धुळधाण!

‘वृक्ष काष्ट देखिले मनात बाटे भूत आले ।।

काहीच नसता हडबडले या नाव भ्रम ।।

का उन्मत द्रव्य सेवले तेणे अनेक भासो लागले ||

नाना व्यथा का भुते झडपीले या नावे भ्रम आता जे जे देवीजे ते।

ते पुढे पाविते ते मेले माणूस जेवणा येते या नावे भ्रम ॥

मेले मनुष्य जन्मा आले तेणे काही मागितले ॥ मनी अखंड बैसले। या नावे भ्रम ।’ संत रामदास

भूत, पिशाच्च, करणी हा सारा भ्रम! समर्थ रामदासांचं दासबोधातील हे वचन ! आर्य समाजाचे श्री दयानंद सरस्वती यांनी भूतप्रेत यासंबंधी आपला अभिप्राय सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये ‘भूतप्रेत’ या प्रकरणात दिला आहे. ते म्हणतात, ‘भूतप्रेतं,पिशाच्च या कल्पना अज्ञानी लोक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र व सूक्ष्म भूतविद्या या पदार्थ विज्ञानाचे ज्ञान नसल्यामुळे काही शारीरिक, मानसिक आजार समजून उपचार न करता धूर्त, पाखंडी, महामूर्ख, अनाचारी, स्वार्थी, ढोंगी, कपटी असे मंत्र व तंत्र करणान्या नीच माणसाच्या तावडीत सापडतात. अशा फसव्या माणसास न फसता मुले चीट, शूर व सत्यप्रिय निपजतील, असे वळण त्यांना लावावे.

‘भूमी अवधी शुद्ध जाणा। अमंगळ ते बाराना ।।’

संत तुकाराम जमीन सगळी शुद्ध माणसाची वासनाच वाईट! भूतपिशाच्च काही नाही! परदेशातही भगत, देवऋषी इंग्लंडमध्ये टिटानिया हार्डी या पेटकिणीने ‘प्रेमी मिळविण्यासाठीचे मंत्र-तंत्र-धुपारे यावर पुस्तक लिहिलं आणि त्याच्या एक लाख प्रती खपल्या देखील! खरोखर प्रेमी मंत्रमार्गे, चेटूक करून, जादूटोण्याने मिळतो? की आपल्या सुंदर व चांगल्या गुणांचावरून? झालेल्या प्रेमातही भूत-पिशाच्च दिसायला लागते!

‘म्हणती देव मोठे मोठे पूजिताती दगडगोटे ॥१॥

कष्ट नेणती भोगिती वहा दगडात म्हणती ॥२॥

जीत जीवा करूनी वध दगडी दाविती नैवेद्य ॥३॥

नाक घासुनी गव्हार देवा म्हणती गुन्हेगार ||४||

एका जनार्दनी म्हणे । जन भुलले मूर्खपणे ॥५॥

संत एकनाथ भगताच्या सांगण्यावरून दगडगोट्याच्या देवाला माणसाचा बळी! …. चिमुकल्या निरागस बाळाचा बळी… वर्तमानपत्रातील रोजच्याच बातम्या ! गुप्तधनाच्या आशेने मुलांचे बळी!… पहिली मुलगी देवीपुढे कापाती!… बांधकाम टिकावे यासाठी मुलाला पायात गाडले! .भूत घालवण्यासाठी मुलाचा बळी! …मांत्रिकाच्या सांगण्यावरून ईश्वरतुल्य बालकाचा बळी द्यावा? किती स्वार्थी वृत्ती! दया-प्रेम-आत्मीयता गेली कुठे? मानवता व माणुसकी संपली काय?

