माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध भाषण | marathi aamachi mayboli essay in marathi

marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी मायबोली

हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी

शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी।

अलौकिक अशा अक्षरवाङ्मयाने समृद्ध असलेली आमची मराठी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये विवेकसिंधू आणि ज्ञानेश्वरीपासून विठोबा अण्णांच्या पदापर्यंत आणि होनाजी बाळा, परशराम आदी शाहिरांच्या लावण्यांपर्यंत हजारो ग्रंथ लिहिले गेले. आमच्या मराठीने आपल्या काव्यवाटिकेत सर्व रसरंगांची असाधारण सौंदर्याने नटलेली अगणित फुले फुलविली. मराठीचे नितांत रमणीय उद्यान फुलविण्याकरिता नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर, रघुनाथ पंडित यांच्यासारख्या शेकडो साधुसंतांनी आणि इतर दिग्गज पंडितांनी आपल्या जीवाचे रान केले व माझ्या मराठीचि बोलु कौतुके। परि अमृताते हि पैजेसि जिंके। हे प्रतिज्ञोत्तर अक्षरश: खरे करून दाखवले.

माझी मराठी मायबोली नवरसात न्हाऊन निघाली आहे. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत हे ते रस. माझ्या मायबोलीचा सारस्वत सागर सदैव उसळलेला असतो. ओवी, अभंग, आर्या, भारूड, गवळण, लावणी या काव्यप्रकारांनी.

marathi aamachi mayboli essay in marathi 500 words

माझ्या मराठीची थोरी

नित्य नवे रूप दावी

अवनत होई माथा

मुखी उमटते ओवी

अशी ही मराठी मायबोली. आमच्या महाराष्ट्राची भाषा. आमची मातृभाषा.. या मराठीची गोडी अवीट आहे. आपल्या भावनांची अभिव्यक्ती करण्याचे प्रभावी माध्यम. सर्व व्यवहार विचारांचे आदान-प्रदान करण्याची भाषा. माझ्या मराठीला चांगले दिवस यावेत तिचा सन्मान वाढावा, तिचे सौंदर्य खुलावे, यासाठी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले योगदान फार मोठे आहे. सर्व साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले. आणि मराठी भाषा समृद्ध बनवली. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. या दिवशीच मराठी दिन साजरा करावा ही कल्पना पुढे आली आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली. कुसुमाग्रज मराठी बाणा सांगताना म्हणतात,.

माझं मराठीपण

मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात

संतांच्या शब्दांत इतिहासाच्या पानात

तेव्हा सारीजणं हसून म्हणाली,

आम्ही शोधलं

आमचं मराठीपण

या भूमीवरील माणसांच्या मनात,

त्यांच्या जखमात, त्यांच्या रक्तात.

आमचा मराठीबाणा आहे माणुसकीचा वाहता झरा. केवळ इतिहासाची साक्ष देत पूर्वजांचे गोडवे गात निष्क्रिय बसणारा मराठी माणूस नाही तर तो आकाशाला गवसणी घालणारा आहे.

‘आम्हांस आम्ही पुन्हा पहावे,

काढूनी चष्मा डोळ्यांवरचा.’

यातून मराठी माणूस आत्मपरीक्षण करतो. माधव जूलियन हे आपल्या कवितेतून सांगतात.

मराठी अशी ज्ञानदेवी, जयाची असे मायबोली.

मराठीच तो हृदी रक्त दे साक्ष तो बंधु माझा

कुठेहि असे उच्च का नीच तो.

मराठी मायबोलीशी जुळलेलं नातं असं अतूट आहे. काव्य हे प्रभावी माध्यम आहे; त्यातून मनाचा ठाव घेतला जातो. अनेक कवींनी तिचे गोडवे गायले.

मराठी असे आमुची मायबोली,

जरी भिन्न धर्मानुयायी असू

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू

वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी

अशी माझी मराठी भाषा साहित्याने नटलेली.

दाटे अंधार जिथे उगवे ना आदित्य

होतो मुर्दाड देश ना जेथे साहित्य |

परंतु आज मराठीची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. स्वाभिमानशून्य लोक आपल्याच मराठीला अविकसित म्हणत आहेत. क्षुद्र व तुच्छ गावठी भाषा असं संबोधत आहेत. श्रीमंत किंवा शिक्षित लोक ख्रिस्तीधर्मप्रचारकांनी चालविलेल्या कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये आपल्या मुलाला पाठविण्याचा आग्रह धरू लागले आहेत. एकमेकांना पत्रे इंग्रजीतून लिहिण्यात गौरव मानू लागले आहेत. आपल्या आई-वडिलांना मम्मी, डॅडी अशी हाक मारणाऱ्या मुलांचं विशेष कौतुक होत आहे. वॉश घेऊन फ्रेश होते, थँक्यू, सॉरी यासारखे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले आहेत. ज्या शब्दांना मराठीत सुंदर शब्द आहेत ते डावलून इंग्रजी शब्दांचा वापर होत आहे. अशा प्रकारचे इंग्रजीचे आक्रमण थांबवले नाहीतर ही सुंदर भाषा मृत होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

अशा परिस्थितीत मराठी भाषेची थोर परंपरा जपण्याची गरज आहे. मराठी भाषेची थोर परंपरा, उज्ज्वल इतिहास, अनेक अजरामर काव्ये, स्फुट लेखने, लघुनिबंध, आत्मचरित्रे, ग्रंथ मराठी दिनाचे औचित्य साधून लोकांच्यासमोर आले पाहिजेत. मराठीची शान व मान वाढवून तिचा दर्जा उंचावणे हे प्रत्येक मराठी माणसाचे परमकर्तव्य आहे. प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. तिची सेवा करून तिचे पांग फेडले पाहिजेत. फादर स्टीफन्सन आपल्या भाषेचे कौतुक करताना म्हणतात,

जैसी पुस्पामाजी पुस्प मोगरी

की परिमळामाजी कस्तुरी

तैसी भासामाजी साजिरी मराठिया।

प्रत्येकाने मराठी बाणा जपत म्हटलं पाहिजे,

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगे जागतील

मायदेशातील शिळा

एवढी सामर्थ्यशाली मराठी भाषा तिचा गौरव वाढविण्यासाठी ग्रंथालये समृद्ध करूया. ग्रंथदिंडी काढूया. साहित्य परिषदांचा परिचय करून घेऊया. विविध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करूया. साहित्यिकांची छायाचित्रे, त्यांची साहित्यसंपदा यांचा संग्रह करूया. विविध भाषाशैलीचे नमुने जमवू या. भित्तिचित्रे, प्रदर्शने भरू द्या. साहित्य संमेलने, नाट्यसंमेलने यांना आवर्जून भेट देऊ या. आणि पुन्हा एकदा प्रतिज्ञा करू या,

हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडु, हिला बैसवू वैभवाच्य शिरी|

अधिक वाचा :

Download File

Leave a Comment