आम्हांला हवेत आजी-ओजाबा
मित्रांनो, कालच एक लेख वाचला. लेखाचा मथळा होता वृद्धाश्रम काळाची गरज. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम ठीक, पण ज्या वृद्धांना मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वृद्धाश्रम? हा प्रश्न खरं तर मला भेडसावतच होता. त्यात मी माझ्या मित्राबरोबर त्याच्या आजोबांना भेटायला वृद्धाश्रमात गेलो. गेल्या गेल्या आत एक पाटी लावली होती. ज्यांना सगळे आहेत, पण ज्यांचे कोणी नाही, अशांसाठी वृद्धाश्रम मन अस्वस्थ झालं. माणूस आज किती स्वार्थी बनत चाललाय याची जाणीव झाली.
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची अडगळ वाटते. आम्हां मुलांना भौतिक सुखं मिळावीत म्हणून धडपडपणारे आमचे आई-बाबा फार मोठी चूक करत आहेत. खरं तर आई नोकरीला गेल्यावर घरात आजी-आजोबांचा कितीतरी आधार वाटायला हवा. अहो, आम्ही मुलं शाळेतून घरी येतो तेव्हा आमच्या स्वागताला आई नसते, असतं ते कुलूप. मनात खूप प्रश्न असतात, शंका असतात, खूप काही सांगायचं असतं, पण ऐकणारं कोणीच नसतं. उशिरा दमूनभागून आलेले आई-बाबा आमचं काही ऐकण्याच्या मनःस्थितीतच नसतात. बेटा रविवारी बोलू हं, असं म्हणून आमची बोळवण करतात.
मला नेहमी प्रश्न पडतो की, पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. तेव्हा घरात राहणारी माणसंच होती ना? की त्यांना भाव-भावना नव्हत्या. छे भाव-भावना होत्या म्हणून तर ती सारी गुण्यागोविंदानं एकत्र राहत होती. घरातल्या वृद्धांना मान देत होती. त्यांच्याच सल्ल्यानं वागत होती. मग तेव्हा काय ती मूर्ख होती ?
आज आमच्या घरात सगळ्या सुखसोई आहेत. फ्रीज आहे, टीव्ही आहे. या वस्तू ठेवायला जागा आहे, पण आजी-आजोबांसाठी जागा नाही, हे पटतंय का तुम्हांला? दुधापेक्षा दुधाच्या सायीला जपणारी ही आजी-आजोबा आमच्या वाट्याला का नाहीत? आम्हांला विचारलंच जात नाही. आजोबा हवेत का? तुला आजी
आजी-आजोबा म्हणजे खरं तर वटवृक्ष. त्यांच्या छत्रछायेत निवांत राहायचं आम्हांला. आम्हांला छान-छान गोष्टी सांगणारे, त्यातून आमच्यावर सुसंस्कार करणारे आजी-आजोबा हवेतच आम्हांला. आमची भावनिक गरज फक्त आजी आजोबाच भागवू शकतात. त्यांच्यापाशी अनुभवांचं केवढं तरी गाठोड असतं. त्या गाठोड्यात पैशाची श्रीमंती नसेल पण, मौलिक विचारांची कितीतरी रत्नं भरलेली असतात. त्यातील रत्नांनी श्रीमंत व्हायचंय आम्हांला. काळ बदलला, काळाबरोबर आपण नको का बदलायला, असं म्हणून पळवाटा शोधू नका. काळ तुमच्यासाठी सुद्धा बदलणार आहे. कारण आई-बाबा तुम्हीपण म्हातारे होणार आहातच की, तेव्हा आम्हां मुलांनी पण तुम्हांला वृद्धाश्रमातच ठेवायचं?
आज आमच्या घरात इनमीन तीन माणसं. त्यातले दोघं म्हणजे आई बाबा नोकरीनिमित्त बाहेर. घरात आल्यावर खेळायला कोणी नाही. भांडायलाही कोणी नाही. शाळेत अभ्यास, घरीही अभ्यासच? घरात कोणी नाही म्हणून सतराशे साठ क्लास लावून ठेवलेले. तीन वेळा पुरेल एवढा डबा दिला, क्लासला पैसे भरले की, संपली आईची जबाबदारी. आम्हांला कपडे खूप नकोत, क्लासही नकोत, पण आमचं ऐकून घेणारे, आमच्या चुका समजावून सांगणारे मायेचे आजी-आजोबा हवेत. आम्हांला हवाय मानसिक आधार.
लहानपणी पाळणाघरात अन् आता क्लासमध्ये, घरात एकटं बसायचं, म्हणून लावा टी.व्ही. पण टी.व्ही.वरही असलीच घरं. जे माझ्या घरात तेच टी.व्ही.तल्या घरात पाहायचं. छे, कंटाळा येतो. मनात कुठेतरी वादळ निर्माण होत असतं, राग उफाळून येत असतो. मग वर्गात आम्ही करतो दंगा. तिथेही शिस्त मोडली म्हणून शिक्षा. आजी-आजोबा लाड करून तुला बिघडवतील असं विधान जेव्हा आई करते ना तेव्हा खूप राग येतो. लाड करून कोणी
बिघडतं का? अहो, आजी-आजोबा माया करतील त्यामुळे किती शांत शांत वाटेल, समाधान वाटेल. आमच्यावर छान-छान संस्कार होतील. ते काही नाही, आपण मुलांनी आपल्या आई-बाबांना ठणकावून सांगितलं पाहिजे,
आम्हांला हवेत आजी-आजोबा!