खेड्यापाडयात काही बायांना मंत्र-तंत्र, जादूटोणा करणाऱ्या असल्याचे समजण्यात येते. गावात कोणाचे काही बरेवाईट झाल्यास ते आरोप अशा बायांच्या मायी मारण्यात येतात. आपल्याकडे अशा बायांना ‘चेटकीण’ म्हणतात. बिहारमध्ये त्याना ‘डाइन’ म्हणतात. चेटकीण म्हणून नाव जाहीर झालेल्या बायांचे जगणे अतिशय कठीण… समाजात मिसळणेच अवघड… लोकांची सतत बघण्याची संशयी वृत्ती… लोकांचा सततचा तिरस्कार… सारं जगणंच अवघड… त्यापेक्षा मरण बरं! सततची मारहाण… नग्न धिंड… केस कापून टक्कल… तोंडात कोंबलेली विष्ठा… तापलेल्या लोखंडी सळईनं अंगावर डाग… शेवटी हाल हाल करून जाळून मारायचं! खरं आहे हे सारं !

अलीकडे अशा तथाकथित चेटकिणींना शोधण्यासाठी बिहारमधील मांत्रिकांनी’डाइन खोजो यज्ञ’चे आयोजन केले होते. रांची जिल्ह्यातील बुंडू विभागातील हेसियो या गावी हा यज्ञ पार पडला. आजूबाजूच्या गावातील चेटकिणींना यज्ञाद्वारे शोधून काढायचे व यज्ञाच्या ठिकाणी घेऊन यायचे, त्यानंतर त्यांचे कपडे काढून त्यांना नग्न करून त्यांच्याकडून त्यांचे ‘अपराध’ कबूल करवून घ्यायचे अशी यज्ञाच्या आयोजकांची योजना… बरेचदा मागासवर्गीय, दलित महिलेला चेटकीण समजून अत्याचार करण्यात

येतात. बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील धानुक या दलित जातीच्या धर्मदेवी मंडल या ४० वर्षाच्या महिलेला चेटकीण समजून दिवसाढवळ्या बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. पिसाळलेले कुत्रे चावून मरण पावलेल्या वैद्यनाथ या युवकाच्या मृत्यूचा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. पलामू जिल्ह्यातील मांडवा या गावातील निपुडी नावाच्या महिलेला पेटकीण म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला तर ठार मारलेच, शिवाय तिच्या पाच मुलांची हत्या केली. ही मुले दहा वर्षांखालील होती. केवळ सिंहभूम जिल्ह्यात ८४ महिलांना चेटकीण समजून ठार मारण्यात आले. २५ जून २००० रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात जादूटोणा करते, या संशयावरून टीकमाई शाहू या तेवीस वर्षीय महिलेची सामूहिक हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गाव… गावात पुरातन पद्मावतीचं मंदिर… या देवीला बकरं कापण्याची प्रथा… माणसाच्या जिभेचे चोचलं… अण्णा हजारेंचं मन कळवळलं… देवीच्या नावावर हत्या कशासाठी?… पण लोकांना कळणार कसं?… त्यांना सुचली एक युक्ती… यात्रेदिनी पेटवला देवीसमोर होम… देवीच्या नावानं कापलेली बकरे !… देवीलाच करावी अर्पण… टाकायची बकर होमात… न्यायची नाहीत परी!…. कापलं नाही कुणीही बकरू!… बकरू कापतात खाण्यासाठी… खायला मिळणार नाही !….. कोण कापतं बकरू?… बकरीच्या मांसावर फुकटचा ताव मारणारा भगत चिडला!…. त्याच्या अंगात संचारली पद्मावती… लागला ओरडायला, थयथय नाचायला… वेडेवाकडे हातवारे करायला… ‘माझा रस्ता बंद केला, देवी पाहून घेईन.’ लागला ओरडायला…. देवी कधी कोपलीच नाही… लोकांच्या मनातली भीती कमी होईना! कार्यकर्त्यांनी भगतालाच चोप दिला! त्याच्या अंगात संचारलेली देवी पळाली! असं प्रत्येक गावात व्हायला हवं. बुवाची संगत सगळ्यांनीच सोडायला हवी.

ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू ॥ १ ॥

अंगा लावुनिया राख डोळे झाकुनी करिती पाप ॥२॥

दाजुनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा ॥३॥

तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती ॥४॥

Also read:-