मी आजारी पडतो तेव्हा निबंध

मी आजारी पडतो तेव्हा….

सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः ।

या श्लोकात खरं तर निरामय जीवनाची इच्छा प्रकट केली आहे. मुलं आजारी पडू नयेत म्हणून आई किती काळजी घेत असते. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, इथं जाऊ नकोस, तिथं जाऊ नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस, खरं तर हा मंत्र त्याचसाठी. दात घासलेस का, पाय धुतलेस का, हात धुतलेस का? या प्रश्नांचा खरं तर आम्हां मुलांना फारच राग येतो.

https://shikshaved.com

उन्हाळ्याची सुटी लागली. आता मुख्य म्हणजे अभ्यासातून सुटका झाली. आता सगळी बंधनं झुगारून मस्त मजा करायची असं ठरवलं. आइस्क्रीम, फ्रीजमधलं पाणी, बर्फाचा गोळा अशा साऱ्या गारेगार मंडळींशी जाम मैत्री केली. दिवसभर कैऱ्या, काकड्या, चिंचा यांचा समाचार. आजूबाजूची मंडळी जमवून दिवसभर नुसता धुडगूस. आख्खी कॉलनी दणाणून गेली. एरवी लाड करणारे आजी-आजोबा एकसारखे आमच्यावर खेकसू लागले.

एक दिवस जाम उकडायला लागलं. घामामुळे अगदी हैराण झालो. एकाएकी आकाशात काळेकुट्ट ढग जमू लागले. अंधारून आलं. ढगांचा गडगडाट नि मध्येच विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाच्या सरी गारांसह कोसळू लागल्या. आम्ही मुलं ‘ये रे येरे पावसा’च्या तालावर धुंद होऊन नाचू लागलो. पावसात चिंब भिजताना खूप मजा वाटत होती. आई आतून ओरडत होती, ‘बस् भिजणं, चला घरात नाहीतर आजारी पडशील.’

आईची ‘आजारी पडशील’ ही भविष्यवाणी खरी ठरली. मी थंडीनं कुडकुडायला लागलो. दातांवर दात आपटून बडबड गीत सुरू झालं. नि सटासट येणाऱ्या शिंकांनी त्याला संगीत दिलं. अंग तापानं फणफणायला लागलं. आजाराची नांदी संपली नि आजाराचं नाटक सुरू झालं.

आता आईची धावपळ सुरू झाली. डॉक्टर, औषध, पथ्य या त्रयींनी जीव मेटाकुटीला आला. आता ‘आलीया भोगासि’ म्हणण्यापलीकडे उपायच नव्हता. माझ्या आजारपणाची बातमी हा हा म्हणता आख्ख्या कॉलनीभर झाली. झाल सगळे मला भेटायला यायला लागले. आजारी कसा पडलो याची कॅसेट करून ऐकवावी असं वाटू लागले. प्रत्येकजण माझ्या आजाराबाबत चर्वण करू लागला. कुणी उपाय सुचवू लागले. अॅलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी या तिन्ही वैद्यकीय उपायांचा ज्ञानकोश आमच्यापुढे उलगडू लागला. अनेक सल्ले ऐकून जाम वैतागलो.

शेजारच्या राधाकाकू पाककला विशारद त्यांनी प्रयोग करून बनवलेली विविध पेयं घशातून बळंच उतरू लागली. तोंडाला चव येण्याऐवजी तोंडाची चवच गेली. शेजारच्या आजींनी आपला बटवाच माझ्यापुढे खुला केला. बापरे, आता काही खरं नाही. साऱ्यांच्या सहानुभूतीला उधाण आलं. ओरडून सांगावंसं वाटत होतं. बस्स्, माझ्यावर दया करू नका. पण माझा हा विचारही माझ्यासारखाच केविलवाणा झाला होता..

आता आमच्या कॉलनीत जाम शांतता होती. बहुतेकांच्या आयांनी माझ्या उदाहरणाने आपापल्या मुलांना भीती घालून घरातच डांबून ठेवलं होतं. आमचा सुटीचा आनंद माझ्या आजारपणामुळे खलास झाला. या पहिल्या पावसानं, पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूसारखी माझी अवस्था झाली.

मी मात्र सगळं स्वातंत्र्य गमावून बसलेल्या पोपटासारखा पिंजऱ्यात कैद झालो होतो. खाण्या-पिण्याचं स्वातंत्र्य जाऊन, उकळलेलं पाणी, कडू औषध, मऊ भात, न आवडणारी बिस्किटं खाऊन समाधान मानावं लागत होतं. आरोग्य ठीक तर सारं ठीक. याची आता प्रचीती आली. कधी-कधी आजारी पडूच नये हे आता पटलं. जीवन आनंदासाठी आहे, त्याचा उपभोग घ्यायचा म्हणजे तब्येत ठीक हवीच ना?

है या आजारपणात जाणवली ती आईची माया. तिच्यासारखी सेवा कुणीही करू शकणार नाही हे मात्र खरंच. हे सगळं सगळं जाणवलं, समजलं….

मी आजारी पडलो तेव्हा…

Download File

Leave a Comment