व्यसन एक समस्या वर निबंध मराठी | Essay On Vyasan Ek Samasya in Marathu

व्यसन एक समस्या (धार्मिकतेमधून व्यसनमुक्ती)

व्यसन एक समस्या वर निबंध मराठी | Essay On Vyasan Ek Samasya in Marathu

भारतभूमी ही सुपुत्रांची जननी आहे. ह्याच मातृभूमीने लाल-बाल-पाल यांसारख्या महान नेत्यांना जन्म दिला. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, सावतामाळी यासारख्या संतमहात्म्यांना जन्म दिला. ‘सर्वधर्म समभाव’ या सूत्राप्रमाणे आचरण करण्याचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. भारतासारख्या अखंड भूमीमध्ये नाना धर्म आहेत. अठरापगड जाती आहेत. भ्रामक भ्रम आहेत. अंधश्रद्धेचे प्राबल्य पण आहे. अशा अहितकारी बाबींचे पीक मोठ्या जोमाने वाढलेले आहे. कोणाच्या हातात बिडी तर कोणाच्या हातात सिगारेट, तर कोणाच्या हातात तंबाखू तर कोणाच्या हातात गुटखा तर कोणाच्या हातात बाटली…! या संपन्न भारतभूमीला असंपन्न बनविण्याचा प्रयत्न काही महाभाग करीत

आहेत. पाश्चात्यांचे अनुकरण करून हे व्यसनाचे जाळे सर्व भारतभर पसरलेले आहे. ते उखडून टाकण्याचे काम आजकाल तरुण वर्गावर येऊन पडलेले आहे. ज्याने हे काम करावयाचे तोच या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे प्रगती खुंटली आहे. अज्ञानाचे जाळे सभोवताली पसरून तेच पांघरून घेऊन अंधारात चाचपडून जगणे तरुण वर्ग पसंत करीत आहे. आता आपणास याचा विचार करावा लागेल की जीवन जगण्यास जशी हवा, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या पाच बाबींची गरज आहे, पण व्यसनाधीन माणूस हा सहावी गरज दारू पिणे किंवा तत्सम व्यसन समजतो.

सध्या तरुण मुले – विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण पिढी अडकलेली आहे. याचे मूळ कारण पालक वर्ग डोळे असून आंधळा झाला आहे. हाच निडर झालेला पाल्य आई-वडिलांना दमदाटी करून पैसे उकळीत आहे. ‘पित्याने केला पुत्राचा खून’ यापेक्षा ‘पुत्राने केला पित्याचा खून ठळक अक्षरात आपण पेपरमध्ये अधिक वाचतो, त्याचे कारण हेच होय.

दुसरे असे की अनेक उत्सव, राण, सम्न समारंभ, जयंती-पुण्यतिथी साजरी करतांना देखील तरुण पिढी ढोलाच्या तालावर मद्यप्राशन करूनच नाचत असते. आजकाल कोणतेच लग्न वेळेवर लागत नाही. याचे कारण जर विचारले तर तरुण मुले पिऊनच गाणी म्हणतात. बँडच्या तालावर नाचत असतात. यासाठी जनजागृती मोहीम सुरू करणे गरजेचे आहे. लग्नात वाद्यच नको म्हणजे ही मुले मद्य पिणार नाहीत आणि नाचणार नाहीत. फक्त प्रभातफेरी काढून व अत्यंत महत्त्वाच्या घोषणा देऊन अखंडतेच्या, एकात्मतेच्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचे जतन करण्यास तत्पर राहणे गरजेचे आहे. मंगल वाद्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक गावात एक जनजागृती तरुण मंडळ असावे. कीर्तन, प्रवचनासारखे तसेच समाजसेवकांचे जनजागृती अभियान कार्यरत असावे. विकृती किंवा विडंबन होणार नाही असेच कार्यक्रम असावेत. अशा कार्यक्रमात वृत्ती आणि कृती यांचा सुरेख संगम पाहवयास मिळावा. भगवान श्रीकृष्णाने जसा अर्जुनास मार्ग दाखविला तसा व्यसन सोडून शरीराचे संरक्षण करणे हाच खरा धर्म होय आणि तो धार्मिकतेमधूनच शक्य होय. या ठिकाणी कवितेतून सुचवावेसे वाटते की

जेव्हा समजेल सत्त्व, कळेल हे नीट तत्त्व, तेव्हा येईल प्रथिती यासाठी पाहिजे संताच्या विभूती

येथे नमूद करावयास पाहिजे की, कायदा हा तुटपुंजा पडतो. कायद्याने सर्व गोष्टी सर्व काळी नियंत्रणात येऊ शकत नाहीत. त्यासाठी स्वयंअनुभवाची साथ परिणामी काम देते. असे मनोमन पटल्यावरच तो मनाने शहाणा जेव्हा होईल तेव्हाच तो व्यसनमुक्ती करील. इंग्रजी वचनात म्हटलेच आहे ना. “Self-control is the best control.
जेव्हा घरच्या लोकांचे, मुला-बाळांचे आई-वडिलांचे पिणारा हा ऐकत नसतो तेव्हा समाजातील. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सामूहिक भीती दाखवली पाहिजे, म्हणजे तो घरच्या माणसापासून दूर जाणार नाही. वेळप्रसंगी साम-दाम-दंड-भेद या (नैतिक) शिक्षाही त्यास द्याव्या लागल्या तरी समाजाने तेवढे करावे, म्हणजे पिणाऱ्याची (दारुड्याची) ‘इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली की तो आपणच शहाणा होईल.

“साक्षर जनता भूषण भारता’ या म्हणीप्रमाणे तसेच साक्षर गाव समर्थ गाव’ या उक्तीप्रमाणे गावातील प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने चौफेर नजर टाकावी, म्हणजे फलश्रुती होईल. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे उद्बोधन वर्ग सुरू करावेत. गुप्तरोग का व कसे होतात? गुप्तरोग झाल्यानंतर रुग्ण कसा खंगत जातो ? धुम्रपानाचे तोटे कसे? आणि रोगी कसा मरतो? असे चित्रपट खेडोपाडी दाखवावेत. टी.व्ही., रेडिओसारख्या प्रसारमाध्यमामार्फत अधूनमधून माहिती सांगावी व प्रात्यक्षिक दाखवावे. थोडक्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून, सिनेमातून त्यास शिक्षण मिळाल्यानंतर तो अधिक शहाणा होईल. विशेषतः कलापथक, पथनाट्य, गाणी नकला, करमणुकीचे कार्यक्रम, भारूड यामधून जनजागृती होणे गरजेचे आहे. शेवटी बोट जाते मूल्यांकडे! मूल्यांचे धडे रुजविण्याचे काम आपणास करावयाचे आहे.

Also read:-