Marathi essay on environment पर्यावरण वर मराठी निबंध
मित्रांनो, आपण पर्यावरण, वातावरण असे शब्द नेहमीच ऐकत आलो आहोत आणि सध्या जगात सगळीकडे निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय, पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. पण पर्यावरण म्हणजे काय? त्याचा समतोल म्हणजे काय आणि तो बिघडला म्हणजे काय? हे काहीच कुणाला नीटसं कळालेलं नाही. पर्यावरण म्हणजे जलचक्र, पर्यावरण म्हणजे पावसाचे प्रमाण, पर्यावरण म्हणजे हवामान असे अनेक गैरसमज आपण करून घेतो आणि पुन्हा नेमकं काय ते समजायचं आणि सांगायचं राहून जातं. त्यामुळे या पर्यावरणाबद्दल अनेक समजा गैरसमज होत राहिले आहेत आणि होत राहतात. पर्यावरण या शब्दाला एवढा संकुचित अर्थ नाहीच मुळी.
कारण पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली भौतिकशास्त्रानुसार पडणारी प्रत्येक दृष्या अदृश्य घटना. माझी ही व्याख्या ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण ही व्याख्या मी केलेली नाही तर रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ डेसिल डोरोवस्की यांनी ही व्याख्या केली आहे. त्यांनी आपल्या पर्यावरणावरच्या लेखामध्ये “मानवाच्या सभोवती भौतिकशास्त्रानुसार घडणाच्या प्रत्येक दृश्य, अदृश्य घटना म्हणजे पर्यावरण” अशी व्याख्या केली आहे आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण मंडळात ती मान्यही केली आहे. अधिक सखोलतेने विचार केला असता ही व्याख्या पर्यावरणाचा संपूर्ण विचार करणारी ठरते हे मान्य करावे लागेल.
मानवाच्या सभोवताली भौतिकशास्त्रानुसार घडणारी प्रत्येक दृश्य आणि अदृश्य घटना म्हणजे पर्यावरण, मानवाचे संपूर्ण जीवन त्याच्या सभोवतालच्या या भौतिक घटनांवरच अवलंबून आहे. या भौतिक घटनांचे सुद्धा
दोन प्रकार पाडता येतात.
(१) केवळ निसर्गनिर्मित भौतिक घटना
२) मानवनिर्मित भौतिक घटना
आपण प्रथम निसर्गनिर्मित भौतिक घटनांचा विचार करूया. निसर्ग सृष्टीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच प्रमुख तत्त्वे आहेत. आपण त्यांनाच पंचममहाभूते म्हणतो. ही पाच प्रमुख तत्त्वे म्हणजे पर्यावरणाचे पाच प्रमुख आधारस्तंभ आहेत. या पाच प्रमुख तत्त्वांचा एकमेकांशी असलेला संबंध ठराविक नियमानुसार स्थिर असतो आणि त्याचे स्थिर असणे म्हणजे मानव जातीचे संपूर्ण कल्याण होय. आज पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या स्थिर संबंधालाच कुठेतरी तडा गेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. आपण सध्या प्रगत विज्ञान शिकत असल्यामुळे हा तडा कुठे आणि कसा गेला आहे हे आपल्याला जाणवते. पृथ्वीवर दिवस, रात्र, आठवडा, महिना, वर्ष नियमितपणे होत राहतात. पृथ्वी फिरत असताना तिचा भोवतालच्या इतर वायूंशी संबंध येतो आणि या वायूंचे समतोलत्व असेल तर पृथ्वीची फिरण्याची गती ठराविक राहाते. पण दुसरेतत्व आकाश. हे यासाठी समतोलित असावे लागते. पण आकाशातील वायूंच्या प्रमाणात कमी जास्तपणा निर्माण आजच्या अणुस्फोटांच्या आणि अंतररिक्षयानांच्या युगात हे समतोलत्व का व कशामुळे बिघडले. हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. इथे पृथ्वी आणि आकाश यांच्यातील समतोल बिघडला.
