माझे पहिले भाषण निबंध | Maze Pahile Bhashan nibandh

Maze Pahile Bhashan nibandh | माझे पहिले भाषण

मित्रांनो, माझी ताई फारच हुशार आहे. ती सगळ्यांत बक्षीस पटकावतेच. त्याचमुळे तिचं खूप कौतुक होत असतं. बरं, मी काय म्हणतो तिचं कौतुक करा, पण तिच्याशी माझी तुलना कशाला? आता बघा हाताची पाचही बोटं सारखी असतात का? मग मी अन् माझी ताइटली दोघं सारखी कशी? असो, मी एकदा ठरवलंच की आपणही आता बक्षिसं मिळवायचीच. अहो, मी भाग घेत नाही म्हणून… नाहीतर ताईपेक्षा जास्त बक्षिसं मीच मिळवीन. माझी ही भीष्मप्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी शाळेत गेल्याबरोबर कोणत्या कोणत्या स्पर्धा आहेत याचा शोध घेतला. मला कळलं की, कालच वक्तृत्व स्पर्धेची नोटीस आली होती. मग आमची स्वारी लगेच बाईकडे रवाना झाली. प्रथम बाईंनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. पण माझा अढळ निश्चय मला माघार घेऊ देत नव्हता. मी बाईंपाशी खूप भुणभुण केली. तेव्हापासून माझ्या मित्रांनी तर माझं नाव ओम् भुणभुणेश्वरच ठेवलं. मी मात्र शांतपणे सारी विशेषणं आनंदानं स्वीकारत होतो. माझी चिकाटी पाहून बाईनी स्पर्धेसाठी माझी निवड केली. बाईंनी मला भाषण लिहून दिलं नि ते पाठ करून यायला सांगितलं.

भल्या मोठ्या बक्षिसाचं स्वप्न साकारण्यासाठी मी जिद्दीनं भाषण अगदी छान पाठ केलं. प्रत्येक शब्दाशब्दांत मला बक्षीस दिसू लागलं. ‘प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे रे’, अशासारखी सुवचने मला प्रोत्साहन देऊ लागली. त्यामुळे मी अगदी घड्याळ लावून पुनः पुन्हा भाषण म्हणून पाहिले. तयारी तर अगदी जय्यत झाली.

स्पर्धेचा दिवस उजाडला. सकाळपासून माझी नुसती धांदल चालली होती.. आरशासमोर उभं राहून पुन्हा एकदा भाषण म्हणून पाहिलं. हं आता बक्षीस माझ्याशिवाय कुणाला मिळूच शकत नाही. नवीन कपडे घालून मोठ्या वक्त्याच्या थाटात मी स्पर्धेच्या हॉलमध्ये प्रवेश केला. स्पर्धा सुरू झाली. माझा नंबर आला. मी टेबलापाशी उभा राहिलो. समोर माझी आई, शेजारच्या काकू, आमच्या बाई, स्पर्धक मित्र, त्यांचे पालक, शिक्षक सगळेच बसले होते. मी त्यांच्याकडे बघितलं. सगळेच श्रोते माझ्याकडे नजर रोखून बघत होते. कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी माझी स्थिती झाली. तोंडाला कोरड पडली. हातपाय लटपटू लागले. थंडी असूनही सर्वांगाला घाम फुटला. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते पण माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. समोर बसलेली मुलं हसायला लागली. गडबड करायला लागली. बाई घंटी वाजवत भाषण करण्याची सूचना देऊ लागल्या. तरीही मी बावळटासारखा मक्खपणे उभाच. सगळी मुलं ओरडायला लागली. ए, म्हण भाषण. त्यावर सगळी मुलं हसायला लागली. मला मात्र ‘दे माय धरणी ठाय झालं’. वाटलं धरणी दुभंगावी अन् त्यात मी गडप व्हावं!

तिकडून बाई खुणा करून भाषण म्हण म्हणून सांगत होत्या. मी बोलायला सुरुवात केली. दोन-चार वाक्य बोललो, तोच जोराची शिंक आली अन् चड्डीचं बटण तुटलं. मग तर फजितीच झाली. अगदी दुहेरी फजिती. पुन्हा त त प प म्हणत भाषण म्हणण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या लकबी पाहून समोरची मुलं हसत होती. एक टारगट मुलगा ओरडला, आहे बुवा! गाडीला सिग्नल मिळाला. त्यावर सगळी पोरं झुक झुक असा आवाज काढू लागली. अशाप्रकारे माझ्या पहिल्या भाषणाचे तीन तेरा वाजले. घंटी वाजत होती, त्याचा फायदा घेत मी तिथून पळ काढला.

मित्रांनो, भाषण करणं काही तितकं सोप्पं नाही हे त्यादिवशी समजलं. आता पुन्हा संधी मिळाली तर अगदी झकास भाषण करून दाखवायचंच असा निश्चय केला. नि तो मी पूर्ण केला. आता मला भाषण करताना मुळीच भीती वाटत नाही. पण मित्रांनो, माझं पहिलं भाषण मात्र मी कधीच विसरणार नाही. शेवटी ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.’ या पायरीला कसं विसरू ?

Download File

Leave a Comment