स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान प्रदर्शनास भेट देतात | Essay On Science Exhibition In Marathi

Essay On Science Exhibition In Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान प्रदर्शनास भेट देतात

पुणे विद्यापीठात विज्ञान प्रदर्शन भरले होते. प्रचंड गर्दी विज्ञानावरील प्रेम दाखवत होती. त्या दिवशी चक्क सावरकर प्रदर्शनाला भेट द्यायला आले. आम्हांला खूप आनंद झाला. आम्ही सावरकरांबरोबर विज्ञान प्रदर्शनातून फिरू लागलो. सावरकर बोलत होते. वाऽऽ तुम्ही मुलं किती भाग्यवान. आमच्या काळात अशी प्रदर्शनं भरत नव्हती. आम्ही जो समाज पहिला तो पाश्चात्यांपेक्षा एकहजार वर्षे मागे असलेला समाज पोथीनिष्ठ राहिला की, त्याची बुद्धी खुंटते.

म्हणूनच विज्ञानशास्त्राची उपासना आवश्यक आहे. तेवढ्यात आम्ही लढाऊ नौका, विमाने या दालनात येऊन पोहोचलो, ही प्रगती पाहून सावरकरांनी समाधान व्यक्त केले. आम्ही त्यांना याबाबत माहिती सांगण्याचा आग्रह केला. त्यांनी सांगायला सुरुवात केली. आपला उत्कर्ष होतो तो विज्ञानाच्या बळावरच. नुसती श्रुती, स्मृती पुराणे वाचून निभाव लागणार नाही. या देशात पूर्वी मोठमोठ्या लढाऊ नौका, पारा वापरून हजारो मैल उडणारी विमानं, हजारो वर्षे जसंच्या तसं टिकू शकणारं अजंठ्याच्या लेण्यासारखं अप्रतिम शिल्प ही सगळी प्रगती विज्ञानाच्या बळावरच साधली होती. आज भारत देखील अण्वस्त्रधारी बनला आहे. पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्या यामुळे तर आपल्याला जगात स्थान मिळाले. अणुशक्तीचा वापर मात्र मानवाच्या कल्याणासाठी व्हायला हवा. संहार नको.

पूर्वीचा काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा होता. त्यांनी जे-जे भारतीय होतं ते ते मागासलेलं, बुरसटलेलं, निरूपयोगी असं आम्हांला मुद्दामच शिकवलं होतं. आज आपण स्वतंत्र आहोत, तरीही खेड्यापाड्यात म्हणावं तशी अजून प्रगती नाही याचं वाईट वाटतं. तुम्ही शहरातली मुलं किती भाग्यवान आहात. तुमच्या शाळेत प्रयोगशाळा आहेत. तुम्हांला प्रयोग करून बघता येतात. तुम्ही पुष्कळ उपकरणं तयार करता प्रदर्शन भरवता. खरंच खूप बरं वाटतं. पण मुलांनो, तुमची निरीक्षणशक्ती, जिज्ञासूवृत्ती, प्रयोगशीलता, वाढली पाहिजे. विज्ञान प्रदर्शन, शोभेच्या वस्तू, कलात्मक वस्तू पाहतात तसं नसतं रे पाहायचं. त्यातून विविध प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गप्पा मारता मारता वैज्ञानिकांची ओळख करून घेण्यासाठी एका दालनात शिरलो. प्रथमदर्शनीच सावरकरांचा फोटो. आम्ही चटकन् सावरकरांकडे पाहिलं. सावरकर म्हणाले, ‘हा नुसता फोटो आहे. निर्जीव फोटो. व्यक्तीच्या महात्म्यापेक्षा त्याच्या कार्याचा गौरव करावा. माणूस मुळात अत्यंत दुबळा. आज तो कशामुळे प्रबळ बनलाय?” आम्ही चटकन सांगितलं, ‘विज्ञानाच्या बळावर’ त्यावर सावरकर खूश झाले. ते म्हणाले, ‘कवच’ आहे माणसाची त्वचा. ‘दुर्बिण’ हा त्याचा डोळा. ‘दूरध्वनियंत्र’ आहे त्याचा सहस्रपट श्रवणक्षम बनलेला कान. आजची ही नानाविध विमानं आहेत त्याला फुटलेले वैज्ञानिक पंख. म्हणून तर त्याला आज दूरश्रवण, दूरगमन शक्य झाले आहे.

‘विज्ञान ग्रंथ’ कक्षातील प्रचंड ग्रंथसंपदा पाहून सावरकरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. ते भारावून म्हणाले, ‘अरे आमच्याकाळी एवढी ग्रंथसंपदा नव्हती. तुमच्याजवळ फार मोठा खजिना आहे. समृद्धी यालाच म्हणतात. ज्ञानपिपासू व्हा. चिरंतन, शाश्वत अशा ज्ञानाची कास धरा. “Knowledge means Science, Systematic knowledge means Science!”

संगणक, इंटरनेट, वेबसाइट हे सारं पाहून मात्र मनात बेकारीची शंका येतीय खरी. यंत्र म्हणजे शतपटीनं अधिक कार्यक्षम झालेलं मनुष्याचं एक बहिश्चर इंद्रिय! बेकारी यंत्रानं वाढत नाही, तर विषम वाटणीमुळं, हा काही यंत्राचा दोष नाही. आपल्या राष्ट्राचा अध:पात थांबवा. भ्रष्टाचाराचा भस्मासूर पार जाळून टाका. तुम्ही मुलं उद्याचे नागरिक, देशाचे आधारस्तंभ आहात. वर्तमानाचे भान ठेवा. भूतकाळाच्या पारंब्या धरून भविष्याकडे वाटचाल करा.

सावरकरांनी आम्हांला विज्ञानप्रदर्शनांकडे पाहण्याची, विचार करण्याची नवी दृष्टी दिली. आमच्या सर्व शंकांचे निरसन केले. आम्ही सर्वांना ही गोष्ट सांगितली तेव्हा सगळ्यांनी आम्हांला वेड्यात काढलं. पण असो, कुणी काहीही म्हणो. सावरकरांचा विदेह आत्मा आम्ही जेव्हा जेव्हा विज्ञानाची प्रगती करतो तेव्हा आमच्यातच असतो. आमची विज्ञान प्रदर्शनं पाहण्यासाठी ते नक्कीच येतात.

Download File

Leave a Comment