बाबा जेव्हा स्वयंपाक करतात निबंध | Baba jevha svayampaka karata essay in Marathi

बाबा जेव्हा स्वयंपाक करतात | Baba jevha svayampaka karatata

मित्रांनो, आपण दररोज मस्त जेवतो. कधी हे नको, कधी ते नको, असा हट्ट देखील करतो. तरीही न कंटाळता स्वयंपाक करते ती आपली आई! एकदा मात्र आईच्या ऐवजी बाबांना स्वयंपाक करावा लागला. काय धम्माल आली. त्या दिवशी होता शनिवार सकाळची शाळा संपवून बारा वाजता घरी आलो. घरात टी.व्ही. वर ‘खाना खजाना’ हा कार्यक्रम चालू होता. एक पुरुष चक्क काही पदार्थ करून दाखवत होता. तो चित्ररूप पदार्थ पाहून पोट थोडेच भरणार होते. उलट भुकेच्या आठवणीनं मी एकदम आईला हाका मारायला सुरुवात केली. आईच्या ऐवजी बाबाच बाहेर आले. बाबांना विचारलं, “आई कुठाय?” बाबांनी शांतपणे सांगितले, “आई सकाळीच गावाला गेली.” मी मात्र जाम वैतागलो. पोटात कावळे ओरडत होते. बाबांना आशेनं म्हटलं, “बाबा, आपण हॉटेलात जाऊ या का?” बाबांनी चक्क नकार दिला. मी उसळूनच म्हटलं, “मग आज जेवायचं काय?” बाबा म्हणाले, “अरे, मी करतोय ना स्वयंपाक.” मला एकदम हसूच आलं. “बाबा, तुम्हांला चहात मीठ घालतात की साखर हे देखील माहीत नाही, नि स्वयंपाक करणार तुम्ही?”

बाबांना आता चेवच आला. ते एखाद्या कुकच्या थाटात स्वयंपाकघरात वावरायले लागले. खरं तर त्यांना काहीही सुचतच नव्हतं. प्रथम त्यांनी नेमका कांदा चिरायला घेतला. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. त्यात कांदा हातातून निसटला नि बोट कापलं. मी लगेच कापलेल्या बोटाला हळद लावावी म्हणून मिसळणीचा डबा उघडला, नि तो सटकन् हातातून निसटला. अनू हळद, तिखट, मसाला, हिंग, मोहरी एक झाले आणि सगळ्या स्वयंपाकघरात पळापळ करू लागले. बाबांनी मला स्वयंपाकघरातून बाहेर हाकलले. मी बाहेर बसलो पण लक्ष मात्र सगळं आत स्वयंपाकघरात.
आतून परातीचा आवाज आला. मग डबा उघडल्याचा. हे पोळ्या करणार वाटतं. झालं, हिंदुस्तान, पाकिस्तानचे नकाशे होणार. बाबांनी कणीक भिजवायला घेतली खरी पण पीठ व पाणी यांची चक्क चढाओढ सुरू झाली. वाढता वाढता वाढे गोळा एवढा मोठ्ठा झाला की, चार पोळ्यांच्या ऐवजी चाळीस पोळ्या होतील. तो मोठ्ठा गोळा पाहून माझ्या पोटात गोळा आला. आता बाबा पोळ्या करायला लागले. तवा खूप तापला पोळी टाकताच ती तव्याला चिकटून बसली. मी लगेच धावलो नि कैलास जीवनची बाटली घेऊन आलो. बाबांना न भाजता ती पोळी काढण्यात यश आलं, मला तिथं बघितलं नी त्यांनी विचारलं, “काय रे इथं काय करतोयस?”, “काही नाही, मला वाटलं पोळ्या करताना… म्हणून कैलास जीवन…” माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच बाबांनी मला पुन्हा एकदा बाहेर हाकललं.

मी बाहेर गेलो. थोड्याच वेळात भांड्यांचा धाडधाड पडण्याचा आवाज आला. तो थांबला की, लगेच फोडणीचा ताडताड आवाज. मग कुकरच्या शिट्ट्या. या सगळ्या आवाजांवरून मी काय काय पदार्थ केले असावेत याचा अंदाज घेत होतो.

घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. पोटात भुकेने कालावाकालव होत होती. ही वेळ म्हणजे माझी दुसऱ्यांदा खादडण्याची, पण आज आई नाही म्हणून झालेले हाल जाणवले. अन् आईची किंमत, बाबांची हिंमत नि त्यामुळे झालेली माझी गंमत कळून चुकली.

बंड्या, जेवायला चल. अशी बाबांची हाक आली नि भानावर आलो. मुकाट्याने पानावर बसलो. तर पानात कोळशाची भाजी, खापराच्या पोळ्या, पळापळ करणारं अळणी वरण, अन् चक्क भाताची खीर. कसा बसा पाण्याच्या घोटाबरोबर घास गिळत होतो.

मित्रांनो, एक प्रश्न आहे. लग्नकार्यात, हॉटेल्समध्ये स्वयंपाक करतात ते पुरुषच. त्यांचा स्वयंपाक कसा उत्तम होतो, नि तुमच्या आमच्या बाबांना का नाही जमत असा स्वयंपाक करायला? मला वाटतं मोठेपणी जर अशी स्वयंपाक करायची वेळ आली तर! एक उपाय सुचतोय, बघा पटतो का? शाळेत तो भूगोल, गणित, इतिहास… असे ढीगभर विषय शिकवतात, त्यापेक्षा जर पाककला हा विषय शिकवला तर? अहो, आपण सारी धडपड करतो तरी कशासाठी….. पोटासाठीच ना?

Download File

Leave a Comment