माझा देश निबंध मराठी | Maza Desh Marathi Nibandh

माझा देश: असा आहे, असा असावा निबंध मराठी

सहज एकदा व्हरांड्यात बसले असता कुठून तरी नवीनच एका गाण्याचे सूर कानावर आले. ते असे- “ये दुनिया एक दुल्हन दुल्हन… ये माथे की बिंदीया…. आय लव्ह माय इंडिया…” आणि मनात विचार आला आज आपला देश खरंच का कुणाच्या तरी माथ्यावरील बिंदिया बनण्याच्या लायकीचा आहे? खरं तर आपल्या हिंदू परंपरेत कुणा नववधूच्या माथ्यावरील ‘बिंदी’ तिच्या शुचिर्भूतपणाचं, तिच्या एकनिष्ठतेचं, तिच्या मांगल्याचं प्रतीक समजलं जाते. पण आज जेथे कुंकवाचा जमाना जाऊन टिकल्या पुढे आल्या आणि ‘टिकली तर टिकली नाही तर टाकली’ असं म्हणण्याकडे कित्येक आर्य स्त्रियांचा कल झुकत चालला आहे. वृत्तपत्र, दूरदर्शनवरील जाहिरातींमधून, सिनेमांमधून देह प्रदर्शनाचे उत्तान दृश्य देऊन आपली अन्नू वेशीवर टांगण्याइतपत ज्या हिंदू नारींची मजल गेली आहे, तो देश खरंच का कोणाच्या माथ्यावरील बिंदीचं स्थान मिळवू शकेल? देशम्हणजे काही नुसत्या नकाशावरील वाकड्या तिकड्या रेषा नव्हे की देशातील नद्या, नाले, समुद्र, डोंगर पर्वत, दगड धोंडे, अफाट लोकसंख्यावाढ यावरही देशाचं मोठेपण अवलंबून नसते. तर देशाची महानता तेथील लोकांच्या सुखसमृद्धीवर त्यांच्या शुचिर्भूतपणावर, वांच्या माणुसकीवर अवलंबून असते.

लाखो लोकांच्या प्राणार्पणातून जन्माला आलेल्या या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेतो आहोत का? की या स्वातंत्र्याचा कुठे अतिरेक तर नाही ना होत? या स्वातंत्र्याची जागा कुठे स्वैराचाराने तर नाही ना घेतली? अशा अनेक प्रथांचे वादळ मनात उठते आणि ते साहजिकही आहे. कारण आमच्या पूर्वजांनी नुसती आपल्या प्राणांची आहुती देऊन आम्हाला स्वातंत्र्यच मिळवून दिले नाही तर आपल्या सत्कृत्यातून कित्येक आदर्श तत्वज्ञान, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये आमच्यापुढे ठेवून गेलेत. पण आज त्यांची ती नीतीमूल्ये, जीवनमूल्ये ठायीठायी पायदळी तुडवताना दिसतात ज्या गांधीजींनी आम्हाला रात्य, शांती, अहिंसेची शिकवण देण्यात आपली सारी हयात घालविली, त्याच गांधीजींची अखेर हत्या करण्यात आली आणि त्या घटनेपासून आजतागायत या हिंसेला मात्र कुठे मूठमाती मिळालेली नाही. ज्या आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाचा घढा दिला, आज त्यांचा तो स्वाभिमान आम्ही ठायी ठायी लाचारीकडे गहाण टाकला आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटी. मग कसे म्हणावे की, आजही आपण स्वतंत्र आहोत. कारण ५० वर्षापूर्वी जरी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला असला तरी आज पुन्हा तो हिंसाचार, भ्रष्टाचार, वासनाकांड, दहशतवाद याच्या गुलामगिरीत अडकलाय आणि या सर्वांचे आपल्यावरील अत्याचार गतकाळातील इंग्रजांच्या अत्याचारापेक्षाही भयंकर आहेत.

एकेकाळी सुवर्णभूमि असा लौकिक असलेला आमचा देश आज आर्थिकदृष्ट्याच नाही तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाररूपी राक्षसाने थैमान घातले आहे. आपल्या देशातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर पूर्वी भारतात ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जात असे. परदेशातून कितीतरी लोक ज्ञानार्जनासाठी भारतात येत, पण आज आमच्याच देशात आमच्याच बुद्धीमत्तेचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. आमची बुद्धीमत्ता आज पैशाच्या तराजूत तोलली जाते आणि हेच कारण आहे की, आज देशात बेकारीच्या समस्येला ऊत येत आहे. नुसतं आवडीच्या क्षेत्रात जाऊन आणि आवडीचं शिक्षण घेऊन युवकांचा प्रश्न सुटत नाही तर शिक्षण संपते ना संपते तोच त्यांच्यासमोर नोकरीचा प्रश्न उभा राहतो. मग कुणीतरी सल्ला देतात ‘स्वयंरोजगार करा पण सगळेच युवक स्वयंरोजगार कसे करणार? कारण उद्योजक बनणे हीदेखील आज सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यातही जीवघेणी स्पर्धा, गैरव्यवहार आलेच की आणि असे गैरव्यवहार फक्त नोकरी व्यवसायाच्याच संदर्भापुरते मर्यादित नाही तर शाळा, महाविद्यालये, मोठमोठी विद्यापीठे यामधूनही असे भ्रष्टाचार, गैरव्यवहार रोज घडतच असतात. याचं एक ताजं आणि जिवंत उदाहरण म्हणजे नुकतंच बोगस गुणपत्रिकांमुळे नागपूर विद्यापीठाची झालेली नाचक्की. अलीकडेच आपल्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना नीतिमूल्यांचे धडे देण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी शाळांमधून मूल्यशिक्षण’ नावाचा एक अभिनव अभ्यासक्रम सुरू केला, पण आमच्या राज्य सरकारला एवढं कळत नाही की, नुगतं शाळेतून शब्दाने शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करता येत नाही तर त्यासाठी गरज आहे, ती प्रत्यक्ष कृतीची. तरुणांच्या बुद्धीमतेचा कौशल्याचा पुरेपूर उपयोग व्हायला हवा. केवळ पैशाच्या मागे न लागता ज्या व्यक्तीत उद्योजक बनण्याचे कसब असतील, त्या व्यक्तीच्या त्या गुणांना वाव मिळायला हवा. त्यांच्या स्वयंरोजगाराला उत्तेजन मिळायला हवे. ज्या व्यक्तीची कुवत प्रशासकीय कामास अधिक योग्य असेल त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा उपयोग प्रशासकीय कामातच अधिक व्हायला हवा तरच विकास होईल. गेल्या कित्येक वर्षापासून दररोज शाळेत सुरुवातीला प्रतिज्ञा म्हटली जाते. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत….’ वगैरे वगैरे. पण ही प्रतिज्ञा कोणी अंमलात आणताना दिसतात का? नुसती सवय झाली म्हणून शाळेत गेले की, प्रतिशा खोकायची एवढंच या प्रतिज्ञेचं स्वरुप उरलं आहे. कारण यातील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ एवढी एकच ओळ जरी सर्वानी अंमलात आणली तरी जागोजाग पडून येणारे वासनाकांड हिंसाचार, दंगली होणार नाहीत. मात्र, ही परिस्थिती नुसते कायदे करून आटोक्यात येणारी नाही. तर त्यासाठी आजच्या युवकांची मानसिकताच बदलणे आवश्यक आहे.

आमच्यातील राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव हेही आज आमच्यातील सर्वात मोठे वैगुण्य आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन भारताचा विकास व प्रगती सहन न होणाऱ्या काही परकीय शक्ती आमच्या देशात अराजकता पसरवू पाहतात. आज लोकसंख्येचा प्रग्रही आमच्या देशाला तितकाच घातक ठरत चालला आहे. कारण देशात हल्ली लोकांची संख्या वाढत चालली असली तरी तेवढ्याच प्रमाणात माणुसकी मात्र घटत चालली आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या, बेकारी, हिंसाचार, भ्रष्टाचार या सगळ्यांमागे जर मूळ कारण कोणते असेल तर ते आहे लोकसंख्या वाढ आणि ही समस्या सोडविण्याकरिता तरुणांच्या सहकार्याची अधिक गरज आहे. हे राष्ट्र माझं आहे. यातील संपत्ती, प्रत्येक समस्या माझी आहे. तेव्हा आपली समस्या आपणच सोडविली पाहिजे, आपल्या संपत्तीचं आपणच रक्षण केलं पाहिजे, अशी उदात्त भावना राष्ट्रीय एकात्मता सर्वांमध्ये रुजली तर देशात वयमृद्धी, सुराज्य यायला वेळ लागणार नाही.

Also Read:-