अस्पृश्यता एक कलंक
पशु-पक्षी, नर-नारी
ये सब ताडने के अधिकारी
असं कुणीतरी म्हणून गेलं आणि या ओळीतूनच मानवी मनात लपलेला जातिभेदाचा राक्षस आपलं अस्तित्व दर्शवू लागला माणुसकीची होळी, पशुत्वाचे प्रदर्शन आणि बंधूभावाची राखरांगोळी करून आमचा मानवधर्म आम्ही विसरतच चाललो. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधूत्व या कल्पना फक्त कल्पनेतच रमल्या आणि जातिभेदाचा, अस्पृश्यतेचा एक प्रचंड वणवा आमच्या माणुसकीला नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न करू लागला.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र
पुसून टाका हा भेद
या भेदाच्या अस्तित्वाने
मानवतेला जातो छेद
आमच्या पुढील पिढीला आम्ही कितीही संस्कारित करण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या मनातील अस्पृश्यतेची
भावना काही पुसली जात नाही.
‘जात नाही ती जात’ असं असणारी ही जात अगदी जन्मताच मानवाला चिकटते. जन्म झाल्याबरोबर दवाखान्यात नोंद करताना हिंदू मुस्लिम या धर्माबरोबरच जात-पोटजातही लिहावी लागते. आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी हा जन्माचा आणि जातीचा दाखला आपल्याला दाखवावा लागतो इथंच जातीयतेचं आणि अस्पृश्यतेचं बाळकडू दिलं जातं. निष्पाप आणि निरागस समजलं जाणारं ते बालक कुणी ब्राह्मण बनलं, कुणी क्षत्रिय, कुणी वैश्य तर कुणी शुद्र ! असे असंख्य पोटजातींचे शिक्के त्या जन्म-जातीच्या दाखल्याबरोबरच त्या बालकाच्या कपाळावरही मारले जातात. ते मृत्यूपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत आणि मानव म्हणून जन्माला येऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगू इच्छिणारा तो बालक आपल्या जाती-पोटजातींच्या विचारात स्वतःला हरवून बसतो, मानवता गमावून बसतो.
निघालो मंदिरात मानवतेच्या
पोचलो रोरखात दानवतेच्या
अशी त्याची अवस्था होते, मग शाळेच्या प्रत्येक अर्जावर, नोकरीच्या प्रत्येक अर्जावर जात-पोटजात लिहावी लागते.
जात कोणती पुसू नका
धर्म कोणता पुसू नका
असे म्हणत म्हणत जातीचा दुराभिमान आमच्या मनात पोसला जातो. मित्रहो, प्राचीन काळात समाज व्यवस्था नीट व्हावी म्हणून आपल्या पूर्वजांनी ४ वर्णाची पद्धत रूढ केली त्यातही त्यांचा दृष्टिकोन समाजकल्याण हाच होता. हे ४ वर्ण पाडताना त्यांनी कोणताही संघर्ष होणार नाही. याची काळजी घेतली होती समाजाच्या सर्व गरजांचा सर्वांगाणे विचार करून १) ब्राह्मण वेदाध्यायन व ज्ञान २) क्षत्रिय संरक्षण ३) वैश्य उदीम व्यापार ४) शुद्र सेवा असे ४ वर्ण सुस्थापित केले होते; परंतु पुढे-पुढे वातला समाजकल्याणाच विचार मागे पडून जातीचा अभिमान व दुराग्रह सुरू झाला जातीय संघर्षाला सुरुवात झाली. जातीय संघर्ष पेटत राहिला, डोकी फुटू लागली आणि प्राण जाऊ लागले, सर्व जातीच्या लोकांचा एका बाजूला विज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीचा ध्वज उंच फडकविणारा भारत या जातिभेदामुळे विनाशाकडे ओढला गेला. ‘बिनाशकाले विपरीत बुद्धी, मग दोनच जाती निर्माण झाल्या, अन्याय करणारे आणि करून घेणारे, अन्याय सोसणान्यांना प्रगती, सुखाची कवाडे बंद झाली. शिक्षणाचा प्रकाश अडवला जाऊन अज्ञानाच्या अंध:कारात त्यांना ढकलेले गेले. ते अज्ञानातच पिचत राहिले, सडत राहिले. अमूक समाजाचा नायक बनून एखादेव फुले, आंबेडकर उदयाला आले. ज्यांनी या अस्पृश्यतेला नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. पण आज आम्ही जातिभेद पाळतो आहोत. अस्पृश्यता पाळतो आहोत. आमच्यातली माणुसकी विसरत आहोत. सरकारचे अल्पसंख्यांकांचे धोरण हे जातिभेदाला खतपाणी घालणारे आहे. मग ही अस्पृश्यता कधी जाणारच नाही का? यावर उपाय नाही का? मित्रांनो, या प्रश्नांना उत्तरे नाहीत असे नाही. ही अस्पृश्यता जाईल, यावर उपाय आहे. निश्चित आहे. तो म्हणजे प्रत्येक माणसाच्या माहितीत एकच उल्लेख करावा लागेल हिंदू मानव, तुम्ही म्हणाल पुन्हा हिंदू? पण हिंदू म्हणजे भारतीय प्रत्येकाच्या जन्म दाखल्यावरचा जात विभाग काढून टाकून तेथे केवळ भारतीय मानव एवढीच माहिती लिहिली गेले पाहिजे. जातीनुसार कोणत्याही सवलती न देता त्याच्या योग्यतेनुसार शिक्षण, काम मिळाले पाहिजे. अनुरूप व्यक्तिमत्त्व पाहूनच विवाह झाले पाहिजेत. झाले तर या अस्पृश्यतेच्या शापातून आम्ही मुक्त होऊ. आम्ही मानव म्हणून जन्मलो आणि मानव म्हणूनच मही प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतली पाहिजे व ती पाळली पाहिजे. तरच हा कलंक पुसला जाईल,
रात्रीच्या गर्भात उजळेल
अंध:काराची प्रीत
कपाळावरून पुसली जाईल.
प्रत्येकाची जात
मना-मनात ओसंडेल
मानवतेचा खोत
कणा कणात पेटवू ही स्नेहाची ज्योत
असा मंगल-मंगल जय मांगल्याचा होईल.