राष्ट्रीय एकात्मता
भाषा भिन्न विविध पहनावा
फिरभी सत्य सिद्ध यह दावा हिंदू-मुस्लिम सिक्ख इसाई
मिल रहते जो भाई-भाई
असं इथं राहून जाहीरपणे सांगण्याची वेळ यावी यासारखं आम्हा भारतीयांचे दुर्दैव कोणतं. जे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन लढलो. त्याच स्वातंत्र्यानं आज आम्हाला फुटीरतेच्या शापाशिवाय काहीही दिलेलं नाही. पंजाब आणि आसाम, काश्मीरमध्ये रोज घडणाऱ्या घटना आपल्याला याची साक्ष देतातच.
भारत कल्पनाप्रमाणे आणि प्रगतिमानाप्रमाणे २१ व्या शतकात प्रवेश करू पाहतोय. पण आज सगळीकडे दिसणारी धमधिता आणि जातिभेद पाहिलं तर आम्हाला प्रश्न पडतो की, भारताला २१ व्या शतकाकडे न्यायचं की ११ व्या शतकातून बाहेर काढायचं. आमच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि सर्व कल्याणाच्या दृष्टीने आपल्या भारतात राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
भाषा आणि प्रांत या आधारावर आमच्या देशाची रचना झाली ती राज्यकारभार सोयीस्करपणे करता यावा म्हणून. पण त्याचा नेमका उलटा परिणाम झाला आणि प्रत्येक जण स्वतःला भारतीय समजण्यापेक्षा महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, समजू लागला. प्रत्येकाला आपली जात, आपला धर्म प्रिय बाटू लागला आणि यातूनच निर्माण झाल्या जातीय, प्रांतीय दंगली, सीमा प्रश्न, गुरखा आंदोलन, पंजाबचा प्रश्न आणि काश्मीरची समस्या.
या सर्व प्रश्नांना तोंड देण्यासाठी सर्व भारतीयांच्या मनामध्ये एकात्मता नांदणे आवश्यक आहे..
पंजाबच्या धगधगत्या अधिकुंडातही काही वेळा प्रेमाची, माणुसकीची हिरवळ पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पडलेली एक घटना मला आठवते. काही अतिरेक्यांनी एका गावावर हल्ला केला. त्या वेळी तिथे हिंदूंच्या बरोबर शिखही होते. अतिरेक्यांनी शिख बांधवांना हिंदूंच्यापासून दूर जायला सांगितले; परंतु आमच्या शिख बांधवांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता उत्तर दिले, हम सब भाई-भाई है। हम आपकी गोलीयोंसे नहीं डते. हम जियेंगे तो साथ-साथ और मरेंगे तो भी साथ, जातिभेदांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बंधुत्वाचे हे दर्शन मनाला दिलासा देऊन जाते. अशाच बंधुत्वाची अशाच एकतेची आज आपल्या देशाला गरज आहे. कमळाच्या पाकळ्या अनेक असतात पण देठ एक असते. तशाच प्रकारे सर्व प्रकारची विविधता पण भारत एक असे दृश्य आपल्याला दिसले पाहिजे.
तिन्ही बाजूंनी सागरांनी वेढलेला आणि हिमाचलाचा तळपता मुकुट डोक्यावर परिधान करणारा सारे जहाँ से अच्छा आमचा भारत पण आज त्याच्या सौंदर्याला गालबोट लागलयं ते राष्ट्रीय एकात्मतेच्या अभावाचं आणि यामुळचं परकीय आक्रमणाचा धोकासुद्धा आपल्या देशाला निर्माण झाला आहे. हे सगळं टाळण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला केली पाहिजे.
विसरून जाऊ जाति-धर्म अन् भेदभाव सारे
आम्ही भारतीय, फक्त भारतीय हा नवामंत्र गारे
आपण कधीतरी बागेत फिरायला जातो. तिथे अनेक प्रकारची फुलं असतात. ती सगळीच आपापल्या वेगवेगळेपणानं आपल्याला मोहवून टाकतात क्षणभर कल्पना करा. या सगळ्या रंगांनी आणि गंधांनी वेगळं व्हायचं ठरवलं तर या सुंदर उपवनाचे रूपांतर मरुभूमीत व्हायला काहीच वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे देशातील विविधतेचा उपभोग आणि आनंद न घेता त्याच कारणावरून आपण भांडत बसलो तर या सुवर्णभूमीची स्मशानभूमी झाल्याचं आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागेल. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा मित्रांनो माणसाचं मन हे नेहमीच आशावादी असतं, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल या न्यायातूनच भारतीय जागे होतील. एकात्मतेचे महत्त्व त्यांन समजेल. सारा भारत आमचा असेल. आम्ही एकाच भारता मातेची मुलं म्हणून अभिमानान मिरवू, आमची सुवर्ण भूमी सोन्याहून पिवळी होईल या धरणीवर नंदनवन अवतरेल, कुणी हिंदू असणार नाही कुणी मुसलमान असणार नाही तर कुणी शीख असणार नाही. प्रत्येक जण फक्त भारतीय आणि भारतीयच असेल आणि मग आपल्याला अभिमानान म्हणता येईल –
बोली है अलग भाषा है जुदा
पर एक वतन हम सबका है।