शाळेतील पहिला दिवस निबंध | Shaletil Pahila Divas Nibandh

Shaletil Pahila Divas Nibandh शाळेतील पहिला दिवस

‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती.’ या गाण्याच्या ओळी ऐकल्या नि मनात आलं, खरंच काही गोष्टी आपण विसरू शकत नाही. आम्हां मुलांच्या इवल्याशा आयुष्यात आठवणीतली गोष्ट म्हणजे शाळेतील पहिला दिवस. माँटेसरीत गेलो तेव्हा अगदीच तीन वर्षांचा होतो. आईपासून • दूर जाण्याचा तो पहिला प्रसंग. त्यामुळे आमच्या चिमुकल्या विश्वात तोच महान विरहाचा क्षण. सगळ्याच मुलांना शाळा म्हणजे तुरूंग वाटत असावा, कोणी हसत-हसत वर्गात गेला नसेल. आम्हां भेदरलेल्या, रडणाऱ्या मुलांना शांत करणाऱ्या बाईंची मात्र कमालच. पहिलीत गेलो ते प्राथमिक शाळेत. तो पहिला दिवस आणि माँटेसरीतला पहिला दिवस यांत मात्र फरक होता. दोन वर्षांत शालेय वातावरणाचा सराव झालेला असल्याने विशेष धक्का बसला नाही.

यंदा मी माध्यमिक शाळेत जाणार होतो. मोठ्या शाळेत जायची उत्सुकता होतीच. पण एक भीती देखील होती. मोठी मुलं आपल्याला त्रास तर नाही ना देणार? शेवटी तो शाळेचा पहिला दिवस उजाडला. शाळेच्या आवारात ही गर्दी. प्रत्येकाच्या पाठीवर भलं मोठ्ठे दप्तर. ती अगदी सराईतपणे वावरत होती आणि मी मात्र बावरलेला. तेवढ्यात चौथीत माझ्या वर्गात असलेले काही मित्र भेटले. जरा हुश्श वाटलं.

आम्ही सगळे आमच्या नव्या वर्गापाशी आलो. शाळेची पहिली घंटा झाली. पालकांची गर्दी पांगली. स्टेशनवरील गाडी सुटल्यावर जसे सगळे पांगतात नि शांतता पसरते तसं वाटलं. दुसरी घंटा झाली. बाई वर्गात आल्या. आमच्या सगळ्यांचे लक्ष बाईंकडे होतं. बाईंना नमस्ते म्हणून आम्ही खाली बसलो. माईकवरून सूचना ही गोष्ट आम्हांला नवीन होती. आम्हांला बाईंनी एका मोठ्या सभागृहात नेले. आम्ही अगदी शिस्तीने ओळीत बसलो. प्रार्थना सुरू झाली. आमची प्रार्थना काही पाठ नव्हती. त्यामुळे आमची तोंडं बंदच होती. प्रार्थना झाल्यावर मुख्याध्यापकांनी सरस्वतिपूजन केले. आम्ही स्तवन केले. मुख्याध्यापकांनी शाळेबद्दलची माहिती सांगितली. काही शिक्षकांनी शिस्तीबद्दलच्या सूचना सांगितल्या. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन वातावरण असल्यामुळे आज आमच्या तोंडाला कुलूप होते.
शांतपणे शिस्तीत आम्ही पुन्हा वर्गात आलो. बाईंनी आम्हांला वेळापत्रक लिहून घ्यायला सांगितले. आम्ही पण अगदी नव्या कोऱ्या वहीचं छान अक्षरात स्वागत केलं. आजच्या दिवसाचं अप्रूप वाटत होतं की, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक येणार. प्रत्येक विषयाचे शिक्षक बघण्याची उत्सुकता होतीच.

मधली सुट्टी झाली. आता कुठं जायचं. समोरच्या वर्गातली मोठ्ठी मुलं पाहून धडधडायला लागलं. प्राथमिक शाळेत आम्ही दादा होतो आणि या शाळेत मात्र आम्ही सगळ्यांत लहान. आम्हांला दादागिरीचा अनुभव होता. त्यामुळे आता आम्ही त्या दादांच्या दादागिरीची कल्पना करू शकत होतो. आता ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ याप्रमाणे वागायचं ठरवलं. काही दिवस वर्गापासून फार लांब काही जायचं नाही असा निश्चय केला.

अशा प्रकारे मोठ्या शाळेतील पहिला दिवस भीती, आश्चर्य, धास्ती, हुरहुर अशा विविध भावभावनांनी भरलेला होता. हळूहळू सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या. आम्ही आता अगदी शाळेत चांगलेच रमलो आहोत. शाळेचा कोपरान् कोपरा आता परिचयाचा झालाय. पण तरीही शाळेचा तो पहिला दिवस मात्र मी हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवलाय.

Download File

Leave a Comment