अवकाशात तरंगणारे वायू ठराविक प्रमाणात पाण्यात विरघळतात. ते विरघळविण्यासाठी पावसाची फार मोठी मदत होते. पण ही मदत करणारा पाऊस आमच्यावर का रूसला हे जंगलतोडीमुळे झालेले नुकसान कळल्यानंतर पुन्हा प्रतिपादन्याची गरज नाही. पावसाच्या पाण्यात विरघळलेले हे वायू जमिनींवरील पाण्याबरोबर वाहतात आणि जमिनीत सर्वत्र मिसळतात. जमिनीचा कस वाढतो. पण त्याऐवजी दूषित वायू पाण्याबरोबर जमिनीत मिसळल्याने पिकांसाठी आम्हाला सुफला, युरियाची गरज भासू लागली आणि इथं पृथ्वी आणि पाणी यांचा समतोल बिघडला. याच वायूमिश्रित पाण्याचे बाष्प होऊन त्याचे ढग बनल्यामुळे पडणारा पाऊसही दूषितच पडतो. परवाच ‘सायन्स टुडे’ मध्ये मी वाचलं की कदाचित इथून पुढे ॲसिडयुक्त पाऊस पडेल आणि या दूषित वातावरणाचा परिणाम सूर्यप्रकाशावरही होईल. अशा तऱ्हेने या पंचतत्त्वांचा एकमेकांशी असलेला संबंध बिघडला आणि पर्यावरणाचा समतोलही बिघडला. निसर्गनिर्मित भौतिक घटनांमध्ये मानवाने आपल्या स्वार्थासाठी ढवळाढवळ केली आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या एकमेकांशी असलेल्या सुसंवादाला तडा गेला.
मानवाने आपल्या प्रगती दर्शनाच्या हव्यासापायी वातावरणात काही घटना घडवून आणल्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवली. अणुस्फोट, अंतरिक्ष याने, तेल कारखान्याच्या आगी, बेसुमार जंगलतोड, अनेक रासायनिक कारखाने, रासायिनक खतांचा बेसुमार वापर करून थोड्या दिवसांत पीक घेण्याची घाई, वाढती लोकसंख्या, रासायनिक प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ या सर्वांमुळे पर्यावरणाचा तोल सुटत चाललाय आणि या सुटलेल्या तोलाचे भान कुणालाच नाही.
आज ज्या त्या प्रगत राष्ट्राने अणुस्फोटाची चाचणी घेण्यातच स्वतःच्या प्रगतीचे सार्थक मानले आहे. पण आपण कणभर प्रगती करत असताना मणभर नुकसान करून घेतो आहोत हे या प्रगत राष्ट्राच्या लक्षात येत नाही. जास्तीत जास्त सुखसोयी निर्माण करताना आपण गैरसोयींना जन्म देतो आहोत याचं साक्षात उदाहरण म्हणजे परवा अरबी समुद्राच्या ७०० चौ. मी. परिसरावर पसरलेले. त्यामुळे माणसांना आणि माशांना निर्माण झालेला धोका, आपल्या सुखाचा विचार करताना झाडावर पडणारी कुन्हाड ही पर्यायाने आपल्या पायावर पडणार आहे. नव्हे पडली आहे. याचा बुद्धिमान मानवाला विसर पडला. कोणत्याही गोष्टीची इन्स्टंट प्रत मिळवणाच्या मानवाला याचाही विसर पडला की, धान्यनिर्मिती पूर्ण होण्यासाठी ठराविक दिवसांची आवश्यकता असतेच असते. पण २१ व्या शतकात लवकरच पोहोचण्याची घाई झाल्यामुळे लवकरात लवकर धान्य हाताशी कसे येईल, असा विचार करून रासायनिक खतांचा वापर मानवाने सुरू केला. आणि उत्पादननिर्मितीचा वातावरणातील समतोल बिघडला.
पृथ्वीवर असणारी सर्व जीवनोपयोगी साधन संपत्ती एका मर्यादित कक्षेपर्यंतच पुरणार आहे. हे या प्रगत मानवाला माहिती असूनसुद्धा वाढत्या लोकसंख्येला तो आळा घालू शकत नाही. हे आमचे दुर्दैव आहे. आमच्या सर्व जीवसृष्टीला स्वतःच्या जिवावर तोलून धरणान्या या पृथ्वीचा आधार कमी होत चाललाय हे आपल्याला माहीत आहे काय? पृथ्वीच्या पोटात असलेली खनिजे मानव हावरेपणाने काढून घेतो आहे. पृथ्वीचा जीवनरस शोधून घेतो आहे आणि या परिणाम होतोच तो महाभयंकर आहे. आजवर सुप्त आणि निद्रिस्तावस्थेत असलेले ज्वालामुखी जागृत होताहेत, जिवंत होताहेत. जमिनीच्या पोटातील लाव्हारसाचे प्रमाण वाढते आहे आणि याचा परिणाम?
आजपर्यंत एकमेकांच्या साथीने चालणारे, सोबती असलेले निसर्ग आणि मानव हे एकमेकांचे शत्रू चाललेत. प्रत्येकजण दुसऱ्यावर कुरघोडी करू पाहतोय याचा परिणाम ? सर्वनाश तुमचा, माझा, या पृथ्वीचा, वा सजीवसृष्टीचा सर्वनाश! म्हणून मित्रांनो, आपण वेळेवर सावध होऊया, आपला जीवलग मित्र निसर्ग त्यांच्या मैत्रीची बूज राखूया आणि पर्यावरणाचा समतोल साधून मानवी जीवनाचा ताल आणि तोल सांभाळ्